मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जून 2022 (10:27 IST)

अग्निपथ योजनेला 'या' 6 कारणांमुळे तरुणांचा विरोध आणि जाळपोळ

भारत सरकारने आणलेल्या 'अग्निपथ योजने'ला आता देशभरातून विरोध होताना दिसत आहे. खास करून उत्तर भारतात, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि आसाममध्ये तरुणांनी या योजनेला विरोध केला आहे.
 
अनेक ठिकाणी तरुणांनी रस्त्यावर उतरून त्याविरोधात घोषणाबाजी आणि जाळपोळ केली आहे. पण तरुणांच्या विरोधाची कारणं काय आहेत हे पाहाण्याआधी ही योजना काय आहे हे पाहूया...
अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात काम करता येणार आहे. या 'अग्निवीरांना' संरक्षण मंत्रालयाकडून आकर्षक आर्थिक मानधन आणि सोयी-सुविधाही दिल्या जाणार आहेत.
 
बिहारमधल्या आरा रेल्वे स्टेशनवर संतप्त विद्यार्थ्यांनी तोडफोड केली आहे. विद्यार्थ्यांनी बुकिंग ऑफिस तोडलं. या आंदोलनात काही अराजकतत्वांनी स्टेशनमध्ये असलेल्या दुकानांमध्ये लूटमार केल्याचं वृत्त आहे. पाणी वेंडिंग मशिनसुद्धा तोडण्यात आलं आहे. सकाळपासूनच विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आरा स्टेशनमध्ये जमले आहेत. परिणामी आरामधली रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.
 
हातात तिरंगा झेंडा घेऊन विद्यार्थी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत. काही विद्यार्थ्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उभ्या असलेल्या ट्रेनवर दगडफेकसुद्धा केली. आता स्टेशन परिसर खाली करण्यात आल्याचं स्थानिक पत्रकार नेहा गुप्ता यांनी सांगितलं आहे. आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकच्या कड्या काढल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
 
अग्निपथ योजनेसाठीची पात्रता
भरती होण्यासाठीची वयोमर्यादा- 17 ते 21 वर्षं
शैक्षणिक योग्यता 10वी किंवा 12वी पास
 
काय आहे अग्निपथ योजना?
 
अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात 4 वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीवर काम करता येणार. चार वर्षांसाठी काम करणाऱ्या या सैनिकांना 'अग्निवीर' म्हटलं जाईल. ही स्थायी स्वरुपाची सेवा नसेल.
निवड झालेल्या तरुणांना पहिले सहा महिने प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तर उरलेले साडेतीन वर्षं त्यांना सेवेची संधी मिळणार आहे.
4 वर्षांनंतर या अग्निवीरांना निवृत्त केले जाईल. मात्र, यातील 25 टक्के तरुणांना पुन्हा सेवेत घेतले जाईल. त्यासाठी त्यांना आणखी सहा महिन्यांचं स्वतंत्र प्रशिक्षण दिले जाईल. कामगिरीच्या आधारावर 25 टक्के तरुणांची निवड केली जाईल.
उतलेल्या 75 टक्के तरुणांना लष्कराकडून स्किल सर्टिफिकेट दिलं जाईल. वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी त्याचा फायदा होईल. ( राज्य सरकारं त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या सेवांमध्ये नोकरी देऊ शकतात. )
पहिल्या 4 वर्षांचा कालावधी संपल्यानंतर पुढच्या 90 दिवसांत म्हणजे तीन महिन्यात अग्निपथ योजनेअंतर्गत पुन्हा भरती सुरू होईल.
वय वर्षे 17 ते 21 दरम्यानच्या तरुणांना या अग्निपथ योजनेचा लाभ घेऊन सैन्यात चार वर्षांसाठी भरती होता येईल.
या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी महिन्याकाठी 30 हजार रुपये, तर चौथ्या वर्षी यात वाढ होऊन 40 हजार रुपये वेतन मिळेल.
या योजनेअंतर्गत काम करत असताना जर अग्निवीरानं सर्वोच्च बलिदान दिलं, तर विम्याची मदत दिली जाईल, तसंच कुटुंबाला एक कोटींची आर्थिक मदत आणि संपूर्ण सेवानिधी त्यांना दिला जाईल.
 
अग्निपथ योजनेसमोर अनेक आव्हानं असल्याचं आता समोर येत आहे. या आव्हानांमुळेच तरुणांनी अग्निपथ योजनेविरोधात आवाज उठवला आहे.
 
अग्निपथ योजनेसमोरील आव्हानं-
अग्निपथ योजना ही सैन्य दलातली अतिरिक्त भरती योजना नाही. हा एक प्रकारे आधीच्या भरती योजनेत केला बदल आहे.
आतापर्यंत सैन्य प्रशिक्षण कालावधी साधारण 2 वर्षांचा असायचा आता तो सहा महिन्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय लष्कराच्या क्षमतेच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात.
लष्करी आणि शस्त्रास्त्र चालवण्याचं प्रशिक्षण घेतलेल्या तरूणांना 4 वर्षांनंतर पुन्हा समाजात कसं सामावून घेतलं जाणार यासाठी ठोस योजना नाही.
हे तरूण नक्षलवाद, देशविघातक शक्ती किंवा धार्मिक हिंसा करणाऱ्यांच्या हाती लागले तर ते देशासाठी खतरा निर्माण करू शकतात, अश भीती निवृत्त कर्नल सतीश ढगे यांनी व्यक्त केली आहे.
उमेदीची 4 वर्षं लष्करात गेल्यानंर पुढे काय करायचं असा प्रश्न तरुणांपुढे उभा राहू शकतो.
अग्निपथ योजनेतून फक्त शिपाईपदाचीच भरती होणार आहे. या योजनेतून कुठल्याही अधिकारीपदाची भरती किंवा नियुक्ती होणार नाही.
राजस्थानमध्ये तरुणांचा 'रास्ता रोको'
 
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये तरुणांनी केंद्र सरकारच्या या योजनेचा निषेध करत रस्ता आणि महामार्ग रोखून धरला.
 
बीबीसी हिंदीचे सहकारी मोहर सिंग मीणा यांनी सांगितलं की, बराच अवधी लोटला पण सरकारने भरतीची जाहिरात काढली नव्हती म्हणून रास्ता रोको करणाऱ्या तरुणांमध्ये अस्वस्थता पसरली होती. या सोबतच या योजनेंतर्गत मिळणाऱ्या नोकरीच्या सेवा कालावधीबाबतही तरुणांमध्ये असंतोष आहे.
 
केंद्र सरकारने 'अग्निपथ' योजना मागे घ्यावी, अशी मागणी या तरुणांनी केली आहे. या योजनेमुळे देशसेवेची भावना असलेल्या तरुणांचं भवितव्य अंधारात जाणार असल्याचे ते म्हणतात.
 
लष्करात ही कंत्राटी पद्धतीने भरती झाल्यास देशाच्या संरक्षण व्यवस्थेप्रति आस्था राहणार नाही असं या तरुणांचे म्हणणं आहे.
 
कर्धनी पोलिस स्टेशनचे इंचार्ज बनवारीलाल मीणा बीबीसीशी बोलताना म्हणाले की, "लष्कर भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांनी रस्ता जाम केला होता. त्यांना समजावून सांगून हा जाम खुला करण्यात आला आहे. या संदर्भात कोणालाही अटक किंवा ताब्यात घेतलेलं नाही."
 
बिहारमधील आंदोलनात काय झालं?
बीबीसी हिंदीचे सहकारी सीटू तिवारी सांगतात की, या प्रकरणी बिहारची राजधानी पाटणापासून बेगुसराय, बक्सर आणि मुझफ्फरपूरपर्यंत निदर्शने करण्यात आली.
या योजनेला विरोध करणारे तत्वीर सिंह म्हणतात, "दोन वर्षांपूर्वी मेडिकल आणि फिजिकल पात्रता पूर्ण केली आहे. अजूनही एक्झाम पेंडिंग आहे. दोन-तीन वेळा ऍडमिट कार्ड आलं, त्यानंतर आता चार वर्षांसाठी परीक्षा रद्द करून पुनर्नियुक्ती करत आहेत. पेन्शन वैगरे सगळं बंद करणार आहेत. हेच नेत्यांचं बघाल तर, एक नेता तीनवेळा पेन्शन घेतो."
 
रंजन तिवारी नावाचा एक तरुण सांगतो, "अनेक मुलं तयारी करत आहेत, पण कोणती व्हेकेंसीच नाहीये. भरती सुरू नाही. बेरोजगार माणूस रस्त्यावर नाही तर कुठे उतरणार."
 
आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी ही या योजनेला विरोध केला. ते म्हणाले, "देशातील सर्वात मोठ्या नोकरदार असलेल्या सेवांमध्ये "भारतीय रेल्वे आणि भारतीय लष्कर" जर कंत्राटी पध्दतीची, नागरी सेवेतील लॅटरल एन्ट्रीच्या नावावर नोकऱ्या दिल्या जात असतील तर सुशिक्षित तरुण काय करतील? चार वर्षांच्या कंत्राटी नोकरीसाठी, भविष्यात भाजप सरकारच्या भांडवलदार मित्रांच्या धंद्याचे रक्षण करण्यासाठी तरुणांनी अभ्यास करावा का? बेरोजगार तरुणांच्या लढ्यात आम्ही सोबत आहोत. बेरोजगारी दूर करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. जेव्हा तरुणांच्या हातात नियमित नोकऱ्या येतील तेव्हाच देश सुखी होईल."
 
आसाममधील तरुणांची ही संतप्त प्रतिक्रिया
आसामच्या जोरहाट येथील बीबीसीचे सहकारी दिलीप शर्मा यांनी स्थानिक तरुणांशी बोलून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
भारतीय सैन्यात अल्पकालीन नियुक्तीसाठी 'अग्निपथ' योजना जाहीर झाल्यानंतर, सैन्यभरतीची तयारी करणाऱ्या आसाममधील अनेक तरुणांमध्ये निराशा पसरली आहे.
 
गेल्या दोन वर्षांपासून मरियानी येथे राहून लष्करात भरती होण्याच्या तयारी करत असलेला 20 वर्षीय देबोजित बोराने बीबीसीला सांगतो की, "मी लष्करात भरती होण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून खूप मेहनत घेत आहे. पण अचानक 'अग्निपथ' योजनेची घोषणा झाली आणि त्यामुळे मी निराशा झालोय."
 
माझे वडील सीआरपीएफमध्ये होते. त्यांच्या निधनानंतर घरात तयार झालेल्या वातावरणामुळे मीही सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचं ठरवलं. माझ्याकडे आता फक्त एक वर्ष शिल्लक आहे आणि मी कोणत्याही परिस्थितीत सैन्यात भरती होण्याचा प्रयत्न करेन.
 
मात्र 'अग्निपथ' योजनेत फक्त चार वर्षेच काम करण्याची संधी मिळणार आहे. याची काळजी वाटते. माझी निवड झाली तर मी चार वर्षात नोकरीतून निवृत्त होईन, त्यानंतर पुढं काय करणार.
 
"माझ्यासोबतची बरीच मुलं मोठ्या आशेने ग्राऊंडवर कष्ट घेतात, पण कालपासून आम्हा सर्वांना नोकरी फक्त चार वर्षांचीचं असणार याची चिंता लागली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सैन्यात भरती झाली नव्हती आणि आलेल्या भरतीमध्ये केवळ चार वर्षांची नोकरी असल्याचं सांगण्यात आलं आहे. सरकारने यावर पुन्हा विचार करावा, अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे."
 
'अग्निपथ' योजनेंतर्गत चार वर्षांच्या लष्करातील नोकरीबद्दल ऐकून सैन्यात भरती होण्यासाठी तयारी करणारा मरियानीचा मैना हुसैनही निराश झाला आहे.
 
तो म्हणतो, "मी 2019 साली आलेल्या सैन्य भरतीमध्ये प्रयत्न केला होता पण माझी निवड झाली नाही. पण मी हार मानली नाही. सैन्यात भरती होण्यासाठी मी सातत्याने ट्रेनिंग घेतोय. पण 'अग्निपथ' योजनेबद्दल ऐकून वाईट वाटलं. एकतर सरकारने दोन वर्षांनी सैन्यात भरती सुरू केली आणि आता या योजनेत फक्त चार वर्षांची सेवा असेल."
 
"सरकारने आम्हाला पूर्ण संधी दिली पाहिजे जेणेकरून आम्ही देशासाठी काहीतरी करू शकू. आता तुम्हीचं विचार करा की, जो मुलगा शाळेत असल्यापासून सैन्यात भरती व्हायची स्वप्न बघतोय आणि आता तोच वयाच्या 25 व्या वर्षीचं सैन्यातून रिटायर्ड होणार."