बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

तबरेज अन्सारीला गावकरी सोनू म्हणून ओळखायचे, मग मारणारे कोण होते?

- आनंद दत्त
शाईस्ता परवीन चार दिवसांनंतर पुण्याला जाणार होती. तिथे तिचे पती नोकरी करतात. गेल्या 24 एप्रिललाच त्यांचं लग्न झालं होतं. लग्नानंतरची पहिली ईद साजरी केली आणि सगळं सुरळीत सुरू होतं.
 
मात्र 18 जूनच्या सकाळी एक फोन कॉल आला आणि सगळं जग जागच्या जागीच थांबलं. फोनवर पलीकडून तिचे पती तबरेज अन्सारी उर्फ सोनू थरथरत्या आवाजात म्हणत होते, "शाईस्ता, मला वाचव. ही माणसं मला खूप मारत आहेत. त्यांनी मला रात्रभर मारहाण केली."
 
रांचीपासून 130 किमी दूर सरायकेला-खरसावा जिल्ह्यातल्या कदमडीहा गावातल्या तबरेज अन्सारीवर गेल्या 17 जून रोजी जमावाने चोरीचा आरोप करत बेदम मारहाण केली.
 
दुसऱ्या दिवशी सकाळी 18 जून रोजी पोलिसांनी त्यांना अटक करून तुरुंगात पाठवलं. मधल्या काळात प्रकृती बिघडल्याने 22 जून रोजी त्यांचा मृत्यू झाला.
 
या प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांची नावं आहेत - भीमसेन मंडल, प्रेमचंद महली, कमल महतो, सोनामो प्रधान, सत्यनारायण नायक, सोनाराम महली, चामू नायक, मदन नायक, महेश महली आणि सुमंत महंतो. यांच्याव्यतिरिक्त चंद्रमोहन उराव आणि विपिन बिहारी यांना सस्पेंड करण्यात आलं आहे.
 
ही घटना जिल्ह्यातल्या धातकीडीह गावातली आहे. सध्या पोलिसांनी तिथे ठाण मांडलं आहे. तबरेज कदमडीहा गावात राहणारे होते. या गावात जवळपास 1000 घरं आहेत. यातली 8 घरं हिंदूंची आहेत. इतर सर्व मुस्लिमांची. या दोन्ही गावातलं अंतर 4 किलोमीटरचं आहे.
 
कदमडीहापासून बरोबर 4 किमी अंतरावर केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री आणि या भागातले खासदार अर्जुन मुंडा यांचं खेजुरदा हे गाव आहे. 23 जून रोजी ते याच भागात झालेल्या भाजप कार्यकर्ता सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मात्र, तबरेजच्या कुटुंबीयांची भेट घेतली नाही.
 
तबरेज अन्सारींचं घर
 
24 जून रोजी दुपारी एक वाजता कदमडीहा गावात मृत तबरेज अन्सारी यांच्या घरी गर्दी जमली होती. काँग्रेस पक्षाचे काही नेते तिथे बसले होते. 50 हून अधिक गावकऱ्यांना त्यांना घेराव घातला होता. या नेत्यांनी आपल्या दंडांवर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या.
 
एकाने म्हटलं, "तुम्हाला जेवढं दुःख झालं आहे, त्यापेक्षी कणभरही कमी आम्हाला झालेलं नाही. या लढ्यात जी काही मदत हवी आम्ही ती सर्व करायला तयार आहोत. पक्षातर्फे एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे."
 
नेते मंडळी जाताच तबरेज अन्सारींचे दोन्ही काका मशरूर आलम (36) आणि मकसूद आलम (33) यांच्याशी आम्ही बोललो.
 
व्यवसायाने कार मेकॅनिक असलेल्या मकसूद आलम यांनी सांगितलं तबरेज यांचे वडील मशकूर आलम यांचं 12 वर्षांपूर्वी तर आई समसून निशा यांचं 18 वर्षांपूर्वी निधन झालं. तबरेज यांना एक बहीण आहे. तिचंही लग्न झालं आहे.
 
ते म्हणाले, "ईदपासून तो सासरीच होता. अधे-मध्ये काही तासांसाठी घरी यायचा. जवळच्याच बेहरासाही गावात त्याचं सासर आहे."
 
चार दिवसांनंतर शाईस्तासोबत पुण्याला जाणार होते
तबरेजच्या पत्नी शाईस्ताचा विषय निघाला. मकसूद आलम यांनी सांगितलं, "आता कुठे उठली आहे. सकाळपासून पाणी टाकून उठवतोय."
 
नंतर ते आम्हाला त्या खोलीत घेऊन गेले जिथे शाईस्ता बसली होती. आई शहबाज बेगम (39) आणि चुलत सासू नेहा परवीन (26) या दोघींच्या मदतीने ती काही वेळापूर्वी उठून बसली होती. गेल्या तीन दिवसांपासून तिची प्रकृती ढासळली आहे. तिचं ब्लड प्रेशर कमी झालंय. तिला नीट बोलताही येत नव्हतं.
 
आम्ही विचारलं की तुमचं शेवटचं बोलणं काय झालं होतं? शाईस्ताने बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, हुंदका अनावर झाल्यानं ती बोलायची थांबली.
 
काही वेळाने म्हणाली, "17 जूनच्या रात्री 10 वाजता त्यांनी फोन केला होता आणि म्हणाले होते की जमशेदपूरहून परत येतोय. त्यानंतर सकाळी कॉल आला. सांगत होते की गावकऱ्यांना पकडून बेदम मारहाण केली. त्यानंतर मी नातेवाईकांना फोन केले."
 
ती गप्प झाली. नेहा परवीन म्हणाल्या तिची तब्येत बरी नाही. जास्त बोलू नका.
 
'न्याय हवा'
शाईस्ताचे वडील शेख सैफुद्दीन (40) शिंपी आहेत. मानसिकरीत्या थोडे कमकुवत आहेत. शाईस्ताची आई शहबाज बेगम यांनी अश्रू अनावर झाले होते. त्या सांगत होत्या, "मुलगी बाहेर राहणार म्हणून मी खूप आनंदात होते. माझा जावईसुद्धा चांगला होता. मुलीचं आयुष्य आहे. असं थोडीच सोडू तिला. काही ना काही तरी करूच."
 
हे बोलणं सुरू असतानाच चुलत सासू असलेल्या नेहा परवीन म्हणाल्या, "सध्या फॅमिली मॅटरचं असू द्या. यावेळी तर आम्हाला न्याय हवा."
 
गावातले आणखी दोन तरूण बेपत्ता
तबरेज अन्सारींचे थोरले काका मशरूर आलम आलिम आहेत. ते मुलांना शिकवतात. त्यांनी सांगितलं, "सोनू गेल्या सात वर्षांपासून पुण्यात नोकरी करत होता. वर्ष दोन वर्षांत एखाद वेळी घरी यायचा."
 
गावातले अकबर जिया यांनी सांगितलं, "घटनेच्या एक दिवस आधीच तो मला गावात भेटला होता. मी विचारलंही होतं की किती दिवस झाले इथे आहेस? पुण्याला कधी जाणार? त्याने सांगितलं होतं की चार दिवसांनंतर जाणार आहोत. पुढच्या वर्षी ईदला येईल."
 
त्यांनी सांगितलं की तो गावी खूप कमी यायचा. त्यामुळे त्याचे मित्रही कमी होते. गावकऱ्यांनी सांगितलं की नुमेर अली (14) आणि इरफान (15) ही दोन मुलंही तबरेज सोबत होती. ते दोघंही याच गावातले आहेत. घटनेच्या रात्रीपासून ती दोघंही बेपत्ता आहेत.
 
नुमेर अलीचे वडील उमर अली यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तर इरफानचे वडील नजीर (50) 24 जूनच्या संध्याकाळपर्यंत मुलाची वाटच बघत होते. त्यांचा मुलगा काहीही न सांगता घरातून निघाल्याचं ते म्हणाले. तो कुठे पळून गेला आहे की मेला, माहिती नाही.
 
'गावातले सर्व पुरुष फरार'
आता त्या गावाविषयी जिथल्या गावकऱ्यांनी तबरेजला मारहाण केली होती. व्हायरल व्हिडियोनुसार जय श्रीरामच्या घोषणा द्यायला सांगितलं. कदमडीहापासून चार किमी दूर धातकीडीह पोचल्यावर रस्त्यावर मोठ्या संख्येने महिला आणि पोलिसांच्या गाड्या दिसल्या.
 
एकही पुरूष मात्र दिसत नव्हता. काठीच्या आधाराने उभ्या असलेले ओमिन नायक नावाचे एक वृद्ध गृहस्थ दिसले. त्यांनी सांगितलं घटना खाली घडली आहे. तुम्ही तिकडे जा.
 
पोलीस कॅम्पचं नेतृत्व करणाऱ्या सरायकेला एसडीपीओ अविनाश कुमार यांनी सांगितलं, "सर्व पॉईंट्सवर चौकशी सुरू आहे. जो कुणी या प्रकरणात सामील आहे त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. गावात एकही पुरूष नाही. पोलीस घरात जाईल तेव्हा महिला पोलिसांना बोलवण्यात येतं."
 
हा मॉब लिंचिंगचा प्रकार असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या स्पेशल इनव्हेस्टिगेशन टीम (एसआयटी)चंही ते नेतृत्व करत आहेत.
 
मॉब लिंचिंग नाही - DGP
इकडे रांचीमध्ये डीजीपी कमलनयन चौबे यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, "मुरमू गावात तीन मुलांनी एक मोटारसायकल चोरली. यानंतर ते जवळच्याच धतकीडीहा गावातल्या एका घरात घुसले. तिथे घरमालकाला जाग आली आणि यानंतर लोकांनी तबरेजला पकडलं. दोन मुलं तिथून पळाली."
 
ते म्हणाले, "बेदम मारहाण झाल्याने तबरेजचा मृत्यू झाला. सध्यातरी मॉब लिंचिंग सारखं काही नाही. घटनेशी संबंधित व्हिडियोला पुढील तपासासाठी पाठवण्यात आलं आहे."
 
तबरेजचा मृत्यू
तबरेजच्या थोरल्या काकांनी सांगितलं, "18 जूनच्या सकाळी ते सरायकेला ठाण्यात पोचले. त्यांनी बघितलं की तो लॉकअपमध्ये बंद होता. त्याची तब्येत खूप खराब होती. मी ठाणा प्रभारी विपिन बिहारी यांना म्हटलं की याच्यावर आधी उपचार करा. मग तुम्हाला हवं ते करा. नंतर कळलं की त्याला त्याच अवस्थेत जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे."
 
"दुसऱ्या दिवशी त्याला तुरुंगात भेटायला गेलो तेव्हाही त्याची तब्येत खूप खराब होती. दोन पोलिसांनी बळजबरीने त्याला पकडून आणलं होतं. त्याला उपचार मिळावे, म्हणून आम्ही पुन्हा एकदा विपिन बिहारी यांना भेटलो. त्यांनी ऐकलं नाही. जेलच्या डॉक्टरांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र ते भेटले नाही."
 
धाकटे काका मकसूद आलम यांनी सांगितलं, "22 तारखेला आम्हाला कळलं की तबरेजची प्रकृती खूपच ढासळली आहे. त्याला सदर हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतंय. आम्हीदेखील सकाळी 7.30 वाजता हॉस्पिटलमध्ये पोचलो. आम्ही बघितलं की त्याला शुभ्र चादरीत गुंडाळलं होतं."
 
प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसडीपीओ अविनाश कुमारने सांगितलं की पोलिसांना तबरेजकडून एक बाईक, एक पर्स, एक मोबाईल आणि चाकू मिळाला आहे.
 
डीजीपींनी सांगितलं की पोलिसांकडून निष्काळजीपणा झालेला नाही. दोन पोलीस अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलं आहे. त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मॉब लिंचिंगची माहिती दिली नाही.