रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (11:00 IST)

IND vs PAK : बाळासाहेब ठाकरे आणि जावेद मियांदाद यांच्या भेटीत काय घडलं होतं?

- पराग फाटक
भारत-पाकिस्तान यांच्यातील दुरावलेल्या संबंधांमुळे शिवसेनेने नेहमीच पाकिस्तानच्या भारत दौऱ्याला विरोध केला.
 
शिवसेनेचा ठाम विरोध असल्यामुळे पाकिस्तानचा संघ आयसीसी स्पर्धांसाठी भारतात असला तरी वातावरण संवेदनशील होतं.
 
1999मध्ये झालेल्या कारगिल युद्धानंतर भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध आणखीनच दुरावले आणि शिवसेनेचा पाकिस्तान विरोध तीव्र झाला.
 
मात्र असं सगळं असतानाही 30 जुलै 2004 रोजी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली.
 
या भेटीवरून शिवसेनेवर टीकाही झाली. मियांदाद-बाळासाहेब ठाकरे भेट हा टीव्ही वाहिन्यांकरता चर्चेचा विषय ठरला. दुसऱ्या दिवशी बहुतांश वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर या भेटीचं छायाचित्र आणि तपशील अवतरला होता.
 
या भेटीत काय झालं?
"जावेद मियांदाद क्रिकेटपटू म्हणून मला आवडतो. 1986साली ऑस्ट्रेलेशिया कप स्पर्धेत चेतन शर्माच्या गोलंदाजीवर शेवटच्या चेंडूवर मियांदादने षटकार खेचत पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता. तो षटकार मी विसरू शकत नाही", असं बाळासाहेबांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
 
मियांदाद यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन उपाध्यक्ष आणि माजी खेळाडू दिलीप वेंगसरकरही उपस्थित होते.
 
"माझा क्रिकेटला विरोध नाही पण भारत-पाकिस्तान यांच्यादरम्यान गेल्या काही वर्षात जे काही घडलं आहे विशेषत: कारगिल नंतर भारत-पाकिस्तान क्रिकेट होऊ नये", असं ठाकरे म्हणाले.
 
जावेद यांनी या भेटीवेळी आधी जे घडलं ते विसरून जाऊया आणि भविष्याचा विचार करूया असं म्हटलं.
 
शिवसेनाप्रमुखांशी झालेल्या भेटीसंदर्भात मियांदाद यांना विचारलं असता ते म्हणाले, त्यांना क्रिकेट आवडतं. अशा भेटी भविष्यातही होतील अशी आशा आहे. यातूनच दोन देशांमधील संबंध सुधारण्यासाठी मदत होऊ शकते. शिवसेनेने हिरवा कंदील दिला तर मुंबईत भारत-पाकिस्तान लढती होऊ शकतात.
 
मियांदाद यांच्या 'मातोश्री' भेटीनंतर विरोधी पक्षांनी शिवसेनेवर टीका केली होती. यासंदर्भात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून बाळासाहेबांनी भूमिका मांडली. ते लिहितात, 'मियांदादच्या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. त्यांच्या भेटीने शिवसेना आणि शिवसैनिकांच्या भूमिकेत काहीही बदल होणार नाहीत.'
 
मियांदादच्या 'मातोश्री' भेटीचा वापर माध्यमांमधील काहींकडून गोबेल्स प्रपोगंडासारखा केला जात आहे. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना भारतात खेळण्याची परवानगी मिळावी अशी विनंती मियांदाद यांनी केली. मी या विनंतीला नकार दिला असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं.
 
राष्ट्रवादी काँग्रसेचे आमदार नवाब मलिक यांनी त्यावेळी शिवसेनेवर टीका केली होती. ते म्हणाले, "शाहरुख खानला देशद्रोही म्हणण्याचा शिवसेनेला हक्क नाही. ठाकरे यांनी मियांदाद यांचं आदरातिथ्य केलं. मियांदाद फक्त पाकिस्तानचे एवढाच मुद्दा नाही, ते दाऊद इब्राहिमशी संबंधित आहेत. ठाकरे यांनी मियांदाद यांना भेटीसाठी बोलावलं आणि भारताविरुद्धच्या षटकारासाठी त्यांनी कौतुकही केलं".
मियांदाद यांच्या 'मातोश्री' भेटीवरून भाजप नेते आशिष शेलार यांनीही टीका केली होती. मुंबई हल्ल्यात आरोपी असलेल्या संजय दत्तला शिवसेनेने पाठीशी घातलं. आमच्या राष्ट्रवादाविषयी बोलणाऱ्यांनी त्यांच्या घरी पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदादचं आदरातिथ्य झालं होतं हे विसरू नये. लोकांना सोयीस्कर राष्ट्रवाद कळतो.
 
मियांदाद वैयक्तिक भेटींकरता भारतात आले होते. भारत दौऱ्यात त्यांनी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायसिंग यादव यांची भेट घेतली.
 
मियांदाद यांनी भारताचे माजी खेळाडू चेतन शर्मा यांचीही भेट घेतली. 1986 मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलेशिया कप स्पर्धेत शेवटच्या चेंडूवर मियांदाद यांनी चेतन शर्मा यांच्या गोलंदाजीवर षटकार खेचत पाकिस्तानला थरारक विजय मिळवून दिला होता.
 
कोण आहेत जावेद मियांदाद?
पाकिस्तानच्या सार्वकालीन महान फलंदाजांमध्ये मियांदाद यांचं नाव अग्रणी आहे. सहा विश्वचषकांमध्ये त्यांनी पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करताना धावांची टांकसाळ उघडली.
 
124 कसोटीत त्यांनी 52.57च्या सरासरीने 8832 धावा केल्या. कसोटी प्रकारात जावेद यांच्या नावावर 23 शतकं आणि 43 अर्धशतकांची नोंद आहे.
 
233 वनडेत 41.70च्या सरासरीने 7381 धावा केल्या आहेत. वनडेत मियांदाद यांच्या नावावर 8 शतकं आणि 50 अर्धशतकं आहेत.
 
कसोटी प्रकारात पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये मियांदाद दुसऱ्या क्रमांकावर आहेत. वनडेत पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत मियांदाद सहाव्या स्थानी आहेत.
 
मियांदाद यांनी पाकिस्तान संघाचं नेतृत्वही केलं. निवृत्तीनंतर मियांदाद यांनी काही वर्ष पाकिस्तान संघाचं प्रशिक्षकपदही भूषवलं.
 
पाकिस्तान क्रिकेटला त्यांच्या योगदानाची दखल घेत आयसीसीने मियांदाद यांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला. 1986मध्ये मियांदाद यांना राष्ट्राध्यक्षांतर्फे प्राईड ऑफ परफॉर्मन्स पुरस्काराने गौरवण्यात आलं.
जावेद मियांदाद यांचं दाऊद कनेक्शन
जावेद यांचा मुलगा जुनैद मियांदादचं लग्न अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या मुलीशी झालं आहे. त्यामुळे मियांदाद आणि दाऊद हे व्याही आहेत.
 
दाऊद यांनी डी गँग सुरू केली. 1993 मध्ये मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा दाऊद मास्टरमाईंड असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या स्फोटांमध्ये 257 जण ठार झाले तर 700 जण जखमी झाले होते.
 
बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर मुंबईमध्ये दंगली उसळल्या. यामध्ये अनेक मुसलमानांचा बळी गेला.
 
यामुळे व्यथित झालेल्या दाऊदने पाकिस्तानच्या ISIच्या मदतीने भारतामध्ये बॉम्ब आणि शस्त्र स्मगल करून आणली आणि 12 मार्च 1993 रोजी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले, असा दाऊदवर आरोप आहे.
 
9/11 च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ल्यांमागे दाऊदचाही हात असल्याचा आरोप अमेरिकन सरकारने केला होता. दाऊद 'स्पेशली डिसिग्नेटेड ग्लोबल टेररिस्ट' असल्याचं म्हणत अमेरिकेने दाऊदची विविध देशांतली मालमत्ता जप्त करण्याची मागणी युनायटेड नेशन्सकडे केली होती.
 
दाऊद इब्राहिमने आपलं बस्तान दुबईमधून नंतर पाकिस्तानात हलवलं आणि तिथे पाकिस्तानने त्याला आसरा दिल्याचा आरोप अनेकदा करण्यात आला आहे.
 
शारजा क्रिकेट स्टेडियममध्ये बसून सामने बघत असल्याचा दाऊदचा फोटो अनेकांच्या स्मरणात असेल.
 
शिवसेनेचा पाकिस्तान विरोध
ऑक्टोबर 1991 मध्ये शिशिर शिंदेंच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी खणली होती. पाकिस्तानने मुंबईत खेळू नये यासाठी असं करण्यात आलं. ती मालिका रद्द करण्यात आली.
1999मध्ये पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर येणार होता. पहिली कसोटी दिल्ली येथे होणार होती. ही कसोटी होऊ नये म्हणून शिवसैनिकांनी कसोटीचं केंद्र असलेल्या फिरोझशाह कोटला मैदानाची खेळपट्टी खणली.
2006 मध्ये भारतात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार होता. पाकिस्तानचे सामने ज्या ठिकाणी होणार आहेत अशा जयपूर आणि मोहाली या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असंही शिवसेनेने सांगितलं.
2010 मध्ये शाहरूख खान आयपीएल स्पर्धेत पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या सहभागासंदर्भात बोलला. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळायला मिळावं अशी शाहरुखची भूमिका होती. शिवसेनेने शाहरुखविरोधात आंदोलन केलं. शाहरुखचा 'माय नेम इज खान' चित्रपट ज्या चित्रपटगृहांमध्ये सुरू होता तिथे हल्ले करण्यात आले.
2014 मध्ये प्रो कबड्डी स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूंना सहभागी करून घेऊ नका असा इशारा शिवसेनेने दिला. महाराष्ट्रात झालेल्या सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना खेळवण्यात आलं नाही.