गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : शनिवार, 27 एप्रिल 2019 (12:06 IST)

उद्धव, बाबा तू एकदा मैदानात उतर, निवडणूक लढवून दाखव - शरद पवार

"उद्धव, बाबा तू एकदा मैदानात तर, निवडणूक लढवून दाखव," अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ते ठाण्यातील प्रचारसभेत बोलत होते.
 
ते म्हणाले, "मी मैदानातून पळ काढला, असं उद्धव म्हणत आहेत. पण मी 14 वेळा निवडणूक लढून जिंकलो आहे. एकदाही पराभूत झालेलो नाही. बाबा, तू एकदा मैदानात उतर. निवडणूक लढून दाखव.
 
"मी कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष होतो. त्यामुळे मैदान मला माहीत आहे. तुम्ही एकदा तरी मैदानात उतरा," असं ते प्रत्युत्तरात म्हणाले.  

"गुजरात मॉडेलच्या नावाखाली, देशाला विकासाचे मॉडेल बनविण्याच्या नावाखाली सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांना विकासाचे काय झाले, याचा जाब विचारण्याचा हक्क तुम्हा आम्हाला आहे. पण नरेंद्र मोदी विकासाबाबत बोलण्याचं टाळून राष्ट्रवादीच्या नावाखाली लोकांच्या भावना भडकावित आहेत," असंही त्यांनी म्हटलंय.
 
महाराष्ट्रातील मतदानाचा अंतिम टप्पा सोमवारी 29 एप्रिल रोजी असून मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.