शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (19:30 IST)

डोनाल्ड ट्रंप यांनी महाभियोगादरम्यान बचाव करताना काय म्हटलं?

ॲंथनी झर्चर
बीबीसी उत्तर अमेरिका प्रतिनिधी
 
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर महाभियोग भरवण्यात आला आहे. खटल्याच्या चौथ्या दिवशी ट्रंप यांना बचाव पक्ष म्हणून आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली.
 
गेल्या आठवड्यात ट्रंप यांच्या वकिलांच्या टीमनं ट्रंप यांच्यावरचा महाभियोग खटला असंवैधानिक असल्याचं निक्षून सांगितलं होतं आणि हे ट्रंप यांच्या अधिकारांचं उल्लंघन असल्याचं म्हटलं होतं.
 
पण त्यांच्या या दाव्याचा उपयोग झाला नाही आणि त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली.
डोनाल्ड ट्रंप यांची बाजू मांडण्यासाठी त्यांच्या वकिलांनी तीन तासांपेक्षा थोडा जास्त वेळ घेतला तर फिर्यादी पक्षाची बाजू मांडण्यासाठी तेरा तास लागले होते.
 
असं वाटतं, की बचाव पक्षानं कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कारण ट्रंप यांना दोषी ठरवलं जाऊ नये, यासाठी त्यांच्या रिपब्लिकन पक्षाचे पुरेसे सदस्य माजी राष्ट्राध्यक्षांची बाजू घेणार असल्याचं आधीच स्पष्ट झालं आहे.
 
आपली बाजू मांडताना ट्रंप यांच्या टीमनं केलेल्या युक्तिवादाचा सारांश काहीसा असा आहे -
 
'डेमोक्रॅट्सनीही असं केलं आहे'
डोनाल्ड ट्रंप यांचा बचाव करताना त्यांच्या वकिलांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांचं बोलणंच त्यांच्या विरोधात वापरण्याचा प्रयत्न केला.
 
ट्रंप यांच्या वकिलांच्या टीमचे लीड इंपीचमेंट मॅनेजर जेमी रस्किन यांच्यासह हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जच्या सदस्यांचे जुने व्हीडियो क्लीप्स दाखवले ज्यात ते याआधीच्या काळात झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालाचा निषेध करताना दिसतात.
 
ट्रंप यांच्या वकिलांनी विचारलं, "जर डेमोक्रॅट्स निवडणुकीच्या निकालांना आव्हान देऊ शकतात, तर ट्रंप का नाही?"
 
व्हीडिओ क्लीपमध्ये डेमोक्रॅट्सच्या वक्तव्यांनंतर ते फुटेज दाखवण्यात आलं ज्यात आंदोलनांदरम्यान झालेल्या हिंसेची दृष्यं होती.
 
ट्रंप यांच्या निवडणुक प्रचाराचं ब्रीदवाक्य 'अ बॅटल' फॉर द सोल ऑफ अमेरिका' म्हणजे अमेरिकेचा आत्मा टिकवण्यासाठी युद्ध असं होतं, याकडे त्यांचे वकील मायकल वेन ब्लीन यांनी लक्ष वेधून घेतलं.
 
ब्लीन म्हणाले की डेमोक्रॅट्सना शिक्षा व्हावी असं त्यांना वाटत नाही, पण अशी घोषणाबाजी ही अमेरिकन राजकारणाचा आधीपासूनच भाग होती.
 
ते म्हणाले की, आता कदाचित राजकीय कटुता कमी करण्याची वेळ आले आहे. पण ट्रंप यांच्या भाषणाला महाभियोग भरवण्याचा किंवा त्यांना दोषी ठरण्याचा पुरावा मानता येणार नाही.
 
'डेमोक्रॅट्सनी ट्रंप यांना समजण्यात चूक केली'
ट्रंप यांचे वकील डेव्हिड स्कून यांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांनी डेमोक्रॅटिक इंपिचमेंट मॅनेजर्सवर बरसण्यास सुरुवात केली.
स्कून यांनी त्यांच्यावर माजी राष्ट्राध्यक्षांची भाषणं अशी निवडून निवडून एडिट करण्याचा आरोप लावला, जेणेकरून ती आणखी भडकावू वाटतील.
 
डेव्हिड स्कून यांनी 2017 साली व्हर्जिनियात वंशश्रेष्ठत्व वाद्यांच्या (गौरवर्णिय वर्चस्ववादींच्या) एका रॅलीनं हिंसक रूप घेतलं होतं, तेव्हाचं ट्रंप यांचं केलेलं एक विधान मांडलं.
 
त्यात ट्रंप यांनी म्हटलं होतं की 'दोन्ही बाजूला चांगले लोक आहेत.' ट्रंप यांच्या या वक्तव्यावर खूप टीका झाली होती.
 
स्कून यांनी सांगितलं की प्रत्यक्षात ट्रंप यांनी हे विधान हिंसाचाराच्या आदल्या रात्री एका शांततापूर्ण कार्यक्रमात म्हटलं होतं. अर्थात त्यांनी त्याच रात्री घडलेल्या घटनेचा उल्लेख केला नाही, ज्यात मशाल हाती घेऊन काही घोळक्यांनी 'ज्यूज विल नॉट रिप्लेस असं' (यहुदी आमची जागा घेऊ शकत नाहीत.) अशी घोषणाबाजी केली होती.
 
खटल्याची कारवाई लाईव्ह पाहणाऱ्या पत्रकारांनी म्हटलं आहे की डेव्हिड स्कून जेव्हा ट्रंप यांची बाजू मांडत होते, तेव्हा अनेकदा डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्याकडे संशयानं पाहिलं.
 
न्यूज शो सारखा वादविवाद
अनेकदा बचाव पक्षाचा प्रतिवाद त्या मीडिया कव्हरेजसारखा भासला ज्यानं ट्रंप यांना राजकीय कारकीर्दीच्या शिखरावर नेलं होतं.
 
ट्रंप यांच्या वकिलांनी जे व्हीडियो सादर केले त्यात काही खास पद्धतीच्या क्लिप्सना वेगवेगळ्या पद्धतीनं मांडण्यात आलं होतं. त्यात संगीत होतं, आग आणि हिंसेची एडिट केलेली दृष्यं होती. हे सगळं फॉक्स न्यूजवर संध्याकाली येणाऱ्या एका कार्यक्रमासारखं होतं.
 
या व्हीडिओ क्लिप्समध्ये त्या डेमोक्रॅटिक नेत्यांची दृष्यही होती जे रिपब्लिकन पक्षाच्या डोळ्यात खुपतात, जसं की बर्नी सँडर्स, चक शूमर आणि नॅन्सी पेलोसी.
 
याशिवाय क्लिपमध्ये ट्रंप यांच्या विरोधात बोलणाऱ्या मॅडोना आणि जॉनी डेपसारख्या हॉलिवूडमधले तारेतारकांची विधानंही दाखवण्यात आली.
 
साहजिकच हा फक्त एक खटला नाही, तर राजकीय मुद्दा आहे.
 
ट्रंप यांचं 'अभिव्यक्ति स्वातंत्र्य'
माजी राष्ट्राध्यक्षांच्या वकिलांनी केलेल्या प्रतिवादात अमेरिकन राज्यघटनेतील पहिल्या घटनादुरुस्तीचा उल्लेख केला गेला. या घटनादुरुस्तीनं अमेरिकन नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं. ट्रंप यांच्या वकिलांनी म्हटलं की सहा जानेवारीच्या दिवशी ते याच स्वातंत्र्याच्या अधिकाराचा वापर करत होते.
 
ट्रंप यांच्या वकिलांच्या टीमनं म्हटलं आहे की सीनेटनं ट्रंप यांना त्यांच्या वक्तव्यांसाठी दोषी ठरवलं, तर याचा परिणाम संपूर्ण राजकारणावर पडेल आणि मग कोणत्याही नेत्याला विनाकारण दोषी ठरवण्याचा मार्ग मोकळा होईल.
 
ट्रंप यांचे वकील ब्लीन यांनी म्हटलं आहे, की "सत्तेच्या मार्गावर अशा राजकीय भाषेचा वापर वर्षानुवर्ष केला जातो आहे. ट्रंप यांनी जे म्हटलं, त्याला राजकीय भाषणांपेक्षा वेगळं करून पाहणं अशक्य आहे."
 
त्यांनी 144 घटनातज्ज्ञांची स्वाक्षरी असलेल्या त्या पत्राला 'कायद्याच्या दृष्टीनं हास्यास्पद' म्हटलं आहे, ज्या पत्रात पहिली घटनादुरुस्ती ट्रंप यांच्या बाबतीत लागू होत नसल्याचं म्हटलं आहे.
ब्लीन यांनी म्हटलं आहे की 'इंपीचमेंट मॅनेजर्स'नी या पत्राचा वापर ट्रंप यांच्या टीमला घाबरवण्यासाठी केला आहे. आपल्या विरोधी पक्षाकडे वळत त्यांनी सवाल विचारला, "तुमची हिम्मत कशी झाली?"
 
कायद्याच्या दृष्टीनं हा प्रतिवाद सर्वोत्तम नव्हता, पण ट्रंप यांच्या टीमचं हे आक्रमक रूप त्यांच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं.
 
ट्रंप यांना माईक पेन्स संकटात असल्याचं माहिती होतं?
बचाव पक्षाचा प्रतिवाद पूर्ण झाल्यावर प्रश्नांची वेळ आली. रिपब्लिकन पक्षाचे खासदार मिट रॉम्नी आणि सुझन कॉलिन्स यांनी दोन्ही पक्षांना एक वेधक प्रश्न विचारला.
 
त्यांनी विचारलं, की हिंसाचार झाला, त्यादिवशी ट्रंप यांनी माजी उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांच्याविषयी चिंता व्यक्त करणारा ट्वीट केला होता, तर मग त्यांना हे माहिती होतं का की पेन्स यांना गुप्तहेर खात्याच्या सुरक्षारक्षकांनी सीनेट चेंबरमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं होतं?
 
इंपीचमेंट मॅनेजर आणि खासदर फ्लीन कॅस्ट्रो यांनी त्यावर उत्तर देताना म्हटलं की ट्रंप यांना अंदाज असेलच की गर्दी पेन्स यांना धमक्या देत आहे. ते म्हणाले, "कॅपिटल हिलमध्ये झालेल्या हिंसाचाराची दृष्यं राष्ट्रीय टीव्हीवर प्रसारित हत होती. व्हाईट हाऊसमध्ये संचार आणि संवादाची सर्वोत्तम व्यवस्था होती आणि ट्रंप यांना स्वत: अलाबामाचे खासदार टॉमी ट्यूबरविल यांनी फोन करून सांगितलं होतं की पेन्स यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे."