मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (13:41 IST)

नारायण राणेंचा आरोप : छगन भुजबळ ज्या गुन्ह्यासाठी तुरुंगात गेले, तोच गुन्हा 'मातोश्री'नं केलाय

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर अनधिकृत बांधकाम प्रकरणी करण्यात येत असलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिलं.
 
यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केल्याचं पाहायला मिळालं.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ ज्या प्रकरणात अडीच वर्षे तुरुंगात गेले, तोच गुन्हा मातोश्रीचा आहे, मग ते बाहेर कसे? असा सवाल नारायण राणेंनी यावेळी केला आहे.
 
शिवसेना नेते विनायक राऊत आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते राणेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नारायण राणे यांनी दिशा सालियन आणि सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणावरूनही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.
 
आपल्यावर होणारे आरोप हे केवळ सूडभावनेतून केले जात आहेत. मात्र मी कोणत्याही प्रकारचा नियम मोडलेला नाही. माझ्याकडे सर्वप्रकारच्या परवानगी आहेत, असं राणे म्हणाले.
 
आमच्याकडेही बरंच काही आहे, मात्र आम्ही बोलत नाही. रमेश मोरे, जयंत जाधव यांच्या हत्या कोणी केल्या. तसंच दिशा सालियन आणि सुशांत प्रकरणी अनेक प्रश्नांची उत्तरं का मिळालेली नाहीत? असा सवाल राणेंनी केला.
 
सर्व बांधकाम नियमानुसारच-राणे
राणे यांनी त्याच्या घराच्या बांधकामाबाबत करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहे. या इमारतीचे आर्किटेक्ट हे नामांकित आहेत. 13-14 वर्षे बांधकामाला झाली आहेत. त्यानंतर एक इंचही बांधकाम केलं नसल्याचं स्पष्टीकरण राणेंनी दिलं.
 
"नियमानुसार बांधकाम करून आम्हाला ताबा देण्यात आला. मनापानं सर्व मंजुरी दिलेल्या आहेत. 100 टक्के कायदेशीर काम केलं आहे," असं राणे म्हणाले.
 
आम्ही घरात केवळ 8 मुलं राहतो. त्यामुळं अधिक बांधकाम करण्याची गरजच पडलेली नाही. ही निवासी इमारत आहे. व्यावसायिक वापर नाही. पण शिवसेना आणि मातोश्रीकडून काही लोकांना सांगून तक्रार मुद्दाम करायला लावण्यात आली," असा आरोप राणेंनी केला आहे.
 
मातोश्रीच्या बांधकामाचं काय?
बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी शिवसेना सुरू केली. पण आता शिवसेनेचे प्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर उठले आहेत, असं राणे म्हणाले.
 
त्यांनी मातोश्रीची दुरुस्ती केली, मातोश्री पार्ट 2 बांधली. शिवसेना आणि भाजपची सत्ता असताना पैसे भरून बेकायदेशीर बांधकाम हे नियमित करून घेतलं असा आरोपही राणेंनी केला.
राजकीय सूडबुद्धीनं अशाप्रकारे तक्रारी करण्याचं चक्र शिवसेनेनं सुरू ठेवलं आहे. शिवसेनाप्रमुख असतानाच या इमारतीचं बांधकाम सुरू केलं होतं. त्यांना माहिती होतं. ते हयात असते तर गृहप्रवेशाला आले असते, असंही राणे म्हणाले.
 
"आज शिवजयंती आहे. मी शिवरायांना नमन करतो आणि अशा प्रकारे कट कारस्थान करणाऱ्यांकडे सत्ता ठेवू नका अशी शिवरायांचरणी प्रार्थना करतो," असंही राणे म्हणाले
 
दिशा सालियन, सुशांतप्रकरणी आरोप
नारायण राणे यांनी पुन्हा एकदा दिशा सालियन आणि सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले.
 
"दिशा सालियनचा बलात्कार करून हत्या झाली आणि आत्महत्या असल्याचं सांगितलं. ती आत्महत्या का करेल? त्या रात्री तिथ कोण कोण होतं? तिच्यावर बलात्कार होताना बाहेर कोणासाठी सेक्युरीटी होती? दिशाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्याप का आलेला नाही. तिचा मृत्यू झाला त्या दिवसाची सोसायटीमधली एन्ट्री रजिस्टरची पानं कोणी फाडली?," असं राणे म्हणाले.
दिशा आणि सुशांत मित्र होते. सुशांतसिंह राजपूतला तिच्या हत्येबाबत कळलं तेव्हा तो, मी यांना सोडणार नाही, असं कुठंतरी बोलला होता. त्यानंतर काही लोक त्याच्या घरी गेले. घरी बाचाबाची झाली त्यात त्याची हत्या करण्यात आली, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
 
हे सर्व घडलं तेव्हा तिथं कोणत्या मंत्र्याची गाडी होती? तिथलं सीसीटिव्ही फुटेज कुठं गेलं? आधी कॅमेरे होते, असं लोक सांगतात. त्या रात्री का नव्हते? असेही प्रश्न राणेंनी उपस्थित केले.
 
तिथं ठरावीक अॅम्बयुलन्सच का आली? हॉस्पिटलला कोणी नेलं? पुरावे कोणी नष्ट केले? याची चौकशी होईल. यात असलेले अधिकारीही त्यांच्यासोबत राहिले नाहीत, तेही सगळं उघडं पाडतील, असं राणे म्हणाले.
 
'मुख्यमंत्र्यांना उभंही राहता येत नाही'
मुख्यमंत्री स्वतः कशावरही बोलत नाहीत. गेल्या सव्वादोन वर्षात मराठी माणसांसाठी काय केलं? त्यामुळं अशाप्रकारचे इतर विषय ते काढतात असा आरोप राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला.
 
मी कुणाच्या आजारपणावर बोलणार नाही. पण त्यांच्याजागी दुसरा व्यक्ती असता तर पदावर राहिला नसता. राजीनामा दिला असता. त्यांना तर आता उभं राहायला दोन-दोन माणसं लागतात, असं राणे म्हणाले.
 
मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाही, बैठकांना जात नाही, सभागृहात जात नाही असा मुख्यमंत्री झाला याची इतिहासात नोंद होईल. गुणवत्ता आणि पात्रता नसताना सव्वादोन वर्ष केवळ त्यांन बाळासाहेबांच्या पुण्याईवर काढली, असंही ते म्हणाले.