1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 एप्रिल 2019 (14:28 IST)

प्रियंका चतुर्वेदींचा काँग्रेसला रामराम, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पक्षाला रामराम ठोकत थेट शिवसेनेत प्रवेश केला आहे. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत प्रवेश करताना काँग्रेसवरही शरसंधान साधलं.
 
पक्ष कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या वाईट वागणुकमुळे आणि त्यानंतर स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांना पक्षात परत घेतल्याच्या कारणावरून आपण राजीनामा देत आहोत, असं त्यांनी राजिनामा पत्रात म्हटलं आहे.
 
गेल्या वर्षी मथुरामध्ये प्रियंका चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्याठिकाणी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्याशी गैरवर्तन करत गोंधळ घातला होता. याविरोधात प्रियंका चतुर्वेदी यांनी तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हाध्यक्षांसह काही कार्यकर्त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केलं होतं.
 
मात्र दोन दिवसांपूर्वी अचानकपणे मथुरातील कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात आला. अशा नेत्यांना सामील केल्यानंतर प्रियंका चतुर्वेदी नाराज होत्या. त्यांनी ट्वीटरवरून जाहीरपणे त्याची वाच्यता केली होती.
पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मध्यस्थीमुळे त्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात आला.
राजीनाम्यात कुणाचं नाव न घेता त्यांनी त्यांच्यासोबत झालेल्या वाईट वर्तणुकीचा उल्लेख केला. एकीकडे महिलांच्या सशक्तीकरणाठी पक्ष चर्चा करत आहे. आणि दुसरीकडं महिलांचा अवमान करणाऱ्यांना पक्षात स्थान दिलं जात आहे. या कारणांवरून मी पक्षाचा राजिनामा देत आहे, असं त्यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष यांना लिहिलेल्या राजिनाम्यात लिहिलं आहे.
 
यापुढंही पक्षात राहणं म्हणजे स्वत: च्या पायावर धोंडा मारुन घेतल्या सारखं आहे, त्यामुळं पक्ष सोडणं उचित आहे. असंही त्यांनी या पत्रात लिहिलं आहे.
 
मथुरा येथे राफेलच्या मुद्द्यावर काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्याठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह व्यवहार केल्यानं त्याना निलंबित केलं होतं. पण उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया शिफारशीनंतर संबंधित कार्यकर्त्यांना परत पक्षात घेतलं जात आहे, असं यूपी काँग्रेसच्या पत्रात म्हटलं आहे.
 
झालेल्या मुद्द्यांवर कार्यकर्त्यांनी माफी मागितली आहेत आणि भविष्यात त्यांच्याकडून असा प्रकार होणार नाही असं त्यांच्याकडून लिहून घेतलं आहे, असं काँग्रेस पत्रात म्हटलं आहे.
 
दरम्यान आपल्याला काँग्रेसमध्ये थांबवण्यासाठी राहुल गांधी किंवा वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केला नाही का? या प्रश्नाचं उत्तर देणं प्रियंका चतुर्वेदी यांनी टाळलं आहे.