शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (22:42 IST)

काय आहे बीबीसी स्पोर्ट्स हॅकथॉन? BBC-Wikipedia Hackathon : इंटरनेटवर मिळणार भारतीय महिला खेळाडूंची माहिती

लोकप्रिय व्यक्तींची माहिती मिळवण्यासाठीची इंटरनेटवरील लोकप्रिय वेबसाईट असलेल्या विकीपिडियावर भारतीय महिला खेळाडूंची अधिकाधिक माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेला उपक्रम म्हणजे बीबीसी स्पोर्ट्स हॅकेथॉन.
 
यामध्ये शेकडो विद्यार्थी विकीपिडिया या लोकप्रिय एनसायक्लोपिडीया वेबसाईटवर भारतीय महिला खेळाडूंविषयी माहिती उपलब्ध करून देतील.
 
'इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इअर' या प्रोजेक्टअंतर्गत बीबीसीने हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत भारतातल्या जवळपास 50 महिला खेळाडूंची माहिती विकीपिडियावर उपलब्ध करून देण्यात येईल.
 
विकीपिडिया हा सर्वसामान्यांसाठी माहिती मिळवण्याचा सर्वांत सोपा आणि सुलभ असा पर्याय आहे. मात्र, यातही स्त्रियांपेक्षा पुरूषांना झुकत माप दिलं गेलं आहे. इंग्रजीतील विकीपिडियामध्ये उपलब्ध एकूण माहितीपैकी महिलांविषयीची माहिती केवळ 17% आहे.
 
त्यामुळेच बीबीसी काही विद्यार्थ्यांना सोबत घेत भारतीय क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या महिला खेळाडूंची माहिती विकीपिडियावर उपलब्ध करून देत आहे.
 
नामांकित क्रीडा पत्रकार, तज्ज्ञ आणि बीबीसीच्या संपादकांनी या 50 महिला खेळाडूंची निवड केली आहे.
 
या 50 पैकी बहुतांश खेळाडूंची माहिती विकीपिडियावर भारतीय भाषांमध्ये उपलब्ध नाही. इतकंच नाही तर यापैकी काही खेळाडू अशा आहेत ज्यांची इंग्रजीतही माहिती उपलब्ध नाही.
 
बीबीसी इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, तेलुगू आणि तमिळ या सहा भारतीय भाषांमध्ये सेवा पुरवते. विकीपिडियावर या 50 महिला खेळाडूंची माहिती या 7 भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश आहे.
 
महिला खेळाडूंच्या मुलाखती
बीबीसीने या 50 महिला खेळाडूंची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे का, हे तपासलं. तेव्हा असं लक्षात आलं की यापैकी काही महिला खेळाडूंची माहिती विकीपिडियावर उपलब्ध नाही आणि ज्यांची आहे तीसुद्धा फार तोकडी आहे.
 
ही त्रुटी भरून काढण्यासाठी बीबीसीने या 50 पैकी 26 महिला खेळाडूंच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांचे प्रोफाईल बीबीसीच्या न्यूज वेबसाईट्सवर प्रकाशित केले.
 
या मुलाखतीतून या महिला खेळाडूंचा संघर्ष आम्हाला कळला. यापैकी बुहतांश खेळाडूंना खेळासाठी आवश्यक पायाभूत सुविधा नव्हत्या, अनेकांची आर्थिक परिस्थिती बेताची होती, अनेकींना महिला असूनही पुरूषी खेळ खेळते म्हणून हिणवण्यात आलं. अशा अनेक अडचणी पार करत या महिला खेळाडूंनी आपापल्या खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
 
अनेक अडथळे येऊनही या खेळाडूंची खेळण्याची जिद्द कायम होती. वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि हितचिंतकांच्या मदतीवर त्यांनी इथवरचा टप्पा गाठला.
 
मुलींसाठी तातडीने प्रशिक्षण संस्था आणि मैदानं तयार करण्याची गरज असल्याचं यातल्या बहुतांश महिला खेळाडूंनी सांगितलं. तसंच खेळामध्ये कारकिर्द घडवण्यासाठी कुटुंबाकडूनही सहकार्य मिळणं अत्यंत गरजेचं असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.
 
पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांची साथ
बीबीसीने देशभरातल्या 13 संस्थांमध्ये पत्रकारिता शिकणाऱ्या 300हून अधिक विद्यार्थ्यांना सोबत घेऊन हा उपक्रम राबवला आहे.
 
उत्तरेत दिल्ली स्कूल ऑफ जर्नलिझम, दिल्ली विद्यापीठ, अजमेर येथील राजस्थान केंद्रीय विद्यापीठ, जालंधर येथील दोआबा महाविद्यालय आणि अमृतसरमधल्या गुरू नानक देव विद्यापीठांनी यात भाग घेतला.
 
पश्चिमेकडे अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठ, सूरत येथील वीर नारमद दक्षिण गुजरात विद्यापीठ, तर मुंबईतील साठ्ये महाविद्यालय, नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी सहभाग नोंदवला.
 
दक्षिणेकडे कोईंबतूर इथली अविनाशीलिंगम संस्था आणि भारतीआर विद्यापीठ, पुद्दुचेरी येथील पॉन्डिचेरी विद्यापीठ, सिकंदराबाद येथील भवन्स विवेकानंद कॉलेज ऑफ सायन्स, ह्युमॅनिटीज अँड कॉमर्स आणि विशाखापट्टणम येथील आंध्र विद्यापीठाने सहभाग घेतला.
 
विकीपिडियावर खेळाडूंची माहिती अपलोड करण्यासाठी विकीपिडियाने सहभागी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं.
 
द स्पोर्ट्स हॅकेथॉन हा बीबीसीचा उपक्रम आज (18 फेब्रुवारी) सुरू होणार आहे. बीबीसीच्या सर्व भारतीय भाषा सेवांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण (LIVE) होणार आहे.