बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 23 सप्टेंबर 2019 (10:50 IST)

नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रंप यांना 'हाऊडी' कार्यक्रमातून जगाला काय दाखवायचं आहे?

कमलेश
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा चर्चेत आहे. गेल्या आठवड्यापासून हाऊडी मोदी या कार्यक्रमाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या अमेरिकावारीतून मोदींना नेमकं काय साधायचं आहे?
 
रविवारी अमेरिकेतल्या ह्यूस्टनमध्ये हाऊडी मोदी कार्यक्रमात मोदींनी 50 हजार भारतीयांना संबोधित केलं. या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप उपस्थित होते.
 
इतर कुठल्यातरी देशाचे पंतप्रधान संबोधित करत असताना त्या कार्यक्रमात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 
मोदी यांचा अमेरिका दौरा भारत-अमेरिका संबंध किती दृढ झाले आहेत याचं उदाहरण आहे.
 
या दौऱ्यात मोदी ट्रंप यांना दोनवेळा भेटणार आहेत. हाऊडी मोदी कार्यक्रमानंतर मोदी-ट्रंप संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत एकमेकांना भेटतील.
 
जम्मू काश्मीर संदर्भातील कलम 370 हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले असताना मोदी यांची अमेरिका भेट महत्त्वाची आहे.
 
काश्मीर प्रश्नाची आंतरराष्ट्रीय समुदायाने दखल घ्यावी असा पाकिस्तानचा आग्रह आहे.
 
भारतात अर्थव्यवस्थेची स्थिती दोलायमान आहे. अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना जाहीर करत आहे. त्याचवेळी भारत आणि अमेरिका यांच्यादरम्यान व्यापारी करांवरून तणाव आहे.
भारताने जून महिन्यात अमेरिकेच्या 28 उत्पादनांचा कर वाढवला होता. त्याआधी अमेरिकेने भारताला दिले गेलेला विशेष व्यापारी दर्जा परत घेतला होता.
 
दोन्ही नेत्यांच्या भेटीची चर्चा खूप आहे. अमेरिका वारीतून मोदी यांना काय सिद्ध करायचं हे समजून घेऊया आंतरराष्ट्रीय विषयांचे जाणकार आणि डेलावेयर विद्यापीठाचे प्राध्यापक मुक्तदर खान.
 
व्यापारी आशा
ह्यूस्टनमध्ये आयोजित कार्यक्रमातून अमेरिकास्थित भारतीयांवर त्यांचा किती प्रभाव हे स्पष्ट होईल.
 
या कार्यक्रमाला डोनाल्ड ट्रंप उपस्थित होते. त्यामागे त्यांची राजकीय कारणं आहेत. राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत अमेरिकास्थित भारतीय नागरिकांची मतं आपल्याकडे वळवण्याचा त्यांचा मनसुबा आहे.
 
भारत-अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. ट्रंप भारताच्या काही धोरणांमुळे नाराज आहेत. मोदींच्या अमेरिका भेटीत यासंदर्भात तोडगा निघण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने घोषणाही होऊ शकते. भारतासाठी हा दौरा सकारात्मक ठरू शकतो.
 
काश्मीरप्रश्नी परिणाम
अमेरिकेला भारताकडून 100 अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे. भारताची निर्यात अमेरिकेच्या तुलनेत जास्त आहे. दोन्ही देशांदरम्यान व्यापारी करंवरून निर्माण झालेला तणाव काश्मीरप्रश्नावर परिणाम करणारा आहे.
 
व्यापारी मुद्यावरून दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी होऊन सामंजस्याने तोडगा निघाला. उदाहरणार्थ भारताने व्यापारी शुल्क कमी केलं आणि नियम शिथिल केले तर त्याचा फायदा संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत काश्मीरप्रश्नी भारताला होऊ शकतो.
 
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या बैठकीपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना आपल्या बाजूने वळवण्याची संधी मोदी यांच्याकडे आहे.
 
सोमवारी डोनाल्ड ट्रंप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भेटणार आहेत. मंगळवारी ते पुन्हा मोदींना भेटणार आहेत.
 
मात्र अमेरिका पाकिस्तानचं ऐकेल अशी शक्यता कमीच आहे. अमेरिकेसाठी पाकिस्तानचं महत्त्व कमी झालं आहे.
 
अफगाणिस्तानमध्ये तालिबानशी शांतता चर्चेच्या दृष्टीने अमेरिकेसाठी पाकिस्तान महत्त्वाचं आहे. अमेरिकेला अफगाणिस्तानमधून बाहेर पडायचं आहे. तालिबान आणि पाकिस्तान यांच्यातली जवळीक पाहता अमेरिकेला पाकिस्तानच्या सहकार्याची आवश्यकता आहे.
 
दुसरीकडे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेची गरज आहे. अशावेळी तालिबानप्रश्नी पाकिस्तानने सकारात्मक भूमिका पार पाडणे अपेक्षित होतं. म्हणूनच इम्रान खान यांची भेट घेतल्यानंतर ट्रंप यांनी काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला होता.
 
मात्र तालिबानशी शांतता चर्चा फिस्कटल्यानंतर काश्मीरचं महत्त्व कमी झालं आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेसाठी पाकिस्तान तितकंसं महत्त्वाचं राहिलेलं नाही. दुसरीकडे व्यापारी मुद्यावर अमेरिकेला साथ दिली तर भारताचं पारडं मजबूत होऊ शकतं.
 
नरेंद्र मोदींना याचा फायदा मिळू शकतो. अमेरिकेशी चांगले संबंध असणं हे केवळ भारतीय बाजारासाठी नव्हे तर मोदींची वैयक्तिक प्रतिमा उंचावण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो.
संमिश्र विजय
काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित होणं भारतासाठी काळजीचं कारण आहे.
 
काश्मीरमध्ये मानवाधिकार उल्लंघनासंदर्भात विदेशी मीडियाने वेळोवेळी बातम्या दिल्या आहेत. काश्मीर प्रश्न इतक्या लवकर निकाली निघणारा नाही.
 
भाजपचं हिंदुत्ववादी राजकारण देशातल्या लोकशाही कमकुवत करत असल्याची चर्चा आहे.
 
अल्पसंख्याक समाजातील व्यक्तींबरोबर जे घडतं आहे ते मोदी रोखू शकले आणि खऱ्या अर्थाने सबका साथ सबका विकास घोषणा प्रत्यक्षात आणू शकले तर बाजी त्यांच्या बाजूने होऊ शकते.
 
ह्यूस्टनमध्ये मोदींचं केवळ स्वागत झालेलं नाही, त्यांच्याविरोधात आंदोलनही झालं हे विसरून चालणार नाही. त्यांच्या लोकप्रियतेबरोबरच त्यांच्या निर्णयांना होत असलेल्या विरोधाचीही चर्चा आहे.
 
हा दौरा मोदींसाठी सर्वाथाने विजयश्री मिळवून देणारा नसला तरी संमिश्र विजयाचा नक्कीच आहे.