भारतीय महिला क्रिकेटला खेळाडू आणि कर्णधार म्हणून मोलाचं योगदान देणाऱ्या मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
39 वर्षीय मितालीने 12 टेस्ट, 232 वनडे आणि 89 ट्वेन्टी20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. महिला क्रिकेटमधील सार्वकालीन महान फलंदाजांमध्ये मितालीची गणना होते. भारतीय महिला संघाची कर्णधार म्हणून मितालीचं महत्त्वपूर्ण योगदान आहे.
मितालीने ट्वीटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. मिताली लिहिते, "एका लहान मुलीने भारतीय संघाची जर्सी परिधान करण्याचं स्वप्न पाहिलं. देशाचं प्रतिनिधित्व करणं हा सर्वोच्च सन्मान आहे. हा प्रवास खाचखळग्यांनी भरलेला होता. प्रत्येक प्रसंगाने मला शिकवलं. 23 वर्षांचा पटांगणावरचा प्रवास समृद्ध करणारा, आव्हानात्मक आणि आनंददायी असा होता.
हा प्रवास कधीतरी संपणारच होता. आज मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे.
प्रत्येकवेळी मैदानात उतरल्यानंतर भारतीय संघाला जिंकून देण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न केला. भारतीय तिरंग्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणं सदैव स्मरणीय राहील. भारतीय संघाला आता चांगले युवा शिलेदार मिळाले आहेत. सक्षम खेळाडूंच्या हाती भारतीय संघाची धुरा आहे. त्यामुळे क्रिकेटला अलविदा करण्याची ही योग्य वेळ आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे.
खेळाडू म्हणून आणि नंतर भारतीय महिला संघाची कर्णधार म्हणून मला नेहमीच खंबीर पाठिंबा दिल्याबद्दल मी बीसीसीआय आणि सचिव जय शहा यांचे मी मनापासून आभार मानते.
अनेक वर्ष भारतीय संघाची कर्णधारपद भूषवण्याचा मोठा सन्मान मला मिळाला. या जबाबदारीने मला एक माणूस म्हणून घडवलं. भारतीय महिला क्रिकेटलाही नवा आयाम मिळाला असं मला वाटतं.
खेळाडू म्हणून माझी इनिंग्ज संपली असली तरी खेळाशी कोणत्या ना कोणत्या जबाबदारीत मी संलग्न असेन. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उन्नतीसाठी मी सदैव प्रयत्न करेन.
सदैव मला भरभरुन प्रेम आणि पाठिंबा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार" असं मितालीने म्हटलं आहे.
सर्वाधिक धावांचा विक्रम
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने शनिवारी (3 जुलै) शिरपेचात दोन विक्रमी मानाचे तुरे खोवले. महिला क्रिकेटमध्ये टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी-20 अशा तिन्ही प्रकारात मिळून सर्वाधिक धावांचा विक्रम आता मितालीच्या नावावर आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या वनडेत मितालीने नाबाद 75 धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने हा सामना जिंकला. इंग्लंडने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.
मितालीने दिमाखदार अर्धशतकासह भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या खेळीदरम्यान मितालीने या अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. 1999 साली आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या मितालीच्या नावावर आता 317 सामन्यांमध्ये 10,337 धावा आहेत.
मितालीने इंग्लंडची माजी कर्णधार शार्लेट एडवर्ड्सचा विक्रम मोडला. पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आता दोन्ही भारतीयांच्याच नावावर आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर 34,357 धावा आहेत.
मितालीच्या नावावर टेस्टमध्ये (669), वनडेत (7805)तर ट्वेन्टी-20 प्रकारात 2364 धावा आहेत.
इंग्लंडविरुद्ध विजयासह कर्णधार मिताली राज वनडेतील यशस्वी कर्णधार ठरली. मितालीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 84वा विजय मिळवला. मितालीने ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कचा विक्रम मोडला.
22 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत मितालीच्या नावावर असंख्य विक्रम आहेत. शनिवारी झालेल्या लढतीत मिताली महिला क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत सर्वोत्तम ठरली.
याच वर्षी 12 मार्च 2021 रोजी मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. अशी कामगिरी करणारी ती जगातील दुसरी तर भारताची पहिलीच क्रिकेटपटू ठरली होती.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांमध्ये एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील लखनऊमध्ये झालेल्या सामन्यात मितालीने या विक्रमाला गवसणी घातली होती.
पहिली महिला टी-20 कर्णधार
भारताचा महिला क्रिकेट संघ 2006 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळण्यासाठी उतरला होता. त्यावेळी भारताची कर्णधार मिताली राज हीच होती.
म्हणजेच भारतासाठी पहिली महिला टी-20 कर्णधार होण्याचा रेकॉर्ड मितालीच्या नावावरच कायम असेल.
टी-20 मध्ये दोन हजार धावा बनवणारी एकमेव भारतीय खेळाडू
मिताली राजच्या नावावर भारताकडून महिला टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही आहे.
तिने टी-20 सा दोन हजारपेक्षाही जास्त धावा केल्या आहेत.
भरतनाट्यम ते क्रिकेट बॅट
मितालीच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर तिने कायमच वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. 10 वर्षांची असताना भरतनाट्यम किंवा क्रिकेट यापैकी एकाची निवड करायची वेळ आली त्यावेळी तिने क्रिकेटची निवड केली.
वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी मितालीने 26 जून 1999 साली आयरलँडविरोधातल्या सामन्यात वन-डेमध्ये डेब्यू केलं होतं. त्या सामन्यातल्या आपल्या पहिल्याच डावात तिने नाबाद 144 धावा केल्या होत्या. अवघ्या दोनच वर्षात 2002 साली तिची कसोटी संघातही निवड झाली.
मितालीने आतापर्यंत 5 वर्ल्डकपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.
'हॉकी खेळणाऱ्या वाटायचो'
"कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी आणि माझी मैत्रीण आमची किट घेऊन मैदानावर जायचो त्यावेळी लोकांना वाटायचं या हॉकी खेळत असतील. कारण त्यावेळी मुलींची क्रिकेट टीम असेल, असा विचारच त्यांनी कधी केला नव्हता," असं मितालीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. दुसरीकडे घरी नातेवाईक हिचं लग्न कधी करणार म्हणून सारखी विचारपूस करायचे.
हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारता का?
एका पत्रकाराने मितालीला तुमचा सर्वात आवडता पुरूष क्रिकेटर कोणता, असा प्रश्न विचारला होता. त्यावर मितालीने ताबडतोब उत्तर दिलं, "तुम्ही कधी एखाद्या पुरूष क्रिकेटरला तुमची आवडती महिला क्रिकेटर कोण, असा प्रश्न विचारला आहे का?"
मॅचदरम्यान वाचन
क्रिकेट मॅचदरम्यान बॅटिंगची वाट बघताना कुणी पुस्तक वाचत बसलेलं तुम्ही पाहिलंय का? मिताली नियमितपणे पुस्तक वाचते. तिला ओळखणारे सांगतात की प्रत्येक मॅचममध्ये बॅटिगआधी पुस्तक वाचते.
फरक फक्त एवढाच की ती किंडलवर पुस्तक वाचायची. मात्र, वर्ल्ड कपमध्ये किंडल घेऊन जायला परवानगी नसल्याने तिने फिल्डिंग कोचकडून पुस्तक वाचायला घेतलं होतं.
खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस
काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने मिताली राज आणि रवीचंद्रन अश्विन यांची शिफारस प्रतिष्ठेच्या खेलरत्न पुरस्कारांसाठी केली आहे. क्रीडा जगतासाठी खेलरत्न पुरस्कार सर्वोत्तम मानला जातो.
मितालीच्या देदिप्यमान कारकीर्दीची दखल घेत बीसीसीआयने मितालीच्या नावाची शिफारस या पुरस्कारासाठी केली आहे. याआधी मितालीला अर्जुन आणि पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
2017मध्ये मितालीचा समावेश बीबीसीच्या 100 वुमेन मध्ये करण्यात आला होता. याच वर्षी मितालीची निवड विस्डेन पुरस्कारासाठीही झाली होती.