मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (19:02 IST)

गजानन मारणे कोण आहे, ज्याच्यासाठी समर्थकांनी केले शक्तिप्रदर्शन

राहुल गायकवाड
बीबीसी मराठीसाठी
खुनाच्या गुन्ह्यातून मुक्तता झाल्यानंतर नवी मुंबई येथील तळोजा कारागृहातून गजानन मारणेची त्याच्या समर्थकांकडून मिरवणूक काढण्यात आली. साधारण तीनशेच्या आसपास चारचाकींचा ताफा मारणे याच्यासोबत पुण्यात आला. याचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
 
कोरोनाचे सर्व नियम धुडकावून लावून दिल्याचे समोर आले. याप्रकरणी आता मारणे आणि त्याच्या साथीदारांवर दहशत पसरविल्याचा गुन्हा तळेगाव दाभाडे पाोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
पप्पू गावडे याच्या खून प्रकरणात गजानन मारणे आणि त्याच्या अन्य साथीदारांवर पौड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सबळ पुराव्यांअभावी पुण्यातील विशेष माोक्का न्यायालयाने 12 फेब्रुवारीच्या सुनावणीत मारणे आणि त्याच्या साथीदारांची मुक्तता केली. 2014 साली मारणे आणि त्याच्या साथीदारांना अटक झाली होती.
3 नोव्हेंबर 2014 रोजी लवाळे गावाच्या हद्दीतील गावडे वस्तीजवळ पूर्वीच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी पप्पू उर्फ संतोष हिरामण गावडे याचा खून झाला होता. गजानन मारणे आणि निलेश घायवळ यांच्या टोळ्यांमध्ये पूर्वीपासून कोथरुड व मुळशी तालुक्यातील जमिनीचे खरेदी विक्रीचे जुने वाद आहेत. या वादातून त्यांनी एकमेकांवर खुनी हल्ले केले आहेत.
 
याआधी देखील 2008 साली नीलेश घायवळ आणि संतोष गावडे यांच्यावर गजानन मारणे, पप्पू कुडले व त्यांच्या साथीदारांनी फायरिंग करुन व कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. पप्पू गावडे याने दिलेल्या फिर्यादीवर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात साक्ष दिल्यास संपवून टाकण्याची धमकी पप्पू गावडे याला दिली होती. त्यातूनच पप्पू गावडेचा खून करण्यात आला होता.
 
2 फेब्रुवारीला देखील पुण्यातील मोक्का न्यायालयाने अमोल बधेच्या खून प्रकरणातून गजानन मारणे आणि त्याच्या 20 साथीदारांची पुराव्या अभावी मुक्तता केली. याप्रकरणी संतोष कांबळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. कांबळे आणि खून झालेला बधे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
 
दोघेही नीलेश घायावळ टोळीचे सदस्य आहेत. 29 नोव्हेंबर 2014 रोजी नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमी रस्त्यावरील कलावती मंदिराजवळ टोळीयुद्धातून बधेचा खून झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी 11 लोखंडी कोयते, 3 गावठी पिस्तुले, 10 मोबाईल हॅंडसेट, 2 जिवंत काडतसे असा मुद्देमाल जप्त केला हाेता.
 
कसं सुरू झालं टोळीयुद्ध ?
गेल्या काही वर्षांमध्ये पुणे शहर आणि आसपासच्या जमीनींना भाव आला. मुंबईचे अनेक बांधकाम व्यावसायिक पुण्याकडे वळू लागले. त्यातून जमीन - खरेदीच्या व्यवहारातून टोळ्या तयार होऊ लागल्या.
जमीन मालक आणि बांधकाम व्यवसायिक यांच्यातील मिडल मॅन म्हणून या टोळ्या काम करू लागल्या. त्यासाठी त्यांनी टक्केवारी ठरवली होती. या व्यवहारांमधील वर्चस्वातूनच पुढे निलेश घायवळ आणि मारणे यांची टोळी निर्माण झाली. या दोन टोळ्यांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यातून अनेक संघर्ष झाले. त्यातूनच खुनाची अनेक प्रकरणं समोर आली.
 
पप्पू गावडे आणि अमोल बधेच्या खूनाच्या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी गजानन मारणे आणि त्याच्या साथिदारांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली. परंतु त्यांच्याविरोधात सबळ पुरावे आणि साक्षीदार उभे करु न शकल्याने न्यायालयाने मारणे आणि त्याच्या साथीदारांची मुक्तता केली.
 
हा सभ्य समाजाचा पराभव आहे का?
या मिरवणुकीवरुन तरुण मुलांचे खरे हिरो कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. असे सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी म्हणतात, "काही करा पण यशस्वी राहा अशी मानसिकता सध्या दिसतीये. डॉक्टर म्हणून तुम्ही यशस्वी होताय की गुंड म्हणून यात समाज आता फरक करायला तयार नाही. ही पहिली मिरवणूक नाही. छगन भुजबळ सुटले होते तेव्हा देखील मिरवणुक काढण्यात आली होती.
"नैतिकता आता तरुण मुलं समाजातून हद्दपार करतायेत असं दिसतंय. यापुढच्या काळात समाजाचे हिरो कोण राहणार असा आता प्रश्न आहे. हा गुंडांचा जसा विजय आहे तसा सभ्य समाजाचा पराभव आहे. उद्या साहित्य संम्मेलनाच्या अध्यक्षांची मिरवणूक काढली तर इतके तरुण येतील का? सध्या चांगल्या कार्यक्रमासाठी लोक गोळा करावे लागतात. समाजाचं आरोग्य किती बिघडलंय याचं हे उदाहरण आहे," असं देखील चौधरी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.
 
समाजमाध्यमांमध्ये गुन्हेगारीचं उदात्तीकरण
कम्युनिस्ट नेत्या किरण मोघे म्हणतात, "समाजमाध्यमांमध्ये गुन्हेगारी करणाचं उदात्तीकरण केलं जातंय. निर्दोष मुक्तता इनकोट सुद्धा आहे, हे लक्षात घ्यायला हवं. खरे निर्दोष मात्र मुक्त होत नाहीत. अशी मिरवणूक निघणे ही चिंतेची गोष्ट आहे. कुठल्या दिशेने आपण चाललोय असा प्रश्न पडतो. तरुण वर्ग देखील अशा गोष्टींना बळी पडतोय असं दिसतंय.