सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 18 सप्टेंबर 2019 (10:12 IST)

नरेंद्र मोदींचं 500 रुपयांचं उपरणं 11 कोटी रुपयांना विकलं गेलं? - बीबीसी फॅक्ट चेक

फॅक्ट चेक टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून मिळालेल्या वस्तूंचा लिलाव झाला. लिलावात मोदींच्या 500 रुपयांच्या उपरण्याला 11 कोटी रुपये मिळाल्याचा दावा केला जात आहे. लिलावातून मिळालेले पैसे पंतप्रधान मदतनिधीमध्ये दान करण्यात आले अशीही चर्चा आहे. काय आहे नेमकं सत्य?
 
उजव्या विचारसरणीच्या शेकडो फेसबुक आणि ट्वीटर युझर्सनी या दाव्यासह फोटो आणि व्हीडिओ पोस्ट केले आहेत. यामध्ये पंतप्रधान मोदींना अवतार पुरुष म्हटलं आहे. व्हॉट्सअपवरही हे मेसेज वेगाने पसरत आहेत. बीबीसीच्या असंख्य वाचकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला मेसेज करत यामागची सत्यता विचारली आहे.
राजधानी दिल्लीस्थित राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात पंतप्रधान मोदींना मिळालेल्या 2772 भेटवस्तूंचं प्रदर्शन सुरू आहे. इंटरनेटच्या माध्यमातून या भेटवस्तूंचा लिलाव होतो आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी या प्रदर्शनाचं 14 सप्टेंबर 2019 रोजी उद्घाटन केलं. "भेटवस्तूंमध्ये पेंटिंग्स, स्मृतिचिन्ह, मूर्ती, शाली, पगड्या, जॅकेट्स, पारंपरिक वाद्यं यांचा समावेश आहे. 200 रुपयांपासून दीड लाखांपर्यंत वस्तूंच्या किंमती आहेत. सरकारी वेबसाईट pmmementos.gov.in यावर वस्तूंसाठी बोली लावता येऊ शकते," असं पटेल यांनी सांगितलं.
 
सोशल मीडियावर व्हायरल झालेलं कथित 11 कोटी रुपयांच्या गमछाचं प्रकरण खोटं असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
सांस्कृतिक मंत्रालयानुसार, 3 ऑक्टोबर 2019 पर्यंत सुरू राहणाऱ्या या वस्तूंच्या लिलावात कोणतीही वस्तू 11 कोटींना विकली गेलेली नाही.
 
पंतप्रधान मदतनिधीला दान
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे महासंचालक अरविंद जैन यांनी लिलावाच्या नियमांबद्दल बीबीसीला माहिती दिली. ते म्हणाले, "सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत येणारं राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय पंतप्रधानांना मिळालेल्या काही निवडक वस्तूंचा ऑनलाईन लिलाव करतं. केवळ भारतीय नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतात. लिलावाद्वारे विकण्यात आलेली वस्तू केवळ भारतातच पाठवली जाऊ शकते."
लिलावातून जो पैसा मिळतो तो गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी केंद्र सरकारच्या 'नमामि गंगे' अभियानासाठी उपयोगात आणला जाईल असं त्यांनी सांगितलं.
 
लिलावातून मिळालेली रक्कम पंतप्रधान मदतनिधीला दान करण्यात येत आहे या दाव्याबाबत जैन म्हणतात, पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावातून उभी राहणारी रक्कम अन्य कोणत्याही अभियानासाठी दिली जाऊ शकत नाही. सात महिन्यांपूर्वी जो लिलाव करण्यात आला, त्यातून निर्माण झालेली रक्कम नमामि गंगे अभियानासाठीच उपयोगात आणली गेली.
 
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 27 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2019 या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावासंदर्भात सगळी माहिती pmmementos.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
 
कलशाचा एक कोटीला लिलाव
सरकारी वेबसाईट pmmementos.gov.in नुसार लिलावाच्या माध्यमातून 16 सप्टेंबर 2019 पर्यंत सर्वाधिक बोली एक कोटी तीनशे रुपयांची लागली होती.
चांदीच्या कलशासाठी ही बोली लागली होती. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मोदींना हा कलश भेट म्हणून दिला होता.
 
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने कलशाची मूलभूत किंमत 18,000 इतकी निश्चित केली होती.
 
सध्या लिलावात पंतप्रधान मोदींना मिळालेल्या एका नारंगी वस्त्राची किंमत 60 हजार रुपये आहे. या वस्त्राला मिळालेली ही सर्वाधिक रकमेची बोली आहे.
 
पंतप्रधान मोदींच्या वस्त्रप्रावरणांना चांगली बोली लागू शकते, असं सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. 3 ऑक्टोबरपर्यंत हा लिलाव सुरू राहणार आहे.
 
सरकारी वेबसाईटनुसार, 9 फेब्रुवारी 2019 रोजी मोदींना मिळालेल्या एका सिल्क कपड्याच्या शालीला सहा लाखांची किंमत मिळाली होती.
 
वेबसाईटवर तांत्रिक चूक
इंटरनेटवर यासंदर्भात शोधताना 'दैनिक जागरण'सहित अन्य काही वेबसाईट्सने 15 सप्टेंबर 2019 रोजी एक वृत्त दिलं होतं. त्यानुसार पंतप्रधान मोदींच्या पाचशे रुपयांच्या गमछ्याला 11 कोटी रुपयांचा बोली लागल्याचं म्हटलं होतं.
 
हे सोशल मीडियावर वेबसाईट्सच्या स्क्रीनशॉटसह भ्रामक दाव्यांसह शेअर करण्यात येत आहे.
 
यासंदर्भात आम्ही राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या कार्यालयाशी संपर्क केला. त्यांनी सांगितलं, pmmementos.gov.in या वेबसाईवर तांत्रिक चूक झाल्याने लिलावातल्या एका वस्त्राची किंमत 11 कोटी दाखवण्यात येत होतं. अन्य काही वस्तूंच्या किंमतीबाबतही गडबड झाली होती. प्रसारमाध्यमांमध्ये जिथे जिथे बातम्या छापून आल्या आहे, त्यांना सुधारित बातमी देण्यास सांगितलं आहे.
 
राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयानुसार, संयुक्त सचिव प्रणव खुल्लर पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंच्या लिलावाचं काम बघत आहेत.
 
बीबीसीने मंगळवारी खुल्लर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांचं उत्तर मिळताच, तेही बातमीत सामील करू.