बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 4 मे 2019 (12:48 IST)

थायलंड: राजा वाजिरालोंगकॉन यांच्या राज्याभिषेकात पवित्र जल, राजचिन्हं आणि मांजरीचं महत्त्व

शनिवार 4 मेपासून थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये नव्या राजाच्या राज्याभिषेकाचा तीन दिवसांचा सोहळा सुरू झाला आहे. ब्राह्मण आणि बौद्ध विधींच्या या राज्याभिषेकात पवित्र जल अत्यंत महत्त्वाचं आहे.
 
राजे भूमिबोल अदुल्यादेज यांचे 2016 साली निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र राजे महा वाजिरालोंगकॉन यांना राज्याभिषेक करून राजेपदावर बसवण्यात येत आहे. मात्र बौद्ध रीतीरिवाजांचे अनुसरण करून देवराजा झाल्याशिवाय राजाचा राज्याभिषेक पूर्ण होत नाही.
 
राजे भूमिबोल यांनी जवळजवळ सात दशकं राजपद सांभाळल्यामुळे हा राज्याभिषेक पाहाण्याची सध्याच्या थायलंडमधील बहुतांश लोकांच्या आयुष्यातील ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने थाई नागरिक या सोहळ्यासाठी उपस्थित राहातील असं दिसतंय.
 
चुलालोंगकॉन विद्यापीठातील थाई संस्कृतीचे अभ्यासक प्रा. थोंगकॉन चंद्रांसू म्हणाले, "थायलंडला प्राचीन इतिहास, वैभवशाली संस्कृती आणि राजेशाही आणि लोकांमध्ये घनिष्ठ संबंध आहेत, याची प्रचिती या राज्याभिषेकामुळे येऊ शकेल."
 
राज्याभिषेकासाठी लागणारं जल
इतिहासात डोकावलं तर थायलंडमधील समाज नद्यांच्या काठांवर स्थायिक झाला. त्यांच्या आहारात प्रामुख्याने भात आणि मासे यांचा समावेश होता. या संस्कृतीमधील अनेक समारंभ आणि परंपरा पाण्याभोवतीच गुंफलेल्या दिसून येतील.
 
थाई ज्योतिषशास्त्राप्रमाणे पवित्र मानल्या जाणाऱ्या 11.52 ते 12.38 या वेळेत 100 हून अधिक जलस्रोतांमधून राज्याभिषेकासाठी पाणी गोळा केलं जातं.
 
बँकॉकच्या सर्वांत प्राचीन मंदिरांपैकी एक असणाऱ्या वाट सुथाट मंदिरामध्ये ते पाणी एकत्र करण्याआधी त्यावर विविध मंदिरांमध्ये बौद्ध समारंभांमध्ये त्यावर मंत्रोच्चार केले जातात.
 
हे पवित्र जल ग्रँड पॅलेसमधील दोन विधींमध्ये वापरलं जातं. सर्वप्रथम पांढरे वस्त्र घातलेल्या राजाला स्नान घालून शुद्ध करण्यासाठी ते वापरलं जातं. त्यानंतर राजे थायलंडच्या राजतख्तावर बसताना ते वापरलं जातं. यावेळेस राजे राजवस्त्रासह अष्टकोनी आसनावर बसतात.
 
आठ लोक त्यांच्या हातावर जल ओततात. यंदा या कार्यात राजाची लहान बहीण युवराज्ञी महा चक्री सिरीधोर्न - ज्या थायलंडच्या पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा आहेत - तसंच ब्राह्मण आणि राजदरबारातील पंडितांचा समावेश असेल. शेकडो वर्षांच्या ब्राह्मण परंपरांनुसार या जलाचा वापर केला जातो, असं तज्ज्ञ सांगतात.
 
सोनं आणि हिरे
त्यानंतर राजे भद्रपीठ नावाच्या या राजआसनावर बसतील. तसंच त्यांच्या डोक्यावर नऊ झालरींचं छत्र असतं. तिथं त्यांच्याकडे राजचिन्हं देण्यात येतात.
 
थायलंडमध्ये राजमुकुटाचा समावेश अलीकडच्या काळात झाला आहे. युरोपियन राजदरबारांमधून प्रेरणा घेऊन हे राजमुकूट थायलंडमध्ये आलं आहे.
 
सोने आणि हिरे जडवलेला हा राजमुकूट 1782 साली राजे राम (पहिले) यांच्या काळात तयार करण्यात आला. 7.3 किलो वजनाचा हा राजमुकूट राजावरील जबाबदारी दर्शवतो, असे तज्ज्ञ सांगतात.
 
शाही तलवार देशावर राज्य करण्याची शक्ती दर्शवते. असं म्हणतात की ही तलवार कंबोडियामधील सिएम रिएप प्रांतातील तोन्ले सॅप तलावाच्या तळाशी सापडली होती आणि ती राजे राम (प्रथम) यांना भेटण्यात देण्यात आली होती. ती बँकॉकला आणली गेली तेव्हा शहरावर सातवेळा वीज चमकून आघात झाले, असंसुद्धा ही दंतकथा सांगते.
 
औपचारिकरीत्या राजपदावरती बसल्यानंतर राजे वाजिरालोंगकॉन यांना राम (दहावे) किंवा चक्री राजघराण्याचे दहावे राजे अशी पदवी मिळेल आणि ते पहिली राजआज्ञा देतील.
 
1950 साली राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांचे वडील म्हणाले होते, "थायलंडच्या लोकांच्या आनंदासाठी आणि त्यांच्या उत्कर्षासाठी मी प्रामाणिकपणे राज्य करेन."
 
राज्याभिषेकानंतर राजे ग्रॅंड पॅलेसमध्ये जातील. तिथे चक्रपत बिमान या शाही निवासस्थानी होणाऱ्या एका खासगी सोहळ्यात राजघराण्यातील स्त्रिया त्यांच्या भोवती असतील.
 
या स्त्रियांनी त्यांच्याबरोबर एक मांजर, पांढरा कोंबडा, खलबत्ता, हिरवे भोपळे असलेला एक ट्रे, तांदळाचं बियाणं ठेवलेला ट्रे तसंच डाळी आणि तीळ ठेवलेला ट्रे आणलेला असतो. ही धान्यं थायलंडची कृषी संपन्नता दाखवतात.
 
आता तुम्ही म्हणाल धान्य तर ठीक आहे, लोक मांजर कशाला आणतात?
 
प्रत्येक नव्या घरमालकाकडे उंदाराला दूर ठेवणारं मांजर असलं पाहिजे, असं थाई संस्कृतीत काही लोक मानतात. बँकॉक पोस्ट वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार हे मांजर सैताना आणि दुष्ट आत्म्यांना दूर ठेवतं, अशी काही लोकांची समजूत आहे.
 
राजमहालाची मालकी आता तुमच्याकडे आहे, हे दाखवण्यासाठी राजांना एक प्रतिकात्मक सोन्याची किल्ली देण्यात येते. सर्व सोहळा संपल्यानंतर नवे राजे बँकॉकमध्ये होणाऱ्या शोभायात्रांमध्ये सहभागी होतात तसेच राजमहालाच्या बाल्कनीमध्ये उभे राहून सामान्य नागरिकांना भेट देतात.