डॉ. मिताली वसवडा
	बीबीसी गुजरातीसाठी
	गर्भाशयातल्या गाठी, ही महिलांच्या प्रजनन संस्थेत उद्भवणारी एक अत्यंत सामान्य समस्या आहे.
				  																								
									  
	 
	बहुतेकवेळा गर्भाशयात गाठी असल्या तरी त्याची बाह्य लक्षणं दिसत नाहीत आणि म्हणूनच बरेचदा त्याचं वेळेत निदान होत नाही.
				  				  
	 
	बरेचदा एखाद्या वेगळ्याच आजारासाठी जेव्हा रुग्णाची तपासणी केली जाते त्यावेळी रुग्णाच्या गर्भाशयात गाठी असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास येतं.
				  											 
																	
									  
	या गाठीमुळे प्रत्येक तीनपैकी दोन स्त्रियांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. गर्भाशयातल्या गाठींमुळे अंगावर भरपूर जाणं, ओटीपोटात सतत दुखणं आणि अनियमित पाळी असे प्रकार बहुतेकदा आढळतात. काहीवेळा गर्भाशयातली गाठ अशा भागात असते ज्यामुळे शरीर संबंधावेळी पोटात असहनीय वेदना होतात.
				  																							
									  
	 
	कंबरदुखी, गर्भधारणेत अडचणी येणं आणि गर्भपात हीदेखील गर्भाशयात गाठी झाल्याची लक्षणं आहेत.
				  																	
									  
	 
	अनेकदा तर गाठ इतकी मोठी असते की त्यामुळे मूत्राशयावर दबाव येऊन वारंवार लघवीला जावं लागतं. इतकंच नाही तर सतत मूत्रमार्गाचा संसर्ग होत असतो.
				  																	
									  
	गर्भाशयात गाठी तयार होण्याचं मुख्य कारण म्हणजे स्त्रियांच्या शरीरात स्रवणारं 'एस्ट्रोजेन' हे संप्रेरक किंवा हार्मोन. याचाच अर्थ गर्भधारणा होऊ शकणाऱ्या कुठल्याही स्त्रीला ही समस्या भेडसावू शकते.
				  																	
									  
	 
	रजोनिवृत्ती झाल्यानंतर गर्भाशयात गाठी तयार होण्याची शक्यता खूप कमी असते.
	 
				  																	
									  
	गर्भाशयातल्या गाठी कुणाला होतात?
	30 ते 50 वर्ष वयोगटातल्या महिलांमध्ये गर्भाशयात गाठी होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे.
				  																	
									  
	 
	लठ्ठ महिलांच्या शरीरात एस्ट्रोजेन संप्रेरकाचं प्रमाण अधिक असतं आणि त्यामुळे त्यांच्या गर्भाशयात गाठी होण्याचं प्रमाणही अधिक असतं.
				  																	
									  
	 
	शिवाय, ज्या महिलांना कधीच गर्भधारणा झालेली नाही, अशा स्त्रियांमध्येही ही समस्या आढळून येते.
				  																	
									  
	 
	वेगवेगळ्या परिस्थितीनुसार या गाठींचा आकार मटाराच्या दाण्यापासून ते अगदी कलिंगडाएवढासुद्धा असू शकतो. अर्थात गाठ जेवढी मोठी तिचा त्रास तेवढाच जास्त.
				  																	
									  
	 
	गर्भाशयातल्या कुठल्या भागात गाठ आहे, यावरून ती कुठल्या प्रकारची आहे, हे ठरत असतं. बहुतांशवेळा गर्भाशयाच्या भिंतीवर गाठी येतात.
				  																	
									  
	 
	गर्भाशयाच्या आतल्या भिंतीवर गाठ असेल तर अशावेळी पाळीच्या दिवसात जास्त जाणे आणि गर्भपात अशा समस्या भेडसावू शकतात. काही वेळा गर्भाशयाच्या बाहेरच्या भिंतीवरही गाठ असू शकते.
				  																	
									  
	 
	गर्भाशयातील गाठीवर उपचार
	नियमित वैद्यकीय तपासणी केल्यास गर्भाशयात गाठ आहे, हे लवकर लक्षात येतं आणि निदान जेवढ्या लवकर होईल, तेवढे जास्त उपाय करता येतात.
				  																	
									  
	 
	प्रामुख्याने दोन प्रकारचे उपचार असतात - एक म्हणजे औषधांनी गाठ नष्ट करता येते आणि दुसरं म्हणजे शस्त्रक्रिया करून गाठ काढता येते.
				  																	
									  
	 
	मासिक पाळीत खूप जास्त रक्त जात असेल, रुग्ण अशक्त झाला असेल तर अशा रुग्णांना तातडीने उपचार देण्याची गरज असते.
				  																	
									  
	 
	मात्र, पाळीत खूप जास्त नसेल तर अशावेळी फक्त औषधोपचारही पुरेसे असतात. बहुतेकवेळा रुग्णांना हॉर्मोन नियंत्रणाची औषधं दिली जातात.
				  																	
									  
	 
	पण, काही रुग्णांना ही औषधं देता येत नाही. अशा परिस्थितीत ऑपरेशनशिवाय दुसरा पर्याय नसतो.
				  																	
									  
	 
	शस्त्रक्रिया करायची झाल्यास त्याही दोन प्रकारच्या असतात. पहिला प्रकार म्हणजे फक्त गाठ काढणं. ही साधी आणि छोटी शस्त्रक्रिया असते. मात्र, दुसरी शस्त्रक्रिया थोडी अवघड आणि मोठी असते. यात संपूर्ण गर्भाशय काढून टाकतात.
				  																	
									  
	 
	स्त्रीला आई व्हायचं असेल तर मात्र फक्त गाठ काढतात.
	 
	एकंदरित गर्भाशयाच्या गाठी स्त्रियांमध्ये एक सामान्य समस्या आहे, असं म्हणता येईल. त्यामुळे या गाठींचं निदान वेळेत करण्यासाठी नियमित वैद्यकीय तपासणी करणं गरजेचं आहे. जेवढं लवकर निदान तेवढे लवकर आणि सोपे उपचार घेता येतात.