शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 4 एप्रिल 2019 (12:53 IST)

वायनाड लोकसभा निवडणूक: राहुल गांधी यांनी भरला अर्ज, त्यांच्याविरुद्ध लढणारे तुषार वेलापल्ली कोण आहेत?

आपल्या पारंपरिक अमेठी लोकसभा मतदारसंघाशिवाय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी दक्षिणेतील वायनाड मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला.
 
तामिळ नाडू, केरळ आणि कर्नाटक अशी तीन राज्य एकत्रित येतात त्या वायनाडमधून निवडणूक लढण्याचा निर्णय हा दक्षिणेत काँग्रेसचा पाया भक्कम करण्याचा प्रयत्न मानला जातोय.
 
केरळमध्ये एकूण 20 लोकसभा मतदारसंघ आहेत. केरळ राज्यातील कोळीकोड, वायनाड आणि मलाप्पुरम जिल्ह्यांमध्ये वायनाड मतदारसंघ पसरलेला आहे. वायनाड मतदारसंघात मनतवडी, कालपेटा, सुलतान बॅटरी, तिरुवंबडी, निलांबर, वांदूर, एरानाड हे विधानसभा मतदारसंघ येतात.
 
पण राहुल यांना इथे टक्कर देण्यासाठी भाजपने तुषार वेलापल्ली यांना मैदानात उतरवलं आहे. तुषार हे भारत धर्म जन सेना म्हणजेच BDJSचे नेते आहेत.
 
वायनाड मतदारसंघातील लोक धर्म-जात वगैरे मुद्यांवर नव्हे तर राजकीय मुद्यांवर मतदान करतील, असं तुषार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. "आम्हाला मुस्लीम, ख्रिश्चन तसंच अन्य धर्मीय नागरिकांचीही मतं मिळतील. केरळचे मतदार धार्मिक मुद्यांच्या आधारे मतदान करत नाहीत."
हिंदूंची संख्या कमी असल्यामुळे राहुल गांधी वायनाडमधून आपलं नशीब आजमावत आहेत, असा आरोप तुषार यांनी केला.
 
आता मुद्दा वायनाडच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाचा आहे. पंतप्रधान आणि भाजप पक्ष पुन्हा निवडून येईल. राहुल गांधी विरोधी पक्षाचेच नेते राहतील. म्हणूनच विरोधी पक्षाच्या नेत्याला निवडून देण्याऐवजी मतदार पंतप्रधान मोदींना पसंती देतील.
 
बाप-लेकात मतभेद
BDJS पक्षाची स्थापना तुषार यांचे वडील वेल्लापल्ली नातेसन यांनी केली होती. ते एझावा समाजाची संस्था श्री नारायण धर्म परिपालना योगमचे शक्तिशाली नेते आहेत. श्री नारायण धर्म परिपालना योगमची स्थापना विसाव्या शतकात समाजसुधारक श्री नारायण गुरू यांनी केली होती.
 
50 वर्षीय तुषार BDJSचे प्रमुख आहेत तसंच केरळ राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे संयोजकही आहेत. तुषार त्रिशूरमधून लढणार, अशी चर्चा होती. मात्र अमित शहा यांना राहुल गांधीविरोधात शक्तिशाली उमेदवार हवा होता, म्हणून वायनाडमध्ये तुषार यांची निवड करण्यात आली.
 
"एखादा बाहेरचा माणूस येऊन आपल्यावर राज्य करतोय, हे केरळच्या नागरिकांना आवडणार नाही. म्हणून ते मला मतदान करतील," असं तुषार यांना वाटतं.
 
दरम्यान, राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षाच्या केरळमधील लोकांनीच वायनाडमधून लढण्याचा आग्रह केला होता. त्याविषयी विचारलं असता तुषार सांगतात, "तसं नाही. ते काँग्रेस अध्यक्ष आहेत. वायनाडमधून लढण्यासाठी त्यांनी स्वत:हूनच आपलं नाव पुढे रेटलं. अमेठीत त्यांचा पराभव होणार असल्याने त्यांनी ही खेळी रचली."
 
वडिलांची डाव्या विचारसरणीच्या पक्षांशी निष्ठा
दरम्यान, तुषार यांचे वडील उद्योगपती आहेत. त्यांच्या शिक्षण संस्थांही आहेत. मद्यनिर्मिती व्यवसायातून त्यांनी रेल्वेचे कॉन्ट्रॅक्स घेण्याच्या व्यवसाय सुरू केला आहे. सरकारच्या निकटवर्तीयांपैकी ते मानले जातात.
पण बापलेकातच वैर असल्याची गोष्ट उघड आहे.
 
तुषार यांचे वडील वेलापल्ली नातेसन पक्के उद्योगपती आहेत. काँग्रेसप्रणित UPA सरकार सत्तेत आलं तर ते त्यांच्याकडूनही कामं करवून घेतील. त्याचवेळी CPM अर्थात डाव्या पक्षाच्या सरकारशीही त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत, अशी माहिती एका पत्रकाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.
 
डाव्या पक्षांच्या Left Democratic Front (LDF) या आघाडीने 620 किलोमीटरची मानवी साखळी तयार केली होती, त्यावेळी नातेसन त्याचा भाग होते. त्यांच्या मुलाने या सगळ्या उपक्रमापासून स्वत:ला दूर ठेवलं. स्वामी अय्यपाच्या शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशाची अनुमती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने देण्यात आली होती. हा उपक्रम कोर्टाच्या निर्णयाच्या समर्थनार्थ होता.
 
तुषार यांच्या उमेदवारीला वडिलांचा पाठिंबा आहे का?
 
तुषार सांगतात, "वडिलांचा मला पाठिंबा आहे. ते माझे बाबा आहेत. शबरीमला हा राजकीय मुद्दा नव्हता. मानवी साखळी उपक्रमात ते सहभागी झाले, कारण सरकारने त्यांना तसं करण्यास सांगितलं होतं. OBC तसंच बहुसंख्य हिंदूंनी या उपक्रमात सहभाग नोंदवला होता."
 
स्वत:ची उमेदवारी आणि जिंकण्याबाबत तुषार ठाम आहेत. भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि काँग्रेस पक्षाने तुषार यांना तुल्यबळ म्हटलेलं नाही.
 
भाजपच्या गोटात चिंता
"केरळमध्ये LDF आणि UDF एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. निवडणुका राजकीय मुद्यांवर लढल्या जातात. मात्र धार्मिक कंगोरेही तितकेच महत्त्वाचे ठरतात, याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही," असं CPIचे सहसचिव प्रकाश बाबू यांनी सांगितलं.
 
वायनाडची सीट CPIला देण्यात आली आहे. या मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार P.P. सुनीर यांचा गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या M. I. शानवास यांच्याकडून पराभव झाला होता.
 
केरळमध्ये राजकीय मुद्देच महत्त्वाचे ठरतात, यावर AICC सचिव प्रकाश बाबू आणि तुषार यांचं एकमत झालं.
 
उत्तर भारत आणि इथली परिस्थिती अगदीच वेगळी आहे. समाजाचा नेता काय म्हणतो, काय करायला सांगतो, यावर मतदार निर्णय घेत नाहीत. मात्र तरीही भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.
 
भाजपला राहुल गांधी यांच्याविरुद्ध विजयाची एवढी खात्री आहे तर त्यांनी स्वत:चा उमेदवार उभा करायला हवा होता. कमळाच्या चिन्हावर कुणीही निवडणूक लढत नाहीये. वायनाडमधील निकाल एकतर्फी काँग्रेसच्या पारड्यात जाण्याची चिन्हं आहेत, असं प्रकाश बाबू यांनी सांगितलं.
 
वायनाडच का?
भौगोलिक आणि सांस्कृतिक कारणांमुळे राहुल गांधी यांच्यासाठी वायनाडची निवड केल्याचं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं.
 
2008 मध्ये वायनाड हा मतदारसंघ तयार झाला. वायनाड मतदारसंघात विधानसभेच्या सात जागा येतात. 2009 आणि 2014 मध्ये वायनाडमधून काँग्रेसचे M. I. शानवास विजयी झाले होते. मात्र गेल्या वर्षी त्यांचं निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली.
 
2009 आणि 2014 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं. 23 एप्रिलला वायनाडसाठी मतदान होणार आहे.

इम्रान कुरेशी