बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 7 जुलै 2021 (14:54 IST)

दिलीप कुमारांनी जेव्हा अशोक सराफांचं नाटक पाहून त्यांच्या टायमिंगला दाद दिली होती

- हर्षल आकुडे
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज (बुधवार, 7 जुलै) मुंबई येथे निधन झालं. दिलीप कुमार यांनी आपल्या सहज-सोप्या अभिनय कौशल्याने भारतीय चित्रपटसृष्टीला एक वेगळी ओळख मिळवून दिली होती.
 
दिलीप कुमार यांना हिंदी चित्रपटतल्या योगदानाबद्दल ओळखलं जातं. पण त्याचसोबत त्यांचं एक मराठी कनेक्शनसुद्धा आहे. दिलीप कुमार यांचं बालपण मराठी वातावरणात गेल्यामुळे त्यांना मराठी चांगलं बोलता यायचं. ते आपल्या भाषणांची सुरुवात कधी-कधी मराठीतूनही करायचे. हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, राजकीय नेते, मराठी पत्रकार यांच्याशी दिलीप कुमार यांचे सौहार्दाचे संबंध होते.
 
मराठीतून भाषणाला सुरुवात
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना त्यांच्या अभिनयासोबतच वक्तृत्वकलेसाठीही ओळखलं जातं. आपल्या सुमधूर भाषणांनी ते समोरच्या प्रेक्षकांना खिळवून ठेवत असत. ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर यांनी दिलीप कुमार यांच्या भाषणांविषयीचे किस्से बीबीसी मराठीला सांगितले.
 
दिलीप ठाकूर सांगतात, "ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची वक्तृत्वशैली अतिशय ओघवती आणि सुमधूर अशी होती. ते आपल्या भाषणांदरम्यान समोरच्यांच्या अशी भावनिक साद घालायचे की ते ऐकताना अंगावर शहारे यायचे. दिलीप कुमार यांची उर्दू भाषेवर मजबूत पकड होती. ते दर्जेदार हिंदीही बोलायचे. पण मराठी प्रेक्षक समोर असतील त्यावेळी ते आपल्या भाषाची सुरुवात मराठीतून करण्याचा प्रयत्न करायचे."
 
'माझी मराठी इतकी चांगली नाही, पण तरी बोलायचा प्रयत्न करतो,' असं म्हणत ते आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हणत. मग काही वाक्य बोलून पुढे हिंदीतून भाषणं करायचे, असं ठाकूर यांनी सांगितलं.
 
अशोक सराफ यांच्या टायमिंगवर शाबासकीची थाप
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या अभिनयातील 'टायमिंग'साठी ओळखलं जातं. पण अशोक सराफ यांच्यातील अभिनयातील टायमिंग सर्वप्रथम कुणी हेरलं असेल तर ते दिलीप कुमार यांनीच.
 
एका नाटकाच्या वेळी दिलीप कुमार यांनी अशोक सराफ यांच्या अभिनयाचं कौतुक करताना पाठीवर शाबासकीची थापही मारली होती.
 
त्या प्रसंगाची आठवण सांगताना अशोक सराफ म्हणतात, "मी दिलीप कुमार यांच्यासोबत कधीच काम केलं नाही. अभिनय क्षेत्रात असूनसुद्धा फारच कमी वेळा आमच्या भेटी-गाठींचा प्रसंग आला. पण त्यांच्याशी झालेली पहिली भेट माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहे."
 
सराफ म्हणतात, "मी त्यावेळी अभिनय क्षेत्रात तसा नवखाच होतो. 'संशयकल्लोळ' नाटकात भादव्याची भूमिका करायचो. आमच्या नाटकाच्या प्रयोगासाठी शिवाजी मंदिर नाट्यगृहात एकदा दिलीप कुमार यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं."
 
"दिलीप कुमार त्यावेळी त्यांच्या कारकिर्दीत सर्वोच्च शिखरावर होते. इतका ज्येष्ठ अभिनेता नाटक पाहायला येणार म्हणून आमच्या मनात काहीशी धाकधूक होती. पण ते आले. अतिशय संयमीपणे त्यांनी संपूर्ण नाटक पाहिलं. संशयकल्लोळ हे एक संगीत-नाटक आहे. कधी-कधी काही मराठी प्रेक्षकही हे नाटक पाहताना कंटाळतात. परंतु दिलीप कुमार नाटक पाहताना जागचे हलले नाहीत. यावरूनच त्यांचं कलेविषयीचं प्रेम दिसून येतं. त्यांना कलेची योग्य जाण होती," असं सराफ म्हणतात.
 
दिलीप कुमार यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत सराफ पुढे सांगतात, "नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर आम्हाला सर्वांना दिलीप कुमार यांची भेट घेण्याची संधी मिळाली.
 
त्यावेळी मला पाहून दिलीप कुमार माझ्याजवळ आले. ते म्हणाले, 'क्या गजबकी 'टायमिंग' है आपकी!' इतकंच नव्हे तर त्यांनी माझ्या पाठीवर शाबासकीही दिली. मी त्यांचे आभार मानले. त्यावेळी दिलीप कुमार यांच्यासोबत झालेला माझा इतकाच तो संवाद. पण तो प्रसंग कायमचा माझ्या आठवणीत राहिला आहे."
 
"संशयकल्लोळ नाटकात मी करत असलेल्या भादव्याची भूमिका तशी थोडीफार दुय्यम होती. त्यात टायमिंगला इतका वाव नाही, असं मला त्यावेळी वाटत होतं. पण दिलीप कुमार यांनी त्या भूमिकेतील टायमिंग अगदी चपखलपणे हेरलं. अशा प्रकारची प्रतिक्रिया मला त्याआधी कुणीच दिलेली नव्हती. त्यामुळेच मी खूप भारावून गेलो होतो.
 
दिलीप कुमार यांनी माझ्यातील टायमिंगचं कौतुक केल्यानंतर मला हुरूप आला. पुढे टायमिंगवरच जास्त मेहनत करून ती आणखी जास्त सहज-सोपी बनवली. पण दिलीप कुमार यांच्यासोबत कामाची संधी मिळाली नाही, म्हणून खंतही वाटते," असं सराफ यांनी सांगितलं.
 
दिलीप कुमार यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं आहे. दिलीप कुमार यांनी अभिनय क्षेत्रात यश मिळवलं. सहज-सोप्या अभिनयातून त्यांनी आपली आगळीवेगळी अशी स्टाईल यशस्वी करून दाखवली. त्यांचं भारतीय चित्रपटसृष्टीला असलेलं योगदान आपण कधीच विसरू शकणार नाही, अशा शब्दात अशोक सराफ यांनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
 
चांगल्या कामाचं भरभरून कौतुक
अशोक सराफ यांनी सांगितल्याप्रमाणे दिलीप कुमार त्यांना आवडलेल्या कोणत्याही कामाचं भरभरून कौतुक करायचे.
 
दिलीप ठाकूर त्याबद्दल सांगतात, "अशोक सराफ यांच्याप्रमाणेच त्यांनी अभिनेत्री जयश्री गडकर यांचंही भरभरून कौतुक केलं होतं. या प्रसंगाचा उल्लेख जयश्री गडकर यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे.
 
त्यावेळी जयश्री गडकर यांचा 'एक गाव बारा भानगडी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दिलीप कुमार यांनी पुण्यात तो चित्रपट पाहिला. पुढे त्यांची गडकर यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी या चित्रपटाबाबत आवर्जून गप्पा मारल्या. त्यांनी जयश्री गडकर यांच्या अभिनयाचं अतिशय भरभरून कौतुक केलं. ही गोष्ट गडकर यांच्या मनावर इतकी ठसली की त्यांनी त्याचा उल्लेख आपल्या आत्मचरित्रात केला."
 
सचिन पिळगावर दिग्दर्शित 'अशी ही बनवाबनवी' चित्रपट आजही आपल्या सर्वांच्या आवडीच्या चित्रपटांपैकी एक आहे. दिलीप ठाकूर यांनी त्याच्याशी संबंधित आणखी एक किस्सा सांगितला.
 
'अशी ही बनवाबनवी' प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवलं. या चित्रपटाची गोल्डन ज्युबिली (50 आठवडे पूर्ण) झाल्यानंतर एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी दिलीप कुमार त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. त्यांनी सर्व कलाकारांची भेट घेऊन त्यांचं तोंडभरून कौतुक केलं. सर्वांसोबत त्यांनी फोटो काढले.
 
त्याशिवाय व्ही. शांताराम, निळू फुले, जब्बार पटेल, सुलोचना यांच्यासारख्या इतर अनेक मराठी कलाकारांसोबत दिलीप कुमार यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. इतके मोठे अभिनेते असूनही त्यांनी कधीच त्याचा गर्व दाखवला नाही, असं ठाकूर म्हणतात.
 
बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत बिअर पार्टी
बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे बॉलीवूडशी असलेलं कनेक्शन आपल्या सर्वांना माहितच आहे. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि दिलीप कुमार हेसुद्धा वारंवार एकमेकांना भेटत असत.
 
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत यांनी याविषयी अधिक माहिती बीबीसी मराठीला दिली.
 
सावंत सांगतात, "बाळासाहेब ठाकरे आणि दिलीप कुमार यांचे अतिशय सलोख्याचे संबंध होते. दोघेही बिअर पिण्याच्या निमित्ताने एकमेकांची भेट घ्यायचे आणि विविध विषयांवर गप्पा मारायचे. पण दिलीप कुमार यांनी नंतर पाकिस्तान सरकारकडून दिला जाणारा 'निशान ए पाकिस्तान' पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांचे संबंध काहीसे दुरावले होते.
 
त्या पुरस्काराच्या नावात पाकिस्तान असा उल्लेख असल्याने दिलीप कुमार यांनी तो स्वीकारू नये, असं बाळासाहेबांचं म्हणणं होतं."
 
"पण संबंध दुरावले असले तरी ते कधीच तुटले नाहीत. पुढे विविध विषयांवर मदत घेण्यासाठी दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो अनेकवेळा 'मातोश्री'वर गेल्या होत्या. त्यांच्या बांद्र्यातील घराचा एक वाद निर्माण झाला होता. त्यावेळी बाळासाहेबांकडूनच आपल्याला न्याय मिळेल अशी सायरा बानो यांची भावना होती. बाळासाहेबांनीही त्यांना शक्य ती मदत केली," असं सावंत म्हणतात.
 
दिलीप कुमार यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. एक महान कलाकार आता आपल्यातून गेला आहे, अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली.