मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 30 ऑक्टोबर 2019 (14:30 IST)

शिवसेनेनं बोलावली तातडीची बैठक, आदित्य ठाकरेंचा दौराही रद्द

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांची उद्या तातडीची बोलावली आहे. शिवसेना भवनात उद्या दुपारी १२ वाजता ही होणार बैठक होणार आहे. या बैठकीमुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा कोकण दौराही पुढे ढकलण्यात आला आहे.
 
भाजपच्या विधीमंडळ नेता निवडीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीसाठी सर्व भाजप आमदार भगवे फेटे घालून विधान भवनात आले आहेत.
 
भाजपची भाषा बदलली?
फॉर्म्युला प्रेम आणि विश्वासाचा असतो, प्रेमानं शिवसेना आणि भाजपमध्ये चर्चा होईल. चहाच्या गोडव्यासह ही चर्चा संपेल आणि सरकार स्थापन होईल, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.
 
शिवसेना-भाजप एकत्र आल्याशिवाय अपक्षांच्या मदतीनं कुणीही सत्ता स्थापन करू शकत नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
 
महत्त्वाचं म्हणजे आम्हाला इतर पर्याय खुले आहेत असं म्हणणं ही सेनेची घोडचूक ठरू शकते, असं वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं.
 
शिवसेनेचं वक्तव्य हे विनाशकाले विपरित बुद्धी आहे, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं.
 
भाजप हायकमांड शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करणार - महाजन
भाजपचे हायकमांड शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करतील, सरकार शिवसेना भाजप युतीचच स्थापन होईल, असं भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी म्हटलंय.
 
सत्ता स्थापनेसाठी भाजप आज कुठलाही दावा करणार नाही असंही महाजन यांनी स्पष्ट केलं आहे.
 
महायुतीत दोनचार पक्ष आहेत, वेगळ लागू शकतो. खाते वाटपावरून चर्चा होत आहे, थोडा वेळ लागतोय, पण सरकार युतीचच येणार असं त्यांनी म्हटलंय.
 
शिवसेनेनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा - आठवले
शिवसेनेनं भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं रामदास आठवले यांनी म्हटलंय. शिवसनेनेचं काँग्रेसनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही असंही त्यांनी म्हटलंय.
 
शरद पवारांना नरेंद्र मोदींचा फोन आलेला नाही - मलिक
शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुठलाही फोन आलेला नाही, या अफवा आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय.
 
भाजप अफवा पसरवून राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 
लोकांनी आम्हाला विरोधात बसण्यासाठी कौल दिला आहे. जर हे सरकार पडत असले तर आम्ही प्रयत्न करू, असंही त्यांनी सांगितलं आहे.
 
पक्षांच्या बैठकांना सुरुवात
 
मुंबईत आज भाजपच्या विधीमंडळ नेता निवडीसाठी बैठक होणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना उपस्थित रहाणार आहेत
 
तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची मुंबईतल्या कार्यालयात बैठक होणार आहे. शरद पवार यावेळी उपस्थित असणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ नेता आणि विरोधीपक्ष नेता कोण असेल यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
 
तर आज दुपारी ४.०० वाजता दादरमधल्या टिळक भवनमध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.
 
शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास विचार करू - पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास हायकमांडशी चर्चा करू, असं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
 
"सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास हायकमांडसमोर ठेवून, आघाडीतल्या मित्रपक्षांसोबत चर्चा करू. मात्र शिवसेनेकडून अद्याप कुठलाच प्रस्ताव आला नाहीय," असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.
 
सोनिया-पवार चर्चा
शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळालं असूनही महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यास विलंब होत आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची फोनवरून चर्चा झाली. या चर्चेमुळं राजकीय वर्तुळातही तर्कवितर्कांना उधाण आलंय.