सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑगस्ट 2019 (15:30 IST)

कलम 370 : संजय राऊतांचे बॅनर इस्लामाबादमध्ये, जिल्हाधिकाऱ्यांची महापालिकेला नोटीस

शिवसेनेचे खासदार संजय राऊत चक्क पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये बॅनर्सवर झळकले आहेत.
 
राज्यसभेत काश्मीरबाबत संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य या बॅनर्सवर छापले होते. इस्लामाबादच्या रेड झोन नावाच्या भागात लागलेले हे बॅनर्स अर्थातच हटवले असून त्याबाबत अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय झाल्यानंतर सोमवारी हे बॅनर्स काही ठिकाणी लावले गेले होते. "आज जम्मू-काश्मीर घेतलंय, उद्या बलुचिस्तान असेल आणि मला विश्वास आहे की पंतप्रधान त्यांचे अखंड हिंदुस्तानाचे स्वप्न पूर्ण करतील."
 
ज्या भागात हे बॅनर्स लागले होते तेथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असजाद मोहम्मद यांनी म्हटलंय की, "आमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीशिवाय इतर दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीतही हे बॅनर्स लावले होते. कोहसार पोलीस ठाणे आणि आबपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे बॅनर्स लावले होते."
 
याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी हे बॅनर्स उतरवले अशी माहिती असजाद मोहम्मद यांनी दिली.
 
सेक्रेटरियट पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनुसार, बॅनर्स ज्या ठिकाणी लावले गेले होते त्याठिकाणी लगतच्या इमारतींवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासले जात असून त्याआधारे हे बॅनर्स कोणी लावले याचा शोध घेतला जात आहे.
 
महत्वाची बाब म्हणजे हे बॅनर्स ज्या भागात लावले गेले होते तेथून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे.
माजी पोलीस अधिकारी अकबर हयात यांनी पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला आहे. "रेड झोन नावाच्या ज्या भागात हे बॅनर्स लावले गेले, त्या भागात अनेक देशांचे दूतावास आहेत तशीच अनेक महत्वाची कार्यालयं आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दलच प्रश्न उपस्थित झाला आहे."
 
इस्लामाबादमध्ये बॅनर्स लावण्यासाठी नियमावली असून कॅपिटल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी या संस्थेची परवानगी घेऊनच बॅनर्स लावता येतात.
 
या संस्थेशी संपर्क साधला असता अशा बॅनर्सला परवानगी दिली नसल्याचे सांगितले.
 
इस्लामाबादमध्ये सेक्शन 144 लागून असून त्यानुसार सरकारविरोधी भावना पसरवणारे किंवा धार्मिक सलोखा बिघडवणारे बॅनर्स लावण्यास बंदी आहे.
 
दरम्यान खासदार संजय राऊत यांनी यावर 'एबीपी माझा'शी बोलताना म्हटलं, "मलाही याचे आश्चर्य वाटेल. पाकिस्तानात गोंधळ निर्माण झालाय, अस्वस्थता. शिवसेनेची पोस्टर्स इस्लामाबादमध्ये लागणे हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय आहे. याचा अर्थ असा आहे की इस्लामाबादमध्ये शिवसेना पोहोचली असून शिवसेनेचे फॅन्स तिथे आहेत हे नक्की."
 
या मुद्द्यावरून आता इस्लामाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला नोटीस बजावली आहे. हे पोस्टर्स काढण्यासाठी 5 तास उशीर झाल्यानं जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावून 24 तासांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.