मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

मुंबई काँग्रेस : मिलिंद देवरा-संजय निरुपम वादामुळं अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर

- मयुरेश कोण्णूर
लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधींपासून सुरू झालेली काँग्रेसमधली राजीनाम्यांची माळ संपता संपत नाहीये.
 
ज्योतिरादित्य सिंधियांपाठोपाठ मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला.
 
त्यांनी सांगितल्याप्रमाणे या राजीनामासत्रामागे नैतिक जबाबदारीची जाणीव असेलही त्याचबरोबर या त्यागातून पदरी पडणाऱ्या चांगुलपणाची अपेक्षाही असेल. पण हे 'राजीनामा मिसाईल' काँग्रेसवर मिसफायर झालंय का, असा प्रश्न आता विचारला जातोय.
 
अगोदरच पराभवाच्या गर्तेत असलेल्या मुंबई काँग्रेसमधली भांडणं राजीनाम्याच्या निमित्तानं चव्हाट्यावर आली आहेत. देवरा यांनी ज्या निरुपमांकडून मुंबई अध्यक्षपदाची माळ स्वत:च्या गळ्यात ओढून घेतली त्याच संजय निरुपमांनी देवरांविरुद्ध नव्यानं आघाडी उघडली आहे. त्यात आता ज्येष्ठ नेते भाई जगताप आणि नुकत्याच काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवलेल्या उर्मिला मातोंडकर याही पडल्या आहेत.
 
मिलिंद देवरांच्या राजीनाम्याची बातमी येताच संजय निरुपमांनी हिंदीत एक ट्वीट केलं. "इस्तिफा में त्याग की भावना अंतर्निहित होती है. यहां तो दुसरे क्षण 'नॅशनल' लेवल का पद मांगा जा रहा है. यह इस्तिफा है या ऊपर चढने की सीढी? पार्टी को ऐसे 'कर्मठ' लोगों से सावधान रहना चाहिए."
 
नाव नव्हतं, पण निरुपमांचा रोख सरळ देवरांकडे होता. मिलिंद देवरा राष्ट्रीय स्तरावरच्या कोणत्या पदासाठी इच्छुक आहेत, हे अद्याप स्पष्ट नाही. पण निरुपमांनी टीकेची संधी सोडली नाही.
 
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा दारुण पराभव झाला. मात्र तरीही निरुपम स्वत:च्या अध्यक्षपदाची खुर्ची वाचवण्यात यशस्वी ठरले होते.
 
पण ऐन लोकसभेच्या तोंडावर त्यांचं अध्यक्षपद काढून घेण्यात आलं आणि मिलिंद देवरा अध्यक्ष झाले. तेव्हापासूनच मुंबई काँग्रेसमधल्या निरुपम गटात राग धुमसत होता. त्याला या पराभवानंतरच्या राजीनामासत्राच्या निमित्तानं वाट मिळाली आहे.
 
देवरा समर्थकांचा असंतोष
पण हे प्रकरण केवळ एका ट्वीटवर थांबलं नाही. निरुपमांच्या या टीकेची चर्चा झाल्यावर राजीनाम्यानंतर बराच काळ शांत असलेल्या मिलिंद देवरांनी सोमवारी मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये आपल्या भूमिका स्पष्ट करणारं एक पत्र प्रसिद्ध केलं. त्यात त्यांनी निरुपमांचं नाव घेतलं नाही, पण टीकेला उत्तर मात्र दिलं.
 
"कोणत्याही व्यक्तिपेक्षा पक्ष आणि त्याचे आदर्श हे महत्त्वाचे आहेत. काही वर्गातून येत असलेल्या अप्रिय टीकेकडे तुम्ही दुर्लक्ष करा. तसेच त्याला कोणत्याही प्रकारचे प्रत्युत्तर देण्याची गरज नाही," असं देवरा यांनी पत्रात म्हटलं.
 
उत्तर देण्याची गरज नाही असं देवरा म्हणत असतानाच मुंबई काँग्रेसमधले निरुपमांचे विरोधक आणि देवरांच्या बाजूने असलेला गट मात्र ट्विटरच्या रणभूमीवर उतरला.
 
ज्येष्ठ नेते भाई जगताप यांनी संजय निरुपम यांच्या मूळ ट्वीटचा हवाला देत लिहिलं, "काही नेते काँग्रेसी असल्याचा दावा करतात, पण ते जातीयवाद आणि भाषावादाचं राजकारण करतात. ते इतर नेत्यांचा अपमान करतात आणि नंतर त्यांच्याच मतदारसंघातून निवडणूकही लढतात. पण एवढं सारं करूनही 2.7 लाख मतांनी हारतात. पक्षाला अशा 'कर्मठ' नेत्यांपासून सावधान राहण्याची गरज आहे."
 
निरुपमांनी यंदा आपला मुंबई उत्तर हा नेहमीचा मतदारसंघ सोडून मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. पण शिवसेनेच्या गजानन कीर्तीकरांनी वाढीव मताधिक्क्यानं निरुपमांचा पराभव केला. काँग्रेसअंतर्गत निरुपमांच्या या मतदारसंघ बदलीला विरोध होता. पण प्रसंगी अध्यक्षपदावर पाणी सोडून निरुपमांनी इथून तिकीट मिळवले. ती नाराजीही आता उघडपणे बाहेर आली आहे.
 
उर्मिला मातोंडकरांची वादात एन्ट्री
काँग्रेसमधलं हे युद्ध आता ट्विटरपुरतं मर्यादित नाही.
 
मुंबई उत्तर मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी निकालापूर्वी 16 मे 2019 रोजी मिलिंद देवरा यांना लिहिलेलं एक पत्र माध्यमांमध्ये प्रसृत झालं. त्यात मातोंडकर यांनी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी कसं त्यांचं काम केलं नाही, त्यांची प्रचारयंत्रणा कशी प्रभावहीन केली, पार्टी फंड पुरेसा नसल्याचं कारण कसं देण्यात आलं, अशा तक्रारींचा मोठा पाढा वाचला आहे. स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांना काम न करायला लावता उर्मिला यांच्या प्रचारात कसे अडथळे आणले, हेही त्यांनी या पत्रात सविस्तर लिहिलं आहे.
 
पण आता प्रकाशात आलेल्या या पत्रामुळं मुंबई काँग्रेसमधली धुसफूस आणि एकमेकांवरचा अविश्वास चव्हाट्यावर आला.
 
उर्मिला मातोंडकर यांनी कोणत्याही मोठ्या नेत्याचं नाव पत्रामध्ये घेतलं नाही, पण त्यांच्या अगोदर हा संजय निरुपमांचामतदारसंघ होता. ज्या स्थानिक कार्यकर्त्यांची नावं त्यांनी या पत्रात लिहिली ते निरुपम यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे तक्रारीचा रोख त्यांच्याकडेच होता असा कयास लावला गेला.
 
'वाद चव्हाट्यावर येणं दुर्दैवी'
या पत्राच्या बातम्या माध्यमांमध्ये येताच संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा ट्विटरचा रस्ता पकडला आणि मिलिंद देवरांचं नाव न घेता त्यांनीच अशी पत्र जाणूनबुजून माध्यमांमध्ये पसरवल्याचा आरोप केला आहे.
 
"अनेक भाषांतून पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकमेकांबरोबर न भांडण्याचं आवाहन केल्यानंतर 'बड्या घराण्यातल्या तरुणा'नं पक्षात 'स्थिरता' आणण्यासाठी ही बातमी माध्यमांमध्ये पेरली आहे. हे पत्र त्याला 16 मे रोजी लिहिण्यात आलं होतं, जे आज माध्यमांना देण्यात आलं आहे. हे काय ते त्यांचे 'गुरू' जेटलींकडून शिकले का?" असं खळबळजनक ट्वीट निरुपम यांनी केलं आहे. त्यामुळं मुंबई काँग्रेसला आरोपांचे नवे हादरे बसले आहेत.
 
पत्रावरून सुरू झालेल्या वादातून आपलं अंग काढून घेण्याचा प्रयत्न उर्मिला मातोंडकर यांच्याकडून केला जातोय. "हे असं गोपनीय असलेलं पत्र जाहीररीत्या सर्वांसमोर येणं दुर्दैवी आहे. प्रत्येक पक्षाचे स्वत:चे असे काही अंतर्गत प्रश्न असतात. पक्षाचं भलं व्हावं या उद्देशानंच मी मुंबई प्रदेश अध्यक्षांना हे पत्र लिहिलं होतं. ते पत्र निकालापूर्वी आणि एक्झिट पोलपूर्वीही लिहिलं गेलं होतं. हे माझा प्रामाणिकपणा आणि निष्ठा दाखवतं," अशी प्रतिक्रिया त्यांनी स्वत: पत्राबाबत दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
 
सारवासारवीची वा वाद न वाढवण्याची भाषा आता काँग्रेसमधल्या गटांकडून करण्यात येत असली तरीही हा वाद इतक्यात संपण्याची लक्षणं नाहीत. मुंबई काँग्रेसला गटबाजीचा मोठा इतिहास आहे. नजीकच्या इतिहासात, मुरली देवरांनंतर नेतृत्वहीन झालेल्या मुंबई काँग्रेसमध्ये सतत सुरू राहिलेल्या संजय निरुपम आणि गुरुदास कामत यांच्यातल्या गटबाजीनं पक्षाची अवस्था काय केली, हे सर्वांनी पाहिलं आहे. कामतांनंतर मिलिंद देवरा आणि निरुपम असे गट पडल्याचं चित्रं आहे.
 
राज्यात विधानसभा निवडणूक उंबरठ्यावर आलेली आहे, महाराष्ट्राला नव्या प्रदेशाध्यक्ष मिळायचा आहे आणि राहुल गांधींपश्चात काँग्रेसला अध्यक्ष अद्याप निवडायचा आहे, अशा स्थितीत मुंबई काँग्रेसमध्ये सुरू झालेलं युद्ध पक्षासमोरची आव्हानं अधिक कठीण करताहेत.