बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 21 नोव्हेंबर 2019 (18:01 IST)

शिवसेना- राष्ट्रवादी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचं काय होणार?

शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं एकमत झाल्यानंतर आता पुन्हा मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा सुरु झाली आहे. परंतु सरकार स्थापनेच्या या अनोख्या प्रयोगात मुख्यमंत्रिपद कोणत्या पक्षाकडे राहील, ते पाच वर्षे त्याच पक्षाकडे राहील का किंवा अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणते नाव पुढे येईल याबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत.
 
गेल्या आठवड्यात मंगळवारी काँग्रेसचे नेते अहमद पटेल व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली. त्याबाबत सर्वत्र बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या बातम्यांमध्ये शिवसेनेने स्वतःसाठी मुख्यमंत्रिपद आणि दोन्ही काँग्रेससाठी उपमुख्यमंत्रिपदं देण्याचा फॉर्म्युला सुचवल्याचं प्रसिद्ध झालं होतं.
 
तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये दोनच जागांचे अंतर असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपदही हवे असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सुरुवातीची अडीच वर्षं शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यात यावं असा प्रस्ताव दोन्ही काँग्रेसने दिल्याचं सांगण्यात येतं होतं. त्यावर शिवसेनेने आतापर्यंत स्पष्ट प्रतिसाद दिलेला नव्हता.
 
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचा अनेकदा पुनरुच्चार केला. दोन्ही काँग्रेसची मुख्यमंत्रिपदाची संभाव्य मागणी आणि त्याबद्दल होणारी चर्चा याबद्दल बोलताना बीबीसीच्या भारतीय भाषांचे डिजिटल एडिटर मिलिंद खांडेकर यांनी राऊत दोन्ही काँग्रेसला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे.
 
ते म्हणतात, "अनेकदा प्रश्न विचारले तरी राऊत यांनी पुन्हा निवडणुका होणार नाहीत आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असं उत्तर दिलं आहे."
 
राष्ट्रवादी आणि काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबाबत बोलताना खांडेकर म्हणतात, "राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाबाबत किमान सामाईक कार्यक्रमानंतर ठरवू असे स्पष्ट केलं आहे. पण खासगीत मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ दोनच जागांचं अंतर असल्यामुळे मुख्यमंत्रिपदाची अडीच वर्षांसाठी मागणी होऊ शकते हे नाकारत नाहीत."
 
राष्ट्रवादी काँग्रेस इथे मुख्यमंत्रिपदाचा आग्रह करू शकते. तसंच काँग्रेसच्या जागाही फारशा कमी नाहीत. काँग्रेसला 44 जागा आहेत. म्हणजेच भाजप आणि शिवसेनेमध्ये जितकं अंतर होतं तितकं शिवसेना आणि या दोन्ही काँग्रेसमध्ये नाही. म्हणूनच शिवसेना मुख्यमंत्रिपदामध्ये भागीदार येण्याला थेट प्रत्युत्तर देत आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी, "शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळाल्यावर दोन्ही काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपदं मिळतील अशी चर्चा झालेली नाही. कारण काँग्रेस मुळात सरकारमध्ये येण्याऐवजी बाहेरून पाठिंबा देण्याचा विचार करत होती त्यामुळे पदाचा विषयच येत नाही. सध्या केवळ सरकार कोणत्या अजेंड्यावर काम करेल यावर चर्चा सुरू आहे," असं गेल्या आठवड्यात सांगितलं होतं.
 
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, मुख्यमंत्रिपदाच्या वाटपाबाबत कुणाची मागणी असेल, तर त्याचा विचार नक्की करावा लागेल, असं सूचक वक्तव्य केलं होतं.
 
त्यानंतर आज सकाळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मागणी होत असल्याचं आपल्याला माहिती नाही असं सांगितलं.
 
तसंच तिन्ही पक्षांची मुंबईच बैठक होणार आहे, या बैठकीत सर्व निर्णय होतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.