मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 18 डिसेंबर 2019 (09:51 IST)

Shriram Lagoo: 'देवाला रिटायर करा' म्हणणारे 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. 
 
अभिनयसृष्टी आणि सामाजीक क्षेत्रामध्ये पाच दशकांहून अधिक काळ कार्यरत राहिलेल्या डॉ. श्रीराम लागू यांनी मराठी चित्रपट, नाटक आणि सार्वजनिक जीवनात आपल्या योगदानाने आपला एक अमीट ठसा निर्माण केला.
 
मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड समजल्या जाणाऱ्या 'नटसम्राट' या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका त्यांनी केली आणि हे पात्र अजरामर झालं. आकाश पेलताना, काचेचा चंद्र, गार्बो, गिधाडे, नटसम्राट, आंधळ्यांची शाळा, गुरुमहाराज गुरु, उद्धवस्त धर्मशाळा, चंद्र आहे साक्षीला, किरवंत, बेबंदशाही, सूर्य पाहिलेला माणूस, उद्याचा संसार अशा अनेक मराठी नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या.
 
डॉ. लागू यांचं शिक्षण पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये झालं. अभिनयाचा छंद त्यांना लहानपणापासूनच होता. वैद्यकीय शिक्षण घेतानाही त्यांनी हा छंद आवर्जून जोपासला. डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी काही काळ आफ्रिकेत नोकरी केली होती. अभिनयाचा छंद त्यांनी तेथेही जोपासला होता.
 
श्रीराम लागू यांनी हिंदी चित्रपटांमधूनही अनेक चरित्रभूमिका साकारल्या. 1977 साली आलेल्या 'घरौंदा' या चित्रपटातील मध्यमवयीन बॉसच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. 
रिचर्ड अॅटनबरोंच्या 'गांधी' चित्रपटात त्यांनी गोपाळ कृष्ण गोखलेंची एक छोटीशी भूमिका साकारली होती. पुण्यात शिकत असतानाही डॉ. लागूंनी गोखलेंची भूमिका केली होती. तीच भूमिका त्यांना पुन्हा एकदा अॅटनबरोसारख्या दिग्दर्शकाबरोबर साकारायला मिळाली, असं बीबीसीच्या भारतीय भाषांच्या टीव्ही संपादक वंदना सांगतात.
 
डॉ. लागूंच्या आणखी एका सिनेमाचा विशेष उल्लेख वंदना करतात, तो म्हणजे 'एक दिन अचानक'. "या सिनेमातला प्रोफेसर शशांक रे आपल्या कुटुंबाला एके दिवशी अचानक सोडून निघून जातो. तो कधीच परतत नाही, पण त्यानंतर कथानकाचा भाग नसूनही लागूंचं ते पात्र एका भावनेसारखं पूर्ण कथेवर आपला प्रभाव कायम ठेवतात," असं त्या सांगतात. 
 
डॉ. लागू यांनी भूमिका साकारलेले चित्रपट-
पिंजरा, सामना, सिंहासन, सुगंधी कट्टा, देवकीनंदन गोपाला, स्वयंवर, हमसे है जमाना, सदमा, समय की धारा, शेर शिवाजी, शालीमार. मै इन्तकाम लूंगा, रास्ते प्यार के, लूटमार, लावारिस, सम्राट, होली.
 
'झालेत बहु, होतील बहु, पण या सम हाच'मराठी रंगभूमीने लाडका नटसम्राट गमावला आहे. 'झालेत बहु, होतील बहु, पण या सम हाच'अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. श्रीराम लागू यांना श्रद्धांजली वाहिली. डॉ.लागू यांनी साकार केलेला 'नटसम्राट' अविस्मरणीय असल्याचे सांगून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मराठी तसेच हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले, पण 'पिंजरा' मधील 'मास्तर' आणि 'सिंहासन'मधला 'मंत्री' त्यांनी जबरदस्त पद्धतीने उभा केला.डॉ लागू हे उत्तम वाचक, लेखक व विचारवंत होते. सामाजिक, राजकीय विषयांवर ते आपली मते ठामपणे मांडत राहिले. मराठी रंगभूमी समृद्ध करण्यात त्यांचे योगदान मोठे होते. डॉ.लागू यांना महाराष्ट्राची जनता सदैव स्मरणात ठेवेल.
 
नाट्य-चित्रपटविश्वावर शोककळा
'लमाण' हे डॉ. लागूंचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी 'लमाण' हे पुस्तक म्हणजे कोणत्याही नटासाठी अभिनयाचं बायबल आहे, असं म्हटलं होतं. 
 
सिनेकलाकार असूनही डॉ. लागू सामाजिक मुद्द्यांवर नेहमी व्यक्त व्हायचे. त्यावरुन कधीकधी ते वादाच्या भोवऱ्यातही सापडले, मात्र धर्म आणि अंधश्रद्धासारख्या सामाजिक विषयांकडे दुर्लक्ष केलं नाही.
 
काही वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या 'देवाला रिटायर करा' या वक्तव्यावर अनेक उलट-सुलट चर्चा झाल्या होत्या. नंतरच्या काळात डॉ. लागूंनी स्वतःला अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जोडून घेतलं होतं. प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशनच्या माध्यमातून श्रीराम लागू यांनी समांतर रंगभूमीसाठी मोठं योगदान दिलं. 
 
डॉ. श्रीराम लागू अध्यक्ष असलेल्या रुपवेध प्रतिष्ठानतर्फे नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रंगकर्मींसाठी 'तन्वीर सन्मान' हा पुरस्कार दिला जायचा. आपला दिवंगत मुलगा तन्वीर याच्या स्मृतिप्रीत्यर्थ 2004 पासून त्यांनी हा पुरस्कार द्यायला सुरुवात केली होती. त्याचबरोबर 'तन्वीर रंगधर्मी' हा पुरस्कारही रुपवेध प्रतिष्ठानतर्फे दिला जायचा. 
 
1999 साली जेव्हा अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात उपोषण केलं होतं तेव्हा श्रीराम लागू यांनीही त्यात सहभागी होऊन तीन दिवसांचं उपोषण केलं होतं.
 
"डॉ. श्रीराम लागू यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी भरुन येणार नाही. त्यांचं व्यक्तिमत्त्व अतिशय पारदर्शक होतं. त्यांनी आपल्या अभिनयातून नेहमी एक विचार मांडला. ते खऱ्या अर्थानं अभ्यासू आणि विचारी नट होते. सॉक्रेटिसनं वर्णन केल्याप्रमाणे ते अॅथलिट आणि तत्त्वज्ञ नट होते," या शब्दांत ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना डॉ. श्रीराम लागूंबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
"डॉ. लागू यांनी नाटकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीही नेहमी लढा दिला. आणीबाणीच्या काळात त्यांनी स्वतः 'अँटिगनी'सारखं नाटक केलं. 'घाशीराम कोतवाल', 'सखाराम बाइंडर'सारख्या नाटकांवरून जेव्हा वाद उद्भवला होता, तेव्हा ते कलाकारांच्या आणि दिग्दर्शकांच्या पाठीशी उभे राहिले होते," असंही सतीश आळेकर यांनी आवर्जून नमूद केलं. तसंच हिंदी सिनेक्षेत्रातूनही त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं जातंय.
 
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांना "सर्वांत नैसर्गिक अभिनेत्यांपैकी एक" म्हटलं आहे.
नॅशनल फिल्म आर्काईव्ह ऑफ इंडिया (NFAI)नेही त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे.
 
राजकीय विश्वातूनही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जातोय...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रीराम लागूंना "वैचारिक भान असलेले प्रयोगशील रंगकर्मी" म्हणत श्रद्धांजली वाहिली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना "अभिनय जगतातील 'सिंहासन'" म्हटलं आहे.
तसंच त्यांच्याबद्दल लिहिताना ते म्हणाले, "अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त अंधश्रद्धा निर्मुलनासह अनेक सामाजिक कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले. अण्णा हजारे यांच्या लढ्यातही त्यांचा वाटा होता. मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टी सुद्धा त्यांनी गाजवली. त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या, आप्तस्वकियांच्या, कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे."
 
भाजप खासदार पूनम महाजन यांनीही त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचं ट्वीट -
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे त्यांना "अनेक कलावंतांसाठी दीपस्तंभ" म्हटलं आहे.
अभिनेते सुमीत राघवन यांनी ट्वीटरवर श्रद्धांजली वाहाताना एका युगाचा अंत झाला आहे अशा शब्दांमध्ये आपल्या भावना मांडल्या आहेत. नटसम्राटाने एक्झिट घेतली. एक पर्व संपलं, पण विचार नाही अशी श्रद्धांजली त्यांनी वाहिली आहे.