रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 6 जुलै 2024 (09:39 IST)

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तब्बल 15 वर्षे कोमात राहिलेल्या फखरा अहमदची गोष्ट

"सकाळी जेव्हा मी तिच्याकडे गेलो, तेव्हा मी तिचा चेहरा आणि डोळे बघितले. मला वाटलं की, ती माझ्याकडे पाहत आहे. मी तिच्या आणखी जवळ गेलो, तेव्हा मला जाणवलं की, ती आनंदी आहे."“जेव्हा फखरा कोमात गेली, तेव्हा ती कोणाची तरी वाट पाहत होती. तिच्या मुलीचा मृत्यू झाल्याची तिला माहितीही नव्हती. मला माहित नाही की, ती कसा विचार करते."
 
सुमारे 15 वर्षे कोमात असलेल्या आपल्या मुलीबद्दल फौजिया अजीम ताहिर बीबीसीशी बोलत होत्या. फखरा अहमद असं त्यांच्या मुलीचं नाव.
 
यावर्षी 28 जून रोजी जीवन-मरणाच्या या लढाईत फखराचा पराभव झाला.
 
2009 मध्ये फखरा अहमदला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यादरम्यान ती कोमात गेली होती. दोन दिवसांनी फखराच्या बाळाचाही रुग्णालयातच मृत्यू झाला होता.
या घटनेची पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन सरन्यायाधीश इफ्तिखार मुहम्मद चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली स्वत:हून दखल घेतली आणि सदरील मृत्यूची चौकशी केली असता, फखरा अहमदचा मृत्यू हा एका खासगी दवाखान्यात काम करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचं उघड झालं.
 
फखरा अहमदचे वडील काझी इस्माईल ताहीर म्हणतात की, "या 15 वर्षात आम्ही ज्या अडचणींचा सामना केला आणि ज्या वेदना आम्हाला झाल्या, त्यांचं वर्णन शब्दात करता येणार नाही."
 
एक अत्यंत हुशार विद्यार्थिनी आणि बँकर
फखरा अहमद कोमात जाण्याआधी एका बँकेत नोकरी करत होत्या आणि त्यांचे बरेच शोधनिबंध देखील प्रकाशित झाले होते.
 
फखराचे वडील काझी इस्माईल ताहीर म्हणतात की, जेव्हा फखरा प्रसूतीसाठी त्यांच्या घरी आल्या होती, तेव्हा देखील ती एक शोधनिबंध लिहीत होती आणि तो पोस्टाने पाठवून देण्यास तिने सांगितलं होतं.
 
इस्माईल सांगतात की, चार भावंडांमध्ये सर्वात मोठी असलेली फखरा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. बँकेत नोकरीला असताना फखरा उच्चशिक्षण घेत होती आणि ज्या मुलांना बँकर बनायची इच्छा असलेल्या मुलांना शिकवण्याचं कामही ती करत होती.
फखराच्या दोन बहिणी आणि एक भाऊ डॉक्टर आहेत. त्यांचे छोटे भाऊ रोशन अहमद बहिणीच्या आठवणी सांगताना म्हणतात की, "फखरा जेव्हा आई होण्यासाठी आमच्या घरी आली, तेव्हा मी नववीत शिकत होतो, हे मला नीट आठवतं."
 
रोशन यांनी सांगितलं की, "मला अजूनही आठवतंय की माझ्या परीक्षा होणार होत्या आणि त्यावेळी फखराने फक्त माझा अभ्यासच घेतला नाही, तर परीक्षेसाठी मी पूर्णपणे तयार आहे की नाही, हे तपासण्यासाठी ती माझ्या सराव परीक्षाही घेत असे. फखरा अहमदमुळेच मी आज डॉक्टर बनू शकलो आहे."
 
मुलतानमधील निश्तर टीचिंग हॉस्पिटलमधील स्टाफ नर्स झुबैदा जवळपास 12 वर्षांपासून आयसीयू वॉर्डमध्ये काम करत आहेत आणि या काळात फखरा अहमद देखील त्यांच्या देखरेखीखाली होत्या.
झुबैदा सांगतात की, तिचं आणि रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांचं फखरासोबत एक 'नातं' निर्माण झालं होतं.
 
झुबैदा म्हणतात की, "फखरा डोळे उघडू शकत होती, पण ती हलू शकत नव्हती. ती खूप कमी गोष्टी समजू शकत होती, त्यावर विचार करू शकत होती. अनेकदा आम्ही वॉर्डमध्ये असताना, कधी कधी ती डोळे फिरवून आमच्याकडे पाहत असे."
 
कोमात असलेली व्यक्ती काहीही प्रतिसाद देऊ शकत नाही, परंतु फखराची काळजी घेत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी नमूद केलं की 'कधीकधी ती एका बाजूला बराच वेळ पडून राहिल्यास तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलत असत."
 
झुबैदा यांनी फखरासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणतात की, "या काळात तिच्या आईला आणि कुटुंबाला मोठी किंमत मोजावी लागली आहे."
 
त्या सांगतात की, फखराच्या आईने या 15 वर्षांत त्यांच्या मुलीला वेळ देण्याचा, तिला आराम पडावा म्हणून काहीतरी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला.
 
झुबैदा सांगतात की, "त्यांनी फखराच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली."
 
एक नवीन आयुष्य आणि न्याय मिळवण्यासाठीची धडपड
काझी इस्माईल ताहीर म्हणाले की, "पाकिस्तानचे सर्वोच्च न्यायालय, पाकिस्तान मेडिकल अँड डेंटल असोसिएशन आणि पंजाब सरकारने केलेल्या तपासात हे सिद्ध झाले आहे की, खासगी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे फखराची ही अवस्था झाली होती, परंतु आजपर्यंत कोणावरही कारवाई झाल्याची मला माहिती नाही."
 
त्यांनी सांगितलं की, फखराची सामान्य प्रसूती होणार होती, पण तिला 'ॲनेस्थेटिक इंजेक्शन' देण्यात आले होते. आमच्याकडून किंवा फखराकडून यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती, हे सगळं रेकॉर्डवर आहे.
 
ते म्हणतात की, "माझ्या मुलीला दिलेलं भुलीच इंजेक्शन हे एखाद्या भूलतज्ज्ञाने दिलेलं नव्हतं किंवा ते देत असताना तिथे भूलतज्ज्ञ उपस्थितही नव्हते. दवाखान्यातल्या एका दाईने हे इंजेक्शन दिलं होतं आणि आता चौकशीत हे निष्पन्न झालं आहे की माझ्या मुलीला देण्यात आलेला इंजेक्शनचा डोस जास्त होता."
काझी इस्माईल ताहिर म्हणतात की, “तपासणी अहवालात हेही सिद्ध झालं आहे की फखराचा रक्तदाब तपासण्यासाठी कोणतीही मॉनिटरिंग यंत्रणा नव्हती. ती कोमात कधी गेली हे फार काळ कोणालाच कळले नाही.”
 
ते म्हणाले की, “त्या खासगी रुग्णालयात रुग्णवाहिका नव्हती. बाहेरून रुग्णवाहिका बोलावण्यात आली."
 
ताहीर यांच्या मते, "मी सगळीकडे शोधाशोध करत होतो पण मला कुणीही विचारलं नाही. एकदा तर परिस्थिती इथपर्यंत पोहोचली होती की निश्तर रुग्णालयाच्या प्रशासनाने मला सांगितलं होतं की रुग्णाला जास्त दिवस तिथे ठेवता येणार नाही. त्यानंतर मी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि मला त्यात दिलासा मिळाला."
 
तपास अहवालात काय म्हटले आहे?
2009 मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यकारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. इफ्तिखार हुसेन कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय तपास समिती स्थापन करण्यात आली होती, ज्या समितीने अहवालात लिहिले होते की, "या सगळ्या प्रकारची सुरुवात तेंव्हा झाली जेंव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये आलेल्या भूलतज्ज्ञाने फखराला एक 'टेस्ट डोस' दिला आणि ते तिथून निघून गेले आणि त्यानंतर तिथल्या एका सुईणीने कुणाच्याही देखरेखीशिवाय, भुलीच इंजेक्शन देण्याचा कसलाही अनुभव नसताना फखरा अहमद यांना इंजेक्शन दिलं. हे इंजेक्शन दिल्यानंतर रुग्णाची प्रकृती बिघडली ते बघून तिथे असणारे स्त्रीरोगतज्ज्ञ घाबरले आणि ते रुग्णाला नीट सीपीआर देऊ शकले नाहीत."
 
या अहवालात म्हटलं आहे की, "स्त्रीरोग तज्ञाने दुसऱ्या डॉक्टरांना बोलावण्यात बराच वेळ वाया घालवला आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यास उशीर झाल्यामुळे रुग्णाच्या मेंदूचे गंभीर नुकसान झाले."
 
या अहवालानुसार, "प्रसूती प्रक्रियेदरम्यान भूलतज्ज्ञ उपस्थित असणे ही रुग्णालयाची जबाबदारी होती."
 
अहवालात फखराच्या प्रकृतीसाठी मुलतानमधील खासगी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला जबाबदार धरण्यात आले आहे. या प्रकरणात डॉक्टरांनीही निष्काळजीपणा केल्याचं सांगितलं गेलं आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर विम्याची रक्कम मिळाली
समाजातला प्रबुद्ध वर्ग काझी इस्माईल यांच्या मागे उभा राहिल्याचं त्यांना समाधान आहे. न्यायालयाने बँकेला फखरा यांच्या विमा पॉलिसीची रक्कम तात्काळ देण्याचे आदेश दिले.
 
विमा कंपनीकडून फखरा यांना 23 लाख रुपये मिळाले. त्यानंतर फखराला चीनच्या एका प्रमुख हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिच्यावर चीनमध्ये अधिक चांगल्या तंत्रज्ञानाने उपचार करता येतील, अशी आशा कुटुंबीयांना होती. पण तिथेही कुटुंबाच्या पदरी निराशाच पडली.
 
फखराचे वडील म्हणतात की, "पण फखरा बरी होऊ शकली नाही, त्यानंतर आम्ही मुलतानला परत आलो."
 
यानंतर फखराला पुन्हा मुलतानच्या निश्तर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काझी इस्माईल म्हणतात की, "आमचं घर हॉस्पिटलपासून लांब असल्याने आम्ही ते घर सोडलं आणि हॉस्पिटलजवळ भाड्याने दुसरं घर शोधलं."
या संपूर्ण कालावधीत फखराची आई तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये नेहमी हजर होती.
 
त्या म्हणतात की, "मागच्या पंधरा वर्षांमध्ये मी फक्त एकदाच हे शहर सोडून गेले होते, जेव्हा माझी आई वारली होती."
 
दवाखान्याच्या बेडवर झोपलेल्या फखराचे कपडे बदलणे, तिचे लाड करणे, दिवसभर तिची काळजी घेणे ही कामं फखराच्या आईने कसलीही तक्रार न करता केली.
 
काझी इस्माईल ताहिर सांगतात की, ती सकाळीच फखराकडे जायची आणि बराच वेळ तिथे राहिल्यानंतर दुपारी काही वेळासाठी घरी परत यायची.
 
ताहीर म्हणतात की, "ती संध्याकाळी पुन्हा हॉस्पिटलमध्ये जायची. रात्री ती फखराचे कपडे वगैरे धुत असे आणि तिला लागणाऱ्या वस्तू तयार करत असे. या काळात कधी कधी आमच्या घरात फक्त एक वेळच जेवण बनवता येत असे. कधी कधी तर आम्ही स्वयंपाकच करत नसू."
 
फखरा आई होण्याची तयारी करत होती तेव्हा...
फखराचे लग्न हे अरेंज मॅरेज होते. लग्नानंतरही तिने नोकरी सुरूच ठेवली होती. प्रसूतीपूर्वी ती तिच्या पालकांकडे आली होती.
 
फखराचे आई म्हणते की, “फखरा अनेकदा माझ्याशी तिच्या होणाऱ्या बाळाबद्दल बोलायची. तिच्या बाळाला ती सर्वोत्तम शाळेत शिकवणार असल्याचं ती मला सांगायची. तिच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाला एक यशस्वी माणूस बनवण्याचं तिचं स्वप्न होतं. कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटेल असा माणूस तिला घडवायचा होता. ती अनेकदा म्हणायची की मी नोकरी करते आणि नोकरी सोडता येणार नाही त्यामुळे तिच्या बाळाचं संगोपन नेमकं कसं होईल हे तिला माहिती नाही.”
 
प्रसूतीपूर्वी फखराने बाळाचे कपडे आणि इतर वस्तू तयार केल्या होत्या. बाळंतपणात जात असताना ती आई होणार असल्यामुळे खूप खुश होती असं फखरा यांच्या आई सांगतात.
 
फौजिया अजीम ताहिर म्हणतात की, "जेव्हा फखरा कोमात गेली तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की ती कुणाचीतरी वाट बघत आहे. तिच्या मुलीचा मृत्यू झाल्याचं तिला माहीत नव्हतं. मला माहित नाही की त्याक्षणी तिला काय वाटत असेल, तिच्या डोक्यात कोणते विचार असतील. त्या रुग्णालयाच्या खाटेवर पडून ती काय विचार करत असेल याचीच मी चिंता करायचे.”
 
फौजिया म्हणतात की, फखराचा नवरा काही दिवस आपल्या आजारी पत्नीला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येत असे, पण नंतर त्याने येणं बंद केलं.
 
त्या सांगतात की, "तिच्या पतीचं वय कमी होतं कदाचित त्याने स्वतःच्या भविष्याचा विचार केला असेल."
 
फखराच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतरही तिच्या पतीने काहीच प्रतिक्रिया न दिल्याची खंत तिच्या आईवडिलांना आहे.
 
फौजिया म्हणतात की, "फखराच्या मृत्यूच्या बातमीनंतर तो काही बोलला असता तर आम्हाला बरं वाटलं असतं."
 
दरम्यान, फौजिया अझीम ताहीर यांनी हेही सांगितलं की त्यांचे कुटुंब दरवर्षी फखराचा वाढदिवस साजरा करत असत आणि घरी लग्न किंवा इतर कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी, कुटुंब हॉस्पिटलमध्ये फखराच्या बेडजवळ जास्त वेळ घालवत असे.
'असं वाटायचं की फखरा माझ्याकडे बघून हसत आहे'
फखराची आई फौजिया अजीम ताहीर सांगतात की, जरी त्यांची मुलगी कोमात असली तरी तिचा किमान श्वास चालू आहे हे बघून त्यांना दिलासा मिळायचा.
 
त्या म्हणतात की, "जेव्हा मी सकाळी तिच्याजवळ जायचे, तेव्हा मी अनेकदा तिचा चेहरा आणि डोळ्यांकडे बघत असे आणि ती माझ्याकडे पाहत आहे असं मला वाटायचं आणि मी तिच्या जवळ गेल्यावर मला तिला आनंद व्हायचा हे मला जाणवायचं."
 
त्या सांगतात की, "बऱ्याच वेळा मी तिचे काम सुरू केल्यावर ती मला थोडी दुखावलेली दिसायची, पण जेव्हा मी काम संपवायचे, तेव्हा ती हसत असल्याचं मला वाटायचे. मला इतका आनंद व्हायचा की मी ते सांगू शकत नाही."
 
फौजिया अझीम ताहिर म्हणाल्या की, कोमाच्या सुरुवातीला फखराला अनेक समस्या होत्या. तिची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे नष्ट झाली होती. तिला अनेक प्रकारचे संसर्ग झाले होते.
"जेव्हा तिला संसर्ग झाला होता तेंव्हा मला तिची वेदना जाणवत होती."
 
फौजिया म्हणतात की, “पहिल्यांदा मी फखराला पुन्हा आयुष्य मिळावे अशी प्रार्थना करायचो आणि नंतर संसर्गामुळे तिची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून अल्लाहने तिचे दुःख कसेतरी संपवावे, अशी प्रार्थना करू लागलो.”
 
फखराचे वडील काझी इस्माईल ताहिर म्हणतात की, "आम्ही असे म्हणत नाही की सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी निष्काळजीपणा करतात. पण लक्षात या व्यवसायात निष्काळजीपणा आणि चुकांना जागा नाही हेही आपण ध्यानात ठेवलं पाहिजे."
 
ते म्हणतात की, "आमची 15 वर्षांची कहाणी देशभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी ऐकावी अशी आमची इच्छा आहे जेणेकरून भविष्यात आमच्या कुटुंबाला ज्या वेदना आणि दु:खाला सामोरे जावे लागले आहे ते इतर कुणाच्याही नशिबी येऊ नये."
Published By- Priya Dixit