गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 24 ऑगस्ट 2019 (11:10 IST)

दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय म्हणजे या उत्सवाला लागलेली उतरती कळा?

प्राजक्ता पोळ
मुंबई आणि ठाण्यामधला दहीहंडीच्या थराराची जगभर चर्चा होते. गोविंदाच्या 9 थरांनी परदेशी लोकांनाही आकर्षित केलंय. सेलिब्रिटीजची गाणी, डान्स आणि लाखोंच्या बक्षिसांसाठी लागत असलेले गोविंदा पथकांचे थरावर थरार असं चित्र बघायला मिळतं. पण यंदाच्या दहीहंडीमध्ये हे चित्र खूप कमी ठिकाणी बघायला मिळेल.
 
कारण अनेक आयोजकांनी पूराचं कारण देत दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. काहीही उत्सव म्हणून साधेपणाने साजरा करण्याचं ठरवल आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवाला उतरती कळा लागली आहे का?
 
2000 पासून ते 2014 पर्यंत दहीहंडीमध्ये थरारांची स्पर्धा वाढत गेली. लाखो रूपयांच्या बक्षिसांसाठी 6-7 थरांपासून गोविंदा पथकं 8-9 थरांचा सराव करू लागले.
गोविंदा पथकांबरोबरच आयोजकांमध्येही स्पर्धा सुरू झाली. माजी राज्यमंत्री सचिन अहिर, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे आमदार राम कदम, शिवसेनेचे आमदार राजन विचारे या आयोजकांच्या स्पर्धेतून बक्षिसांच्या किंमती वाढत गेल्या. 5 लाखांपासून ते 21 लाखांपर्यंतची बक्षिसं दिली जाऊ लागली.
 
लोकांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या सेलिब्रिटीजना बोलवलं जाऊ लागलं. यामधून मुंबई आणि ठाण्यातल्या हंडी उत्सवाला भव्य रूप येऊ लागलं. पण या उत्सवात दरवर्षी शेकडो गोविंदा जखमी होतात, काही अपंग झाले आणि काहीचे जीवही गेले. यामुळे दहीहंडीवर टीका होऊ लागली.
 
त्यामुळे न्यायालयाकडून दहीहंडीवर निर्बंध घालायला सुरुवात केली. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यासंबंधी लहान मुलांसाठी बालहक्क आयोगात तक्रार केली.
जुलै 2014 मध्ये पहिल्यांदा बालहक्क आयोगाने 12 वर्षांखालील मुलांनी दहीहंडीमध्ये सहभाग न घेण्याचा निर्णय दिला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाकडूनही दहीहंडीची उंची, थरांची मर्यादा, गोविंदांचं वय यावर कडक निर्बंध घातले.
 
उच्च न्यायालयानं बालगोविंदाचं वय 12 वरून 14 केलं. कोर्टाने दहीहंडीवर घातलेले निर्बंध त्याचबरोबर दहीहंडीच्या भव्य कार्यक्रमांमुळे रस्ते वाहतुकीवर होणारा परिणाम, त्यातून सामान्य लोकांना होणारा त्रास यामुळे महापालिकांनीही कडक नियम लावायला सुरवात केली.
 
या सर्व निर्बंधांमुळे आयोजकांकडून दहीहंडी उत्सवातून माघार घ्यायला सुरवात झाली. 2015 साली कोर्टाने दहीहंडी थरांना कोर्टाने लावलेले निर्बंधांचं कारण देत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानने दहीहंडी उत्सवातून माघार घेतली. त्यानंतर याच कारणांसाठी सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठाननेही दहीहंडी आयोजनातून माघार घेत असल्याच जाहीर केलं.
 
2016-17 मध्ये मुंबई उपनगरातल्या 20 ते 22 आयोजकांनी माघार घेतली. 
 
त्यानंतर भाजपचे आमदार राम कदम यांची घाटकोपरमध्ये बांधली जाणारी एकमेव दहीहंडी गोविंदा पथकांसाठी लाखो रूपयांच्या बक्षीसासाठी आकर्षण ठरत होती.
 
पण यंदा कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेल्या महापुरामुळे दहीहंडी रद्द करून ते पैसे पूरग्रस्तांसाठी देणार असल्याचं राम कदम यांनी जाहीर केलंय. त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि राजन विचारे यांनीही महापुरामुळे दुपारपर्यंतच दहीहंडीचा उत्सव असेल, असं जाहीर केलं आहे.
पण पूरग्रस्तांना आम्ही मदत करून दरवर्षीप्रमाणेच आम्ही दहीहंडी साजरी करणार असल्याचं प्रताप सरनाईक यांचे पूत्र पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं. त्यामुळे प्रताप सरनाईक यांची ठाण्यातली संस्कृती प्रतिष्ठानची एकमेव मोठी दहीहंडी असेल.
 
गोविंदा पथकांमध्ये नाराजी
"आम्ही सर्वजण नोकरी करतो. रात्री आल्यानंतर रोज तीन - चार तास सराव करतो. जशीजशी दहिहंडी जवळ येईल तसा उत्साह वाढत जातो पण आयोजकांनी अचानक दहीहंडी रद्द केली तर आत्मविश्वास कमी होतो," असं जय जवान गोविंदा पथकामधले महेश सावंत सांगत होते.
 
आमच्या पथकात 600 ते 700 मुलं आहेत. आम्ही दहीहंडीच्या दोन महिने आधी सराव सुरू करतो. यंदा तीन महिने आधी सराव सुरू केला.
 
"पण आयोजकांनी दहीहंड्या रद्द केल्यामुळे हिरमोड झाला. याआधी कोर्टाच्या निर्बंधांमुळे दहीहंडी रद्द झाल्या. पण त्यानंतर आम्ही कोर्टाचीही लढाई जिंकलो. यावर्षी वाटलं काही अडचण येणार नाही. तर महापूर आला.
 
पूरग्रस्तांसाठी मदत सर्वांनी केली पाहिजे. पण आयोजकांनी नाच-गाण्यांवर केला जाणारा खर्च कमी करून दहीहंडी साजरी केली पाहिजे असं वाटतं. आम्हीही पूरग्रस्तांसाठी मदत दिली आहे पण दहीहंडीही वर्षातून एकदाच येते. त्यामुळे ती साजरी झाली पाहीजे," असं महेश सावंत यांनी म्हटलंय.
 
"दहीहंडी हा आपला उत्सव आहे. गोविंदा पथकं वर्षभर दहीहंडीची वाट बघत असतात. राज्यावर कायम संकटं येत असतात. त्यांना मदत करणं सर्वांची जबाबदारी आहेच पण त्यासाठी आयोजकांनी उत्सव रद्द करू नये," असं दहीहंडी समन्वय समितीचे कार्याध्यक्ष अरूण पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.
 
दहीहंडी पुन्हा सुरू?
 
" अनेक गोविंदा पथकांनी दहीहंडीच्या माध्यमातून मिळणारी बक्षिसं पूरग्रस्तांसाठी देण्याचा संकल्प केला होता. पण आयोजक दहीहंडी रद्द करत असल्यामुळे गोविंदांमध्ये निरुत्साह आहे. आपले उत्सव लोप पाऊ नयेत म्हणून आम्ही जितेंद्र आव्हाड, सचिन अहिर यांच्याबरोबर काही आयोजकांना दहीहंडी पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे," असं अरूण पाटील यांनी सांगितलं.
 
याबाबत आम्ही आमदार जितेंद्र आव्हाड यांना विचारलं. त्यांनी सांगितलं, "आज बाहेर फिरताना दहीहंडी उत्सव लोप पावत चाललाय असं वाटतंय. दहीहंडीच्या दिवशीही निरुत्साह आहे.
 
दहीहंडीही मुंबईची संकृती बनली आहे. तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण नेऊन ठेवलंय त्यामुळे पुन्हा दहीहंडी सुरू करा अशी विनंती मला दहीहंडी समन्वय समितीने केली आहे. यंदा राज्यावर महापुराचं संकट आहे. पुढच्या वर्षीपासून मी पुर्वीसारखी दहीहंडी सुरू करणार आहे."