शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (14:52 IST)

राज ठाकरे : 'कल्पिता पिंपळे यांची बोटं छाटणारा पोलिसांकडून सुटेल तेव्हा आमच्याकडून मार खाईल'

फेरीवाल्याने चाकूने हल्ला करत महिला सरकारी अधिकाऱ्याला जखमी केल्याची घटना ठाण्यामध्ये घडली आहे.
 
ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांना फेरीवाल्याच्या हल्ल्यात आपली दोन बोटं गमवावी लागली आहेत. त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
"महिला अधिकाऱ्यावर हल्ला करणारा आरोपी पोलिसांकडून जेव्हा सुटेल तेव्हा आमच्याकडून मार खाईल," असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. अशा प्रकारे अधिकाऱ्यावर हल्ला करण्याची हिंमत कशी होते, असा सवालसुद्धा राज यांनी उपस्थित केला आहे.
 
ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे या सोमवारी (30 ऑगस्ट) संध्याकाळी माजीवडा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या.
 
तिथे आलेल्या अमरजीत यादव या फेरीवल्याने त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची 2 बोटं आणि त्यांच्या अंगरक्षकाचं 1 बोट तुटलं. त्यानंतर त्याना तातडीने वेदांत रुग्णालयात आणि त्यानंतर ज्युपिटर रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आलेत.
 
ठाणे महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपासून शहरातील फेरीवल्याविरोधात धडक कारवाई सुरू केलीय. या प्रकरणातील दोषी फेरीवाल्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आलेत.
 
दरम्यान, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
 
अधिकाऱ्यांवर त्यातही महिला अधिकाऱ्यावर हल्ला होण्याची ही शहरातील पहिलीच घटना असून ती अतिशय निंदनीय असल्याचं त्यांनी म्हटलंय.
 
अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर कडक कारवाई करण्याचे दिले असल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.