गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

मोबाईल क्षणभरही बाजूला ठेवावासा वाटत नाही? मग हे नक्की वाचा

लाँग बीच, कॅलिफोर्नियामधल्या आपल्या घरून जेव्हा पनामाच्या दक्षिण किनारपट्टीवरील घरात काही दिवसांसाठी जायला जेव्हा डेव्हिड एरिक्सन निघतो, तेव्हा जरा नाखुशीनेच त्याचा स्मार्टफोन तो घरी सोडतो.
 
तो जिथे जातोय तिथे वायरलेस इंटरनेट उपल्ब्ध नाही आणि फोनचा डेटाही तिथे चालत नाही. म्हणजेच मग तिथे गेल्यावर त्याला सोशल मीडिया पाहायला मिळत नाही आणि इमेल्सही पाहता येत नाही.
 
अगदी फोन करण्यासाठी किंवा घेण्यासाठीही ठराविक ठिकाणी गेल्यावरच सिग्नल मिळतो. "माझा फोन फक्त वेळ दाखवण्यापुरता उरतो," डेव्हिड म्हणतो. तो एका डिजिटल कॉन्फरन्स कॉलिंग कंपनीचा संस्थापक आहे.
 
4 दिवसांच्या या सुटीदरम्यान पहिला एक-दीड दिवस तो संपर्कक्षेत्राच्या बाहेर असल्यामुळे कासावीस असतो. डेटा कनेक्टिविटी कुठे मिळतेय का, हे तो पुन्हापुन्हा तपासून पाहतो. मंद वायरलेस कनेक्शन असलेल्या जवळच्या हॉटेलला जावं का, याचा विचार करतो.
 
जेव्हा कधी फोनला सिग्नल मिळतो, तेव्हा तो ऑफिसला फोन करण्याचा प्रयत्न करतो. यासगळ्यापासून दूर राहणं, त्याला सुरुवातीला तरी कठीण जातं. "असं वाटतं की जणू आभाळच कोसळतंय. अशी सेपरेशन अॅंक्झायटी (एखाद्या गोष्टीपासून दूर होण्याची चिंता) आपल्याला अगदी वेडं करते," तो म्हणतो.
 
चिंतेचं युग
ऑनलाईन वेळ घालवणं हे अनुत्पादक वा निष्फळ असतं, हे आपल्याला माहितीच आहे. पण ही समस्या वाढत आहे.
 
यापूर्वी कधीही लोक त्यांच्या स्मार्टफोनच्या इतके आहारी गेले नव्हते असं 2016मध्ये डिलॉईटने केलेल्या अभ्यासात म्हटलं आहेत. तर Pew Reserchनुसार फेसबुकचे 1.86 बिलियन अॅक्टिव्ह युजर्स आहेत. (म्हणजे दर सात लोकांपैकी दोघे) आणि इंटरनेट वापरणाऱ्यांपैकी 24% आता ट्विटर वापरतात, तर 29% लिंक्डइन वापरतात. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे फेसबुकने असं सांगितलं की, युजर्स सरासरी रोज 50 मिनिटं फेसबुकवर असतात.
 
पण जरी आपण काम करत असताना फेसबुकच्या चर्चांमध्ये सहभागी व्हायचं नाही, किंवा जेवणाच्या टेबलवर फोन वापरायचा नाही असं ठरवलं, तरी असे अनेकजण आहेत ज्यांना हे करणं कठीण जातं.
 
सोशल मीडियापासून दूर जाण्याने हुरहूर निर्माण होते आणि पुन्हा लॉग इन करण्याची इच्छा होते, असं बोस्टन विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक स्टेफान हॉफमन सांगतात.
 
याला डिजिटल अॅँक्झायटी म्हणता येईल. स्वतःच्या सोशल मीडिया वापराबाबतची ही दीर्घकालीन नकारात्मक भावना असते.
 
सोशल मीडियाचा वापर कमी करण्यात जर अपयश आलं तर ते अधिक निराश करणारं असतं, असं हॉफन सांगतात. ज्यांना फोनपासून दूर राहणं जमत नाही त्यांना निराश वाटण्याची शक्यता असते.
 
स्मार्ट फोनमुळे मिळालेली कनेक्टिविटी वा संपर्क आपण गमावू, अशी भीती काही जणांना असते. कारण भविष्यातले धोके किंवा राजकीय बातम्यांवर आपण नजर ठेवायला हवी, असं त्यांना वाटत असतं. हा "चिंता करण्याचा काळ" आहे असं हॉफमन म्हणतात.
 
यामागची कारणं काय?
ऑनलाईन कमी वेळ घालवावा, असं आपल्यापैकी अनेकांना वाटतं, पण फोनपासून दूर झाल्यानंतर त्यांच्यामध्ये अॅँक्झायटी (काळजी, चिंता, हुरहूर लागल्याची)ची लक्षणं दिसून येतात. फोनपासून दूर करण्यात आलेल्या तरुण मुलांपैकी जवळपास 75% मुलं अस्वस्थ होत बोटांनी चाळे करताना, किंवा खाजवताना दिसली.
 
हंगेरियन अकॅडमी ऑफ सायन्सेस आणि बुडापेस्टमधील इओटव्हॉस लोरांड युनिव्हर्सिटीने हा प्रयोग केला. आपल्याला फोनच्या वापरामध्ये बदल का करायचा आहे याची नीट कारणमीमांसा केली तर ही अस्वस्थता कमी होऊ शकते असं 'जॉय ऑफ मिसिंग आऊट' या पुस्तकाच्या लेखिका क्रिस्टिना क्रुक म्हणतात.
 
आपल्याला पटणाऱ्या एखाद्या गोष्टीसाठी किंवा गोष्टीमुळे लॉग ऑफ केल्यास परत लॉग ऑन करण्याचा मोह टाळता येऊ शकतो. उदाहरणार्थ सोशल मीडियावर कमी वेळ घालवल्याने घरच्यांसोबत किंवा मित्रांसोबत जास्त वेळ घालवता येईल, याची स्वतःलाच आठवण करून देणं.
 
फोनपासून दूर जाण्याने काही साध्य होत असेल तर त्यामुळे फोन पासून दूर गेल्यावरही कमी अस्वस्थता येते. "जर तुमच्याकडे पुरेसं चांगलं कारण नसेल तर मी तुम्ही फोनपासून दूर राहण्यासाठी फारशी इच्छाशक्ती लावणार नाही," त्या म्हणतात.
 
अशी अनेक कारणं आहेत ज्यामुळे लोकांना डिस्कनेक्ट व्हायचं नसतं. काहींना अशी भीती वाटते की यामुळे एखाद्या कार्यक्रमाला आपल्याला निमंत्रण द्यायचं राहून जाईल, किंवा मित्र आणि ओळखीच्यांबद्दलची माहिती वा चर्चा आपल्याला समजणार नाही. किंवा आपण उभी केलेल्या चांगल्या सामाजिक प्रतिमेकडे दुर्लक्ष होण्याची त्यांना भीती वाटते.
 
इतर लोक या सोशल मीडियाला चिकटून असतात कारण त्यांना त्यांच्या कामासाठी सोशल मीडियावर त्यांचा बोलबाला असणं गरजेचं असतं.
 
स्वतःशी इमानदार राहून आपण का 'लॉग इन' करत आहोत ते ठरवणं आणि आपण किती ऑनलाईन राहायचं हे ठरवणं यामुळे तुम्हाला फायदा आणि मदतही होते.
 
कॅलिफोर्नियातील रेडवुड सिटीमधील बेटरवर्क्स या सॉफ्टवेअर कंपनीचे प्रमुख क्रिस डुगान हा कामाचा तणाव घालवण्यासाठी फेसबुक पाहत. पण आता आपण तसं करत नसल्याचं ते सांगतात. "तो माझ्यासाठी एक छोटासा ब्रेक असायचा," ते सांगतात.
 
आता फेसबुकवर राजकीय पोस्ट जास्त असल्याने आपलं लक्ष भरकटतं किंवा आपण वैतागतो, असं ते सांगतात.
 
फेसबुकवर दिसणाऱ्या गोष्टींमध्ये त्यांना अजूनही रस असला तरी डुगान हे मान्य करतात की आता सोशल मीडिया त्यांच्यासाठी विरंगुळा राहिलेला नाही. यामुळेच फारसा त्रास न होता, त्यापासून दूर जाणं त्यांना शक्य झालं.
 
गेल्या महिन्यात डुगान यांच्या कंपनीने एक पाहणी केली. त्यात असं लक्षात आलं की कामगार रोज सरासरी दोन तास राजकीय पोस्ट पाहण्यात घालवतात. 25% कामगार रोजचे तीन किंवा जास्त तास सोशल मीडिया पाहतात.
 
डिजिटल डिटॉक्स करावं की नाही?
सोशल मीडियाचा पूर्णपणे वापर थांबवल्यास आपण खूप काही गमावतो आहे असं वाटून अस्वस्थता येऊ शकते. पण तरीही लहानशा कालावधीसाठी तरी सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहणं - ज्याला 'डिजिटल डिटॉक्स' म्हणतात, फायद्याचं असंत. याची मदत नवीन सवयी लावून घेण्यासाठी आणि स्वतःवर अधिक चांगला नियंत्रण ठेवण्यासाठी होत असल्याचं क्रूक सांगतात.
 
"डिजिटल डिटॉक्समुळे अस्वस्थता खरंतर कमी होऊ शकते कारण जेव्हा गोष्टी इतक्या स्पष्ट असतात, तेव्हा फारसे पर्यायच उरत नाहीत," त्या म्हणतात.
 
ऑफलाईन राहण्यासाठीची टूल्स वापरणं किंवा फोनमधून काही ऍप्स अन-इन्स्टॉल करणं हे सोशल मीडियाचा वापर मर्यादित करण्यासाठी फायद्याचं असतं. यातून फारशी अस्वस्थताही निर्माण होत नाही. संध्याकाळी फोनपासून दूर राहणं सगळ्यात कठीण असतं. म्हणूनच क्रूर रोज रात्री 8 वाजल्यानंतर स्वतःचा फोन दूर ठेवतात.
 
पण हा एकमेव पर्याय नाही. ज्यांना स्वतःचा सोशल मीडिया वापर कमी करायाचा आहे त्यांनी आपण ऑनलाईन का असतो याचा विचार करायला सुरुवात करावी असा सल्ला हॉफमन देतात. आपण नेमका वेळ कशात घालवतो, हे लक्षात आल्यास मोह टाळता येईल. पण हे कठीण असू शकतं.
 
या माध्यमातून लोक एकमेकांच्या संपर्कात येतात आणि एकटेपणावर मात करतात. पण नंतर आपण कृत्रिम संवाद साधत असल्यासारखं त्यांना वाटायला लागतं, हॉफमन सांगतात.
 
बहुतेकदा 'आपण कोणाचे तरी आहोत' ही भावना सोशल मीडियामुळे मनात निर्माण होते. यासाठी थेट कोणाशी तरी बोलण्याची गरज नसते. "हे माध्यम आहे समविचारी लोकांसोबत तुम्हाला जोडतं." ते म्हणतात. याला उपाय म्हणजे तुमच्या जिव्हाळ्याच्या याच विषयांवर प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी मार्ग शोधणं.
 
स्वतःचं अपयश विसरून जाण्यानेही मदत होते. मोहावर नियंत्रणं न ठेवू शकल्याबद्दल स्वतःला दोष देण्याऐवजी हे मान्य करा की ही अॅप्स आणि सोशल मीडिया हा लोकांनी अधीन व्हावं यासाठीच तयार करण्यात आलेला आहे.
 
सोशल मीडियाची सवय सोडून देणं कठीण असलं तरी अशक्य नाही हे स्वतःला सांगणंही फायद्याचं ठरतं.
 
"तुम्ही अपयशी होणार हे नक्की. पण हे करणं शक्य आहे यावर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे," क्रूक म्हणतात.