शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

शरद पवार हे मायावती, ममता, चंद्राबाबू यांना पंतप्रधानपदी का प्रोजेक्ट करत असावेत?

- गणेश पोळ
 
भाजप प्रणित NDAला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसप अध्यक्ष मायावती आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, असं शरद पवार म्हणाले आहेत.
 
शरद पवार यांच्या या विधानाचा राजकीय वर्तुळात अनेक अर्थ लावले जात आहेत. ममता, मायावती आणि नायडू यांचं नाव घेऊन त्यांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाहेर करत आहे का? त्यांनी राहुल गांधी यांचं यामध्ये नाव घेणं टाळलं का? शरद पवार हे खरंच या स्पर्धेतून स्व:ताला बाहेर ठेवत आहेत का?
 
शरद पवार हे ममता, मायावती, चंद्रबाबू यांना प्रोजेक्ट का करत आहेत?
"भाजपच्या जागा कमी झाल्या तरी काँग्रेसला सगळ्यात जास्त जागा मिळतील असं नाही. सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला कमीत कमी 150 जागा जिंकणं गरजेचं ठरेल आणि असं घडणं सध्या अवघड आहे," असं ज्येष्ठ पत्रकार राशिद किडवई यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
 
त्यामुळे महागठबंधनमधल्या बिगर काँग्रेसी पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तसंच काँग्रेस सोडून इतर पक्ष एकत्र आले तर त्यांच्याकडे सरकार स्थापन करण्याचा दावा करण्याइतपत जागा असू शकतात, असं ते सांगतात.
 
त्यामुळेच ममता बॅनर्जी, मायावती आणि चंद्राबाबू नायडू हे पतंप्रधान होण्याची शक्यता शरद पवार यांनी वर्तवली आहे. हे नेते याआधी मुख्यमंत्री राहिल्यानं ते अनुभवी नेते आहेत. असं किडवई सांगतात.
 
शरद पवारांनी राहुल गांधी यांचं नाव का घेतलं नाही?
राहुल गांधींनी एका मुलाखतीदरम्यान आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचं याआधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे NDAच्या जागा कमी झाल्या तर बिगर काँग्रेसी पक्षांकडे सत्तेचं पारडं झुकलेलं असेल, असं किडवई यांना वाटतं.
 
दरम्यान याविषयी प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हणाले, "शरद पवार हे महाआघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी केवळ सकारात्मक वातावरण निर्माण करत आहेत. राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी प्रोजेक्ट केलं तर सरकार स्थापन करण्यात अडचण होऊ शकते. काँग्रेसची देशात चांगली प्रतिमा नाहीये. त्यामुळेही राहुल गांधी यांचं नाव घेतलं नसावं."
 
दरम्यान शरद पवार यांनी मात्र आपल्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केल्याचं म्हटलंय. ''राहुल गांधींशिवाय पंतप्रधानपदासाठी कोण पर्याय असतील, या प्रश्नाला उत्तर देताना आपण मायावती, ममता बॅनर्जी आणि चंद्राबाबू नायडू यांचं नाव घेतलं होतं." असं पवारांनी स्पष्ट केलं आहे.
 
शरद पवार खरंच पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाहीत का?
"शरद पवार हे अनुभवी आणि मत्सुदी राजकारणी आहेत. भारतीय राजकारणाचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या प्रत्येक नेत्याला सत्तेचा वाटा पाहिजे असतो. त्यामुळे शरद पवार यांनी पंतप्रधान होण्याची इच्छा पूर्णपणे बाजूला सारली असं म्हणता येणार नाही. ते या घडीला स्वत:चं नाव खराब करू इच्छित नाहीत," असं किडवई सांगतात.
 
भाजपविरोधातले प्रादेशिक पक्ष पाहता ममता, मायावती आणि नायडू यांच्यापेक्षा शरद पवार चांगल्या पद्धतीनं नेतृत्व करू शकतात. तसंच त्यांना देशभर मान्यताही मिळू शकते हे पवारांनाही चांगलंच माहिती असल्याचं किडवई सांगतात.
 
पण किडवई यांनी व्यक्त केलेली शक्यता खोडून काढताना हेमंत देसाई सागंतात, "शरद पवार जेव्हा काँग्रेस पक्षात होते तेव्हाच ते पंतप्रधान होण्याची शक्यता होती पण तसं झालं नाही. आता ते इतकं शक्य नाही."
 
आज (सोमवार) चौथ्या टप्प्यात मुंबई आणि महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी मतदान होत आहे. त्यामुळे शरद पवार यांनी राहुल गांधींचा उल्लेख टाळला असावा, असंही देसाई सागंतात.
 
दरम्यान शरद पवार यांच्या विधानाचा राजकीय अर्थ लावू नये असं ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांचं पूर्ण म्हणणं ऐकलं तर ते निवडणुकीनंतरच्या राजकीय गणितावर आधारीत आहे, असं ते सागतात.
 
"आपण पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही, असं राहुल गांधी यांनी स्वत:च स्पष्ट केल्याचा पवारांनी दाखला दिला आहे. तसंच बिगर भाजप सरकार स्थापनेत काँग्रेस इतर पक्षांना पाठिंबा देईल असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे," असं आसबे सांगतात.
 
"आपल्या विधानाचा मीडियाने विपर्यास केल्याचं,"शरद पवार यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं आहे. राहुल गांधी यांच्यापेक्षा ममता बॅनर्जी, मायावती, चंद्राबाबू नायडू हे सरस आहेत असा त्याचा अर्थ नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
 
"शरद पवारांची एक गोष्ट चुकते ती म्हणजे त्यांच्या बोलण्याचे अनेक अर्थ निघतील अशी ते विधानं करत असतात," असं देसाई सांगतात.