रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 29 ऑगस्ट 2019 (10:58 IST)

सोनं का महागलं? गेल्या 2 महिन्यात 4000 रुपयांनी वाढले दर

अमृता दुर्वे
मंदीसदृश्य परिस्थितीच्या दिशेने जाणाऱ्या अर्थव्यवस्थेसोबतच सध्या चर्चेत आहेत सोन्याचे भाव. कारण सोन्याच्या दरांनी 40 हजारांची सर्वोच्च पातळी गेल्या काही दिवसांत गाठली.
 
जागतिक अर्थव्यवस्थेतली अनिश्चितता, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण या सगळ्याचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर पाहायला मिळतोय. आणि सोनं महागल्याने साहजिकच त्याचा परिणाम खरेदीवर झाला आहे.
 
सोन्याच्या किंमती गेल्या वर्षभरात 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. 26 ऑगस्टला 10 ग्रॅम सोन्याची किंमत रु.40,220 च्या उच्चांकावर होती. बरोबर वर्षभरापूर्वी 26 ऑगस्ट 2018ला सोन्याचा दर होता रु. 30,230 प्रति 10 ग्रॅम.
 
गेल्या दोन महिन्यांतच 10 ग्रॅम सोन्याचे दर 4000 रुपयांनी वाढले आहेत.
 
सोनं का महागलं?
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेल्या वेगवेगळ्या गोष्टींचा परिणाम सोन्याच्या दरावर होतो.
 
कर
यावेळच्या बजेटमध्ये मोदीसरकारने सोन्यावरच्या करांमध्ये वाढ केली. आयात कर 10% वरून वाढवून 12.5% करण्यात आला.
 
सोन्याच्या अलंकारानुसार सोनार त्यावर 4 ते 20% दरम्यान घडणावळ (Making Charges) आकारतात.
 
यासोबतच सोनं खरेदीवर 3% GST आकारला जातो. हा जीएसटी सोन्याचं मूल्य आणि मेकिंग चार्जेस मिळून आकारला जातो.
 
यामुळे सोनं महागल्याने त्यावर आकारली जाणारी घडणावळ आणि जीएसटी यामध्येही वाढ झाली.
 
डॉलर- रुपया आणि सोनं
डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य आणि सोन्याचे दर याचंही जवळचं नातं आहे. भारतामधलं बहुतेक सोनं हे आयात केलं जातं. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 23 ऑगस्टला 72 रुपयांची पातळी गाठली होती.
 
त्यामुळेच जर डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य घसरलं तर आयात होणाऱ्या सोन्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात.
 
व्याजदर आणि सोनं
बँकांचे व्याजदर आणि सोन्याचे दर हे देखील एकमेकांशी निगडीत आहेत. कारण बँकांचे व्याजदर जास्त असतील, तर तिथे गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल असतो.
 
कारण सोन्यातल्या गुंतवणुकीवर व्याज मिळत नाही. पण बँकांचे व्याजदर कमी झाले वा गुंतवणुकीच्या इतर पर्यायांमधला परतावा कमी झाला, सुरक्षितता कमी झाली तर लोक पुन्हा खात्रीशीर, सुरक्षित गुंतवणूक असलेल्या सोन्याकडे वळतात. मागणी वाढते आणि सोन्याच्या किंमती वाढतात.
 
आंतरराष्ट्रीय घडामोडी
जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने जातेय. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असणाऱ्या ट्रेड वॉरचा फटका आता या दोन देशांसोबतच इतर देशांनाही बसायला लागला आहे. या ट्रेड वॉरवर नजीकच्या काळात तोडगा निघण्याची चिन्हं दिसत नाहीत. अनेक देश आपली गोल्ड रिझर्व्हज (सोन्यातली गुंतवणूक) वाढवत असल्यानेही सोन्याचे दर वाढलेले आहेत.
 
देशांच्या मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करत आहेत. 2019च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी मिळून 374.1 टन सोनं खरेदी केल्याचं वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने म्हटलंय.
 
युके, जर्मनी, रशिया, सिंगापूर आणि ब्राझीलसह जगभरातल्या 9 मोठ्या अर्थव्यवस्था मंदीच्या उंबरठ्यावर आहेत.
 
जगभरातल्या शेअरबाजारांमध्ये घसरण झाल्यानेही गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत.
 
देशाच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती
मंदीच्या दिशेने जाणाऱ्या भारतीय अर्थव्यस्थेचा परिणामही सोन्याच्या दरांवर होतोय.
 
क्रिसिलने अर्थव्यवस्थेच्या प्रगतीच्या दराचं उद्दिष्टं कमी करत 6.9% वर आणलंय. तर भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर 2019मध्ये 7% आणि 2020 मध्ये 7.2% असेल असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)ने म्हटलंय.
 
खरेदीवर परिणाम
सोन्याच्या दरांनी उसळी घेतल्याने त्याचा थेट परिणाम खरेदीवर झालाय. बाजारातली जवळपास 60% मागणी कमी झाल्याचं इंडियन बुलियन ऍण्ड ज्वेलर्स असोसिएशचे सचिव सुरेंद्र मेहता यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
 
ते म्हणतात, "खरेदीचं प्रमाण 60%नी घसरलं आहे. उलट वाढलेल्या भावांचा फायदा घेण्यासाठी घरातलं सोनं आणून विकणाऱ्यांची संख्या वाढलीय. नेहमीपेक्षा 70 ते 80 % जास्त लोक सोनं विकण्यासाठी आमच्याकडे येत आहेत."
 
दिवाळीपर्यंत सोन्याचे दर 42,000 रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता असल्याचं सुरेंद्र मेहतांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
पण सणासुदीच्या आणि लग्नाच्या खरेदीचं काय? मेहता म्हणतात, "भारतीय लग्नांमध्ये सोनं खरेदी करावीच लागते. म्हणून तशी खरेदी होईल पण त्यात 10% पर्यंत घट होईल. मोठा परिणाम सणांसाठीच्या सोनं खरेदीवर होईल कारण ही हौसेसाठीची खरेदी असते. गरजेची नसते. म्हणूनच ही खरेदी 30 ते 35%नी कमी होईल."
 
सामान्य गुंतवणूकदारांनी काय करायचं?
फायनान्शियल प्लानर अर्चना भिंगार्डे सांगतात, "गुंतवणूकदारांनी आपल्या एकूण गुंतवणुकीच्या म्हणजेच पोर्टफोलियोच्या 5 ते 10% गुंतवणूक सोन्यात करावी. गुंतवणुकीच्या कोणत्याच एका विशिष्ट पर्यायामध्ये भरमसाठ गुंतवणूक करू नये. म्हणजे त्या क्षेत्रात अस्थिरता आली वा दर कमी-जास्त झाले तर त्याचा फटका बसत नाही. सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर दागिने खरेदी करण्यापेक्षा बुलियन्सना प्राधान्य द्यावं, कारण त्यामध्ये भावनिक गुंतवणूक होत नसल्याने विकायच्या वेळी अडचण येत नाही."
 
"गोल्ड ईटीएफ (Gold ETF) हा देखील सोन्यातल्या गुंतवणुकीसाठीचा चांगला पर्याय आहे. प्रत्यक्ष सोनं घेण्यापेक्षा हा पर्याय जास्त सुरक्षित आहे, कारण यामध्ये प्रत्यक्ष सोनं हाताळावं लागत नाही. यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करावी आणि दरामध्ये सतत होणाऱ्या बदलांमुळे घाबरून जाऊ नये," असं त्या पुढे सांगतात.