शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (18:33 IST)

आत्महत्येचे विचार डोक्यात येणाऱ्या शेतकऱ्यानं काय करावं?

अनघा पाठक
बीबीसी मराठी प्रतिनिधी
काही दिवसांपासून ते जरा अस्वस्थ राहात होते. घरात, बोलण्या-चालण्यात, खाण्यात लक्ष नव्हतं. डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. पण कसेबसे दिवस जात होते, अशात एक दिवस मार्केटला नेलेला कापूस रिजेक्ट झाला. हातातोंडाशी आलेला घास गेला. पण घरी ते काहीच बोलले नाहीत.
 
त्या व्यक्तीने दोन दिवसांनी आपल्या मोठ्या मुलीला जवळ बसवून सगळे बँकेचे, पैशांचे व्यवहार समजावून सांगितले. दुसऱ्या दिवशी शेतात गेले, ते घरी परत आलेच नाहीत. शेतात तुरीची फवारणी चालू होती, तेच औषध पिऊन त्यांनी आपलं आयुष्य संपवलं.
 
यवतमाळ मधल्या जनार्दन उईके यांची कहाणी, त्यांच्याच मुलीने, उज्ज्वलाने, मला मागच्या वर्षी सांगितली होती.
 
वरचा प्रसंग फक्त एक उदाहरण आहे. देशात आजही दररोज शेतकरी आत्महत्या होत असतात. NCRB च्या आकडेवारी नुसार 2019 मध्ये देशात जवळपास 43 हजार शेतकरी तसंच शेतमजूरांनी आत्महत्या केल्या.
 
पण आज आपण आत्महत्यांविषयी बोलणार नाही आहोत. अनेकदा चर्चा या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर काय उपाययोजना असाव्या, त्यांच्या कुटुंबाला किती भरपाई मिळावी, एकंदर शेतकरी आत्महत्यांचा आकडा काय आहे याभोवती फिरत असते. या लेखाचा उद्देश मात्र शेतकऱ्याच्या आत्महत्या होण्याआधीच ती थांबवण्यासाठी काय करता येईल हा आहे.
 
डॉ प्रशांत चक्करवार मानसोपचारतज्ज्ञ आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी एक प्रोग्रॅम तयार केला जो नंतर सरकारने स्वीकारून तशाच प्रकारे काम सुरू केलं. ते म्हणतात, "आत्महत्या थांबवण्याआठी अशा लोकांना ओळखणं हेच सगळ्यात मोठं आव्हान आहे. यासाठी सायको-सोशल अप्रोच आम्ही अवलंबला."
 
शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार का येतात?
उमेश (बदललेलं नाव) मराठवाड्यात राहातात. फक्त 31 वर्षांच्या उमेशच्या मनात एकदा आत्महत्येचे विचार येऊन गेले आहेत. सगळे डिटेल्स सांगायला ते कचरतात. मुळात मानसिक आरोग्य या विषयावर ग्रामीण भागात कोणी बोलत नाही, पण आत्महत्येचे विचार का मनात आले असं विचारल्यावर म्हणतात, "आधी पाऊस वेळेत आला नाही, आणि मग नंतर जे थोडंबहुत पिक आलं ते अवकाळीने नेलं. कर्ज, दुष्काळी आणि अवकाळी या चक्राला कंटाळून आत्महत्या करण्याचा विचार मनात आला खरा, पण तेवढ्यापुरता. मी नंतर झटकून टाकला. आता तसे विचार अजिबात येत नाहीत. हा शेती आतबट्ट्याचा व्यवसाय आहे असं आजही वाटतं पण त्यावरून आयुष्य संपवावं असे टोकाचे विचार येत नाहीत."
 
हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा की उमेशला आपल्या मनातले आत्महत्येचे विचार झटकून टाकता आले. याचा अर्थ ते रूढार्थाने मानसिकरित्या कणखऱ होते असं नाही, तर त्यांच्या मानसिक आजाराची तीव्रता कमी होती.
 
चक्करवार यांच्या मते एखादा शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा तो फक्त परिस्थितीनी गांजला होता इतकं साध विश्लेषण करून चालणार नाही. "हे पाहा," ते समजावून सांगतात. "शेतकऱ्याला आत्महत्या करावीशी वाटते यामागे नक्कीच सामाजिक आणि आर्थिक कारणं असतात. पण ही कारणं आत्महत्येला प्रवृत्त करत नाहीत, तर या कारणांमुळे जे मानसिक आजार जडतात त्यांचं पर्यवसन आत्महत्येमध्ये होतं. म्हणजे आर्थिक, सामाजिक कारणं ही 'अ' परिस्थिती असेल तर तिचं पर्यवसन 'ब' म्हणजेच मानसिक आजारांमध्ये होतं, ज्याचा शेवट आत्महत्येत होतो."
 
तीव्र डिप्रेशन, बायपोलर डिसऑर्डर (कधी खूप आनंदी मूड तर कधी एकदम नैराश्य) आणि क्वचित स्किझोफ्रेनिया अशा स्वरूपाचे मानसिक आजार आत्महत्या करणाऱ्या किंवा आत्महत्येचे विचार मनात येणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये असतात असंही डॉ चक्करवार सांगतात.
 
2015 साली चक्करवार यांनी आत्महत्या करण्याची शक्यता असणारे शेतकरी ओळखण्यासाठी एक कार्यक्रम सुरू केला होता. यात एक प्रश्नावली शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबाकडून भरून घेतली जायची. त्यात साधे-सोपे प्रश्न असले तरी त्या प्रश्नांच्या उत्तरांवरून शेतकऱ्याची मानसिक अवस्था समजू शकण्यासाठी मदत व्हायची. एकदा मानसिक विकारांनी ग्रस्त शेतकरी कोण हे लक्षात आलं की त्यांच्यावर लक्ष ठेवणं, त्यांची मदत करणं आणि वेळेवर औषध-उपचार करणं शक्य व्हायचं.
या कार्यक्रमानंतर आपल्या यवतमाळ कार्यक्षेत्रातल्या आत्महत्या 50 टक्क्यांनी कमी झाल्याचा दावाही ते करतात.
 
शेतकऱ्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत कसं ओळखायचं?
योगिनी डोळके एका दशकाहून अधिक काळ ग्रामीण भागातलं मानसिक आरोग्य या विषयावर काम करत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात त्यांची संस्था आदिवासी लोकांसाठी मुख्यत्वकरून काम करते. त्यांच्या अनेक कार्यकर्त्या गावात घरोघरी जाऊन लोकांचा मानसिक आरोग्याची नोंद ठेवत असतात.
 
एखाद्या शेतकऱ्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील हे कसं ओळखायचं याचे काही मुद्दे त्या सांगतात.
 
अचानक ती व्यक्ती गप्प गप्प राहायला लागते. तिचा लोकांशी संवाद कमी होतो. अशा व्यक्तीला आजूबाजूला काय चालू आहे याचं भान नसतं. त्यांच्याशी कोणी बोलत असले तरी त्यांच्या कानावर शब्द आदळतात पण मेंदूला आशयाचं भान नसतं. ती व्यक्ती स्वतःच्याच कोषात गुरफटलेली राहाते.

अशा व्यक्तींची चिडचिड आणि आक्रमकता वाढते.

आयुष्यात काहीच उरलं नाहीये अशी भावना ते आपल्या जवळच्यांकडे वारंवार बोलून दाखवतात.

अधे-मधे दारू पिणारी व्यक्ती असेल तरी त्या व्यक्तीचं दारू सेवन वाढतं.

रोजच्या कामात, जेवणाखाण्यात लक्ष नसतं, त्या व्यक्तीला कुठल्याच गोष्टीने आनंद होतं नाही.

याबरोबरच एक महत्त्वाचा मुद्दा डॉ चक्करवार मांडतात, तो म्हणजे अशा व्यक्तींच्या रूटीनमध्ये फरक पडतो. आत्महत्या करायची असेल तर तशा साधनांच्या शोधात ते असतात. उदाहरणार्थ फवारणीची वेळ नसेल तरीही ते कीटकनाशक घरात आणून ठेवतात. घरात उडवाउडवीची उत्तरं देतात.

घरच्यांना किंवा आसपासच्यांना यावरून अंदाज येऊ शकतो की अशा व्यक्तींच्या मनात काय चालू आहे. पण याही आधी एखाद्या शेतकऱ्याला स्वतःलाच जाणून घ्यायचं आहे की आपल्याला नैराश्याने ग्रासलं आहे तर त्याने काय करावं?
 
डॉ चक्करवार आपल्या सर्व्हेत वापरल्या जाणाऱ्या PHQ-9 या प्रश्नावलीचं उदाहरण देतात. जगभरात ही प्रश्नावली नैराश्याने ग्रस्त किंवा आत्महत्येचे विचार डोक्यात येणाऱ्या लोकांना ओळखण्यासाठी वापरली जाते. हीच प्रश्नावली त्यांच्या कार्यक्रमांतर्गत शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाकडून भरून घेतली जाते. यात साधे-सोपे प्रश्न असतात. हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारू शकता. उदाहरणार्थ -
 
तुम्ही गरजेपेक्षा कमी किंवा जास्त झोपताय का?

तुमचं मन कशात लागत नाही, सतत उदास वाटतं का?

गरजेपेक्षा अत्यंत कमी किंवा जास्त जेवताय का?

साध्या साध्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं अवघड होतंय का? म्हणजे पेपर वाचताना किंवा अगदी टीव्ही पाहाताना काय चाललंय कळत नाहीये का?

घरच्यांना निराश केलंय, आपण कुठल्याही लायकीचे नाही असं वाटतंय का?

नेहमीपेक्षा संथ गतीने बोलताय किंवा जास्त ओरडून बोलताय का?

आपलं आयुष्य संपलं तर किती बरं असे विचार मनात येतात का?

यातल्या दोन-तीन प्रश्नांची उत्तरं जर होकारार्थी आली तर तुम्हाला मदतीची गरज आहे.
 
पण मदत मिळणार कुठे?
मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायला जी आरोग्य यंत्रणा लागते तिचा ग्रामीण भागात पूर्णपणे अभाव आहे, योगिनी डोळके विषादाने सांगतात.
 
पण असं असतानाही आहे त्या परिस्थितीत कुठून मदत मिळू शकते हे पाहाणं महत्त्वाचं आहे.
 
"तेलंगणा सरकारने आत्महत्येचे विचार मनात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन सुरू केली होती आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अशी हेल्पलाईन आपल्याकडे जिल्हा पातळीवर असावी असे प्रयत्न आम्ही अनेक दिवसांपासून करत आहोत," योगिनी म्हणतात.
 
ग्रामीण भागात तालुका किंवा गावपातळीवर मानसोपचार तज्ज्ञ नाहीत ही वस्तुस्थिती आहे. पण अशा परिस्थिती तुम्ही जिल्हा रूग्णालयात संपर्क करू शकता. अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला तर नक्कीच मदत मिळू शकते.
 
शेतकऱ्यांची मदत करणाऱ्या काही हेल्पलाईन आहेत, त्यातली एक हेल्पलाईन म्हणजे किसान मित्र. यावर आपल्या अनेक समस्यांविषयी बोलण्यासाठी फोन करता येऊ शकतो.
 
पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे विचार डोक्यात येत असतील तर आपल्या घरच्यांशी जरूर बोलयला हवं.
 
आपण ज्या परिस्थितीत आहोत, तिथून बाहेर पडण्याचा काही मार्ग नाही, आपण पूर्ण अडकलो आहोत आणि आपल्या समस्या आता आपल्या मृत्यूनेच संपतील अशी मानसिक स्थिती आत्महत्येला प्रवृत्त करते. "अशावेळेस सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या व्यक्तीला हा धीर देणं की तू एकटा नाहीस, आम्ही सोबत आहोत आणि आपण मिळून रस्ता काढू. घरची माणसं नक्कीच हा धीर देऊ शकतात, त्यासाठी त्यांच्याशी बोलायला हवं," चक्करवार सांगतात.