शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जुलै 2022 (20:19 IST)

नरेंद्र मोदी - उद्धव ठाकरेंच्या 'त्या' भेटीत युतीची चर्चा झाली होती – राहुल शेवाळे

eaknath shinde
उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसारच आम्ही भाजपबरोबर जात आहोत, असा दावा यावेळी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे.
 
उद्धव ठाकरे युतीसाठी अनुकूल आहेत, त्यांनी भाजपबरोबर पुन्हा युतीसाठी प्रयत्न केला होता, असा दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे.
 
गेल्या जून महिन्यामध्ये उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आले होते. त्यावेळी मोदी आणि ठाकरेंमध्ये 1 तास चर्चा झाली होती, ती चर्चा युतीसाठीच झाली होती, असासुद्धा दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे.
 
पण नंतर भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनानंतर मात्र तो प्रयत्न बारगळला, असंही राहुल शेवाळे यांनी सांगितलं आहे.
 
एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झालेल्या शिवसेनेच्या 12 खासदारांनी नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेचे लोकसभेत 18 खासदार आहेत. त्यापैकी 12 खासदार आता शिंदे गटात गेले आहेत.
 
"आम्ही शिवसेनाच आहोत, आम्ही पूर्वी देखील एनडीएत होतो आता देखील आहोत," असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलंय.
 
एनडीएच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देऊ असं यावेळी राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केलं आहे. आम्ही कुठलाही गट स्थापन केलेला नाही, आम्ही फक्त नेता बदलेला आहे, असं राहुल शेवाळे यांनी म्हटलंय.
 
तसंच मी भाजपबरोबर जाण्याचा प्रयत्न केला आता तुम्हीसुद्धा तुमच्या परीने प्रयत्न करा, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे, असं राहुल शेवाळे यांनी म्हटलंय.
 
लोकसभा अध्यक्षांची शेवाळेंच्या नियुक्तीला मान्यता
 
12 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे शिवसेना गट तयार करून पत्र दिलं आहे. तसंच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल शेवाळे यांच्या गटनेतेपदाला मान्यता दिल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
 
दिल्लीत येण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे बुधवारी ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. त्यासंबंधी तज्ज्ञांसोबत बैठक, चर्चा करण्यासाठीही मी दिल्लीत आलो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
 
"बाळासाहेबांचे विचार, आमचे गुरूवर्य आनंद दिघे यांचे विचार घेऊन आम्ही महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार स्थापन केलं. जी भूमिका आम्ही 50 आमदारांनी घेतली, त्याचं समर्थन राज्यभरातून शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केलंच आहे. पण महाराष्ट्रातल्या जनतेनंही केलं आहे. सरकार स्थापनेनंतर आम्ही अनेक निर्णय तातडीने घ्यायलाही सुरूवात केली आहे," असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
 
"केंद्र सरकारचा पूर्ण पाठिंबा महाराष्ट्राच्या सरकारला आहे. पंतप्रधानांनी सांगितलं आहे की, राज्याच्या विकासासाठी कुठेही काही कमी पडू देणार नाही," असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
 
एकनाथ शिंदेंसोबत 'हे' 12 खासदार
हेमंत गोडसे
हेमंत पाटील
राजेंद्र गावित
संजय मंडलीक
श्रीकांत शिंदे
श्रीरंग बारणे
राहुल शेवाळे
प्रतापराव जाधव
धैर्यशील माने
कृपाल तुमाने
भावना गवळी
सदाशिव लोखंडे
राहुल शेवाळे आमचे गटनेते बनले आहेत. भावना गवळी आमच्या प्रतोद आहेत. त्यांचं स्वागत करतो, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.