रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 15 जानेवारी 2022 (22:56 IST)

Omicron Covid : कोरोनाची जागतिक साथ अखेरच्या टप्प्यात प्रवेश करत आहे का?

कोरोनाची साथ संपली आहे का? किंवा मला पुन्हा पूर्वीप्रमाणं माझं जीवन कधी सुरू करू शकेन? या प्रश्नांनी गेल्या दोन वर्षांत कोण वैतागलेलं नाही? मला माहिती आहे, कारण मी वैतागलो आहे.
पण वरच्या प्रश्नांची उत्तरं सांगायची झाल्यास, लवकरच असं म्हणता येईल.
कोरोनाच्या साथीच्या अखेरीच्या टप्प्यात ओमिक्रॉन आणखी काही प्रमाणात नुकसान पोहोचवू शकतो, अशी शक्यता वाढू लागली आहे.
पण, पुढं नेमकं काय मांडून ठेवलं आहे? कोरोनाचा विषाणू अगदी चुटकीसरशी तर नाहीसा होणार नाही. त्याऐवजी नवीन शब्द आपल्याला अंगवळणी पडेल तो म्हणजे "एंडेमिक" (Endemic). त्याचा अर्थ म्हणजे कोव्हिड हा कायम आपल्याबरोबर राहणार यात शंका नाही.
त्यामुळं एक नवीन कोव्हिड युग लवकरच येणार आहे. पण त्याचा आपल्या जीवनात नेमका कसा अर्थ असणार आहे? हाही प्रश्न आहे.
"आपण अगदी या टप्प्यावर पोहोचलो आहोत. किमान युकेमध्ये तरी, ही जवळपास शेवटाची सुरुवात आहे," असं लिव्हरपूल युनिव्हर्सिटीचे साथ आणि जागतिक आरोग्य विषयाचे प्राध्यापक ज्युलियन हिसकॉक्स म्हणाले.
"मला वाटतं 2022 मधलं जीवन हे पुन्हा एकदा कोरोना पूर्वीच्या जीवनाप्रमाणे असेल."
जर काही बदलत असेल, तर ती म्हणजे आपली रोग प्रतिकार क्षमता. कोरोनाचा हा नवा विषाणू दोन वर्षांपूर्वी वुहानमध्ये आढळून आला आणि संपूर्ण जगाला धोका निर्माण झाला. आपल्या प्रतिकार यंत्रणेसाठी हा पूर्णपणे नवा व्हायरस होता आणि पूर्वी कधीही असा अनुभव नव्हता. शिवाय आपल्याकडे यावर औषधं किंवा लसही उपलब्ध नव्हती.
या सर्वाचा परिणाम म्हणजे अगदी फटाक्यांच्या कारखान्यात आगीच्या ठिणग्या टाकण्यासारखा झाला. कोव्हिड अत्यंत स्फोटकपणे जगभरात पसरला. पण त्या आगीची तीव्रता कायम तशीच राहिली नाही.
यामध्ये दोन पर्याय होते. एक तर आपण जसा पश्चिम आफ्रिकेतील इबोला नष्ट केला तसा कोव्हिड पूर्णपणे नष्ट करू किंवा तो गतप्राण होईल आणि दीर्घकाळ आपल्याबरोबरच राहील. तो सर्दी, एचआयव्ही, गोवर, मलेरिया आणि टीबी अशा नेहमीच्या रोगांच्या गटामध्ये सहभागी होईल.
तुम्ही आजारी आहात हे कळण्याआधीच हवेत पसरणारा हा विषाणू म्हणजे, अनेकांसाठी जणू अपरिहार्यपणे नशिबातच लिहिलेला होता. हा विषाणू कायमचा इथंच राहील असंच यासाठी लिखित असावं, असं लंडनच्या सेंट जॉर्ज युनिव्हर्सिटीतील विषाणू शास्त्रज्ञ डॉक्टर एलिसाबेट्टा ग्रोपेल्ली या म्हणाल्या.
"मी खूपच आशावादी आहे. लवकरच अशी परिस्थिती असेल की, विषाणूचा प्रसार होत असेल आणि धोका असलेल्यांची आपण त्यापासून काळजी घेत असू. पण इतर कोणालाही त्याची लागण होऊ शकते, हे आपण स्वीकारू. तसंचं यातून साधारणपणे लोकही बरे होत राहतील," असं त्या म्हणतात.
रोगांच्या प्रसाराचा अभ्यास करणारे एपिडेमिओलॉजिस्ट हे एखाद्या रोगाची पातळी ही सातत्यपूर्ण आणि अंदाज लावण्यासारखी असेल तर त्याला Endemic (कायम आपल्याबरोबर राहणारा) म्हणतात.
मात्र, लंडनच्या इम्पेरियल कॉलेजमधील एपिडेमिओलॉजिस्ट प्राध्यापिका अझरा घनी यांच्या मते, इतर लोक याचा अर्थ कोव्हिड अजूनही आपल्या आजुबाजूला आहे असा लावत आहे, पण आता आपल्याला दैनंदिन जीवनात बंधन लावण्याची गरज नसेल.
आपण लवकर त्या स्थितीपर्यंत पोहोचू असं त्यांना वाटतं. "यात बराच वेळ गेला असं वाटत आहे. मात्र अवघ्या एका वर्षापूर्वी आपण लसीकरणाला सुरुवात केली आहे आणि त्यामुळं आपण बऱ्याच अंशी यातून मुक्त झालो आहोत."
यात एकच भीती आहे ती म्हणजे अशा अनपेक्षित नव्या व्हेरिएंटची जो ओमिक्रॉनला मागे टाकून अधिक गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरू शकतो.
 
मग यापुढे कोव्हिड किती गंभीर?
हेही लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की, एंडेमिक हा आपोआप सौम्य होत नाही. आपल्याकडे यापूर्वी यापेक्षाही घातक असे आजार होते जे आता एंडेमिक आहेत, असं प्राध्यापिका घनी म्हणाल्या. कांजिण्या हा हजारो वर्ष राहिलेला एंडेमिक आहे. त्याची लागण झालेल्यांपैकी एक तृतीयांश लोकांचा बळी गेला आहे. मलेरियाही एंडेमिक आहे आणि त्यामुळं दरवर्षी जवळपास 6 लाख मृत्यू होतात.
पण, आपलं शरीर कोव्हिडशी लढा देण्यासाठी सज्ज झाल्यानं हा कमी घातक ठरत असल्याचं आपल्याला याआधीच दिसून येऊ लागलं आहे.
युकेमध्ये लसीकरण मोहीम, बूस्टर लस मोहीम आणि कोव्हिडच्या लाटा यात चार वेगवेगळ्या व्हेरिएंट्सचा समावेश आढळून आला.
"जेव्हा ऑमिक्रॉनचं अस्तित्व संपेल आणि आपण पुढे जाऊ तेव्हा युकेमध्ये किमान काही काळासाठी तरी प्रतिकार शक्ती ही जास्त असेल," असं एडिनबर्ग विद्यापीठातील इम्युनॉलॉजिस्ट प्राध्यापक एलेनॉर रिले म्हणाले.
प्रातिनिधिक छायाचित्र
मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या संसर्गाची किंमतही मोजावी लागली आहे. युकेचा विचार करता 1,50,000 पेक्षा अधिक मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तर भारतात आतापर्यंत कोरोनामुळं झालेल्या मृत्यूचा आकडा 4,85,000 पेक्षा अधिक झाला आहे.
पण त्यानं प्रतिकार शक्तीच्या माध्यमातून संरक्षक वारसा मागे ठेवला आहे. ही प्रतिकार शक्ती कमी होईल म्हणून भविष्यात आपल्याला कोव्हिड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, त्यामुळं गंभीर आजारी पडण्याचा धोका नक्कीच कमी होईल.
याचा अर्थ बहुतांश लोक हे गंभीर आजारी पडणार नाहीत, असं प्राध्यापक हिसकॉक्स यांनी म्हटलं. ते सध्या सरकारच्या नव्यानं समोर येणाऱ्या रेस्पिरेटरी व्हायरस थ्रेट्स अॅडव्हायजरी ग्रुपचं काम पाहतात.
"जुने किंवा नवे व्हेरिएंट एकत्र आले तरी, आपल्यापैकी बहुतांश जणांना सामान्य कोरोना विषाणूसारखी सर्दी होईल, नाक चोंदणं किंवा डोकेदुखीसारखा त्रास होईल आणि काही काळानं तुम्ही बरे व्हाल
 
आपल्या जीवनाच्या दृष्टीने याचा अर्थ काय?
असेही काही लोक असतील ज्यांचा या एंडेमिक कोव्हिडमुळं मृत्यू होईल. पण त्यात प्रामुख्यानं वृद्ध आणि धोका असलेल्यांचा समावेश असेल. त्यामुळं याच्यासह आपण कसं जगायचं, काय काळजी घ्यायची याबाबत अजूनही निर्णय व्हायचा आहे.
"तुम्हाला कोव्हिडमुळं शून्य मृत्यू व्हावे असं अपेक्षित असेल तर, आपण निर्बंधाचा हा संपूर्ण खेळ पाहतच आहोत, आणि तो सुरुच राहणार आहे," असं प्राध्यापक हिसकॉक्स सांगतात.
मात्र, युकेमध्ये प्रचंड थंडीच्या मोसमात फ्लूमुळं दिवसाला 200-300 जणांचा मृत्यू होतात. तरीही कोणीही मास्क परिधान करत नाही किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही, असं ते म्हणाले.
लॉकडाऊन आणि मोठ्या प्रमाणावर गर्दीच्या कार्यक्रमावरील निर्बंध पुन्हा येणार नाहीत. तसंच कोरोनासाठी मोठ्या प्रमाणावर टेस्टिंगही यावर्षी संपेल अशी आशाही ते व्यक्त करतात.
युकेमध्ये भविष्यातील उपाययोजनेचा विचार करता धोका असलेल्यांसाठी थंडीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीनं लसीचा बूस्टर डोस उपलब्ध करून दिला जाणार आहे. भारतातही धोका असलेल्यांना बूस्टर डोस दिला जात आहे.
"आपण हे मान्य करायला हवं की, आपला फ्लूचा हंगामदेखील (युकेमधील) कोरोनाचा हंगाम ठरू शकतो आणि हे आपल्यासमोरचं मोठं आव्हान असेल," असं डॉ. ग्रोपेल्ली म्हणाले.
फ्लू आणि कोव्हिडनं मृत्यू होणारे सारखेच आहेत, पण हिवाळा किती कडाक्याचा राहणार हे अद्याप अनिश्चित आहे. मात्र, तुम्हाला दोन वेळा मरण येऊ शकत नाही, अशा पद्धतीनं शास्त्रज्ञ याची मांडणी करत आहेत.
प्राध्यापक रिले यांच्या मते, ओमिक्रॉननंतर आपल्याला मास्क परिधान करण्याची सक्ती केली जाणार नाही. मात्र, तरीही ते आपल्याला सर्वसाधारण चित्र दिसेल. कारण ते आशियाच्या काही भागात असून लोक गर्दीच्या ठिकाणी ते परिधान करण्याचा पर्याय निवडतात.
"संभाव्य स्थितीचा विचार करता हिवाळ्याच्या तोंडावर 2019 पेक्षा वेगळी स्थिती नसेल. कारण त्यावेळीही आपण सगळे फ्लूच्या लसीसाठी सज्ज होतो," असंही त्यांनी म्हटलं.
 
इतर जगाचं काय?
लसीकरण आणि मोठ्या प्रमाणावर लागण झालेली असल्यामुळं इतर जगाच्या तुलनेत युके पुढं आहे. मात्र, इतर ठिकाणी लगेचच नजीकच्या काळात ही साथ संपणार याची शक्यता कमी आहे.
गरीब देशांमध्ये अजूनही सर्वात असुरक्षित लोकांचं लसीकरण झालेलं नाही. दरम्यान, ज्या देशांनी कोव्हिड विरोधी शस्त्र सज्ज ठेवली तिथं कमी मृत्यू झाले. मात्र, त्याठिकाणच्या लोकसंख्येतील प्रतिकार शक्तीदेखील कमीच आहे.
कोव्हिडचं एंडेमिक असं वर्णन करण्याची स्थिती येण्यापासून जग अद्याप बरंच दूर आहे, असं जागतिक आरोग्य संघटेननंही स्पष्ट केलं आहे.
"जगासाठी अजूनही ही साथ कायम असून, तीव्र आणीबाणीची स्थिती आहे," असं डॉ. ग्रोपेल्ली म्हणाले.