राज ठाकरे अमित ठाकरे यांना सक्रीय राजकारणात लाँच आता करणार का?

amit thackare
Last Updated: बुधवार, 15 जानेवारी 2020 (16:29 IST)
मयुरेश कोण्णूर
23 जानेवारीला पक्षाच्या पहिल्या महाअधिवेशनात राज ठाकरेंची 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' कोणती नवी राजकीय भूमिका घेणार याविषयी महाराष्ट्रात चर्चा आहे. 
 
राज ठाकरे त्यांच्या पक्षाचा झेंडा बदलणार का, ते आक्रमक हिंदुत्वाचा रस्ता धरणार का, ते भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेणार का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या प्रश्नांची नेमकी उत्तरं दिली जात नाहीयेत.
 
राज ठाकरे काही 'महत्त्वाचे' निर्णय घेणार असल्याचं मात्र मनसेचे नेते वारंवार सांगताहेत. या 'महत्त्वाच्या' निर्णयांपैकी एक म्हणजे राज यांचे पुत्र अमित ठाकरे यांना सक्रिय राजकारणात आणलं जाईल, त्यांना पक्षामध्ये महत्त्वाची जबाबदारी देऊन राज्यपातळीवर अधिकृतरीत्या लाँच केलं जाईल, असं मनसेच्या गोटातून समजतं आहे.
 
एका बाजूला शिवसेनेकडून निसटत चाललेला आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा आपल्याकडे ओढायचा मनसेचा मनसुबा असावा का? त्यातल्या त्यात आदित्य ठाकरेंमार्फत तरुण मतदारांना आकर्षित करण्याच्या शिवसेनेच्या मनसुब्यांना अमित ठाकरेंच्या रूपानं मनसे आव्हान देण्याचा प्रयत्न करेल का?
amit thackare
एवढंच नव्हे तर, एकीकडे उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे मंत्री झाले असताना दुसरीकडे अमित यांच्याकडे अल्पावधीतच 'मनसे'चे नेते म्हणून जबाबदारी दिली जाणं, हा केवळ राजकीय योगायोग म्हणावा की ठाकरेंच्या नव्या पीढीचं राजकीय द्वंद्व आता महाराष्ट्राच्या पटलावर पाहायला मिळणार, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.
 
"महाराष्ट्रातल्या तमाम मनसैनिकांची आणि चाहत्यांची इच्छा आहे की अमित ठाकरेंना पक्षामध्ये महत्त्वाची भूमिका द्यावी. पण त्याबद्दल अंतिम निर्णय राजसाहेबच घेतील आणि तेच जाहीर करतील," असं 'मनसे'चे नेते संदीप देशपांडेंनी 'बीबीसी मराठी'शी बोलताना म्हटलं होतं.
 
"अमित पक्षात सक्रिय आहेत आणि लोकप्रियही आहेत. महत्त्वाच्या बैठकांनाही ते असतात. त्यांच्यावर जबाबदारी देणं पक्षासाठी योग्य ठरेल कारण प्रत्येक ठिकाणी राज ठाकरे पोहोचू शकत नाहीत," असं देशपांडेंनी म्हटलं.
 
वर्षभरापूर्वी जानेवारी 2019 मध्ये त्यांचा विवाह झाला तेव्हा राज्याच्या आणि राष्ट्रीय राजकारणातले अनेक दिग्गज आवर्जून उपस्थित होते. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतल्या अनेक मोठ्या कलाकारांचीही उपस्थिती होती. पाहा कोणकोण आलं होतं ते - फोटो
raj thackare family amit
अमित ठाकरे यांच्याकडे पक्षात कोणतंही पद अद्याप नसलं तरीही गेल्या पाच वर्षांपासून ते पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय आहेत. गेल्या काही काळात पक्षातला त्यांचा वावर वाढलाय, पक्षाच्या बैठकांनाही त्यांची हजेरी असते, मनसेच्या आंदोलनांमध्येही ते वेळोवेळी दिसताहेत.
 
उद्धव ठाकरेंच्या शपथविधी दिवशी (26 नोव्हेंबर) अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेनं नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाच्या थकित रकमेसंदर्भात थाळीनाद आंदोलन केलं होतं. त्याआधी जुलै महिन्यात पक्षाचं शिष्टमंडळ घेऊन रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांसाठी ते रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटले होते.
 
पर्यावरणविषयक मुद्द्यांवरही त्यांनी वारंवार मतप्रदर्शन केलं आहे. 'आरे'तील वृक्षतोडीवरून मुंबईत घमासान माजलेले असताना त्यांनी सोशल मीडियावर ही झाडं तोडण्याच्या विरोधात भूमिका घेतली होती.
 
वडील राज ठाकरे यांच्यासोबत विविध दौऱ्यांमध्ये, सभांमध्ये अमित त्यांच्यासोबत कायम असतात, जणूकाही नवीन जबाबदारीसाठी त्यांना तयार केलं जात आहे. गेल्या वर्षी 'ईव्हीएम'च्या मुद्द्यावर राज ठाकरे जेव्हा कोलकात्याला ममता बॅनर्जींची भेट घ्यायला गेले होते, तेव्हाही अमित त्यांच्यासोबत होते.
 
जेव्हा राज ठाकरेंची 'ईडी'कडून दिवसभर चौकशी झाली होती, तेव्हा अमित कुटुंबीयांसमवेत दिवसभर 'ईडी'च्या कार्यालयाबाहेर उपस्थित होते.
amit thackare
अमित यांच्यासमोर कोणती आव्हानं?
अर्थात जसा कयास लावला जात आहे तशी पक्षाची कोणती अधिकृत जबाबदारी अमित यांना मिळाली तरी त्यांच्यासमोरची आव्हानं अनेक असणार आहेत.
 
सर्वात महत्त्वाचं आव्हान असेल ते पक्षामध्ये नवीन चैतन्य आणण्याचं. पक्षाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत (2009) मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. त्यानंतर मात्र मनसेची सातत्यानं पिछेहाट होते आहे.
 
ज्या महानगरपालिकांमध्ये त्यांची सत्ता होती किंवा ते 'किंगमेकर' होते, तिथेही त्यांची पिछेहाट झाली आहे. 2019ची लोकसभा निवडणूक तर मनसेनं लढवली नाहीच, पण अपयशाचा परिणाम संघटनेवर असा झाला होता की, पाठोपाठ होणारी विधानसभा निवडणूकही लढवू नये, असं पक्षातल्या काहींचं मत होतं.
 
तरुण फळीनं आग्रह केल्यानं निवडणुका लढवल्या गेल्या. काही ठिकाणी मनसेला चांगली मतं मिळाली, पण त्यांचा एकच आमदार निवडून आला.
 
या काळात धोरणांबाबतही पक्षानं अनेक 'यू-टर्न' घेतले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचं कौतुक करण्यापासून गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत मोदी-अमित शाहांवर टीका करणाऱ्या प्रचारसभा घेऊन, आता पुन्हा भाजपसोबत राजकीय युतीच्या शक्यतेपर्यंत मनसे आली आहे.
amit thackare
काही महिन्यापूर्वीच्या महाराष्ट्र विधानसभेवेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जवळ जाऊन त्यांच्या 'आघाडी'त सामील न झाल्यानं मनसेबद्दल अनेक मतं तयार झाली आहेत.
 
आता चर्चा अशीही आहे की मनसे शिवसेनेने नमतं घेतलेल्या हिंदुत्वाच्या वाटेवर चालली आहे.
 
ठाकरे आडनावाचं दडपण?
अशा वेळेस जर संघटनेतली महत्त्वाची जबाबदारी अमित यांनी घेतली तर पक्षाचं नेमकं धोरण ठरवून ते तरुण कार्यकर्ते आणि मतदारांपर्यंत नेण्याची जबाबदारी आणि पक्षाबाबतची अनिश्चितता दूर करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असेल.
 
दुसरं आव्हान अर्थात अमित यांच्यासमोर असेल ते तुलनेचं. ठाकरेंसोबतच्याच तुलनेचं. बाळासाहेब ठाकरेंमुळे राजकारणात विशिष्ट भाषा, आक्रमकता, वलय 'ठाकरे' या आडनावाभोवती तयार झालं आहे.
 
प्रबोधनकार ठाकरेंमुळे वैचारिक संदर्भही राजकारणात येणाऱ्या ठाकरे घराण्यातील प्रत्येक व्यक्तीसमोर उभे केले जातात. या सगळ्या वैशिष्ट्यांकडे बोट दाखवून अमित यांची तुलना इतर ठाकरेंशी होणार.
 
पण सर्वांत जास्त तुलना होणार ती वडील राज ठाकरे तसंच चुलत भाऊ आदित्य ठाकरे यांच्याशी.
 
राज यांच्यावर बाळासाहेबांचा असलेला प्रभाव, त्यांच्या भाषणाची आक्रमक शैली, त्यांच्या शैलीचे पक्षाबाहेरही असलेले चाहते, तरुण वर्गात त्यांच्याबद्दल असलेलं प्रचंड आकर्षण, याची तुलना सातत्यानं केली जाईल.
 
अमित ठाकरे यांनी नुकतंच नवी मुंबईतल्या मोर्चाच्या वेळी केलेलं छोटेखानी भाषण सोडलं तर अद्याप त्यांचं मोठ्या व्यासपीठावरून भाषण झालं नाहीये. त्यामुळे त्यांच्याबद्दल कुतूहलही आहे.
 
आदित्यसोबत तुलनेची शक्यता
राज यांच्यासोबतच अमित यांची तुलना त्यांच्याच पीढीतल्या आदित्य यांच्याशीही होण्याची शक्यता अधिक आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांची सातत्यानं तुलना झाली तशीच तुलना आदित्य आणि अमित यांच्यामध्ये सुरू झाली आहे.
 
आदित्य हे बाळासाहेब वा राज ठाकरेंसारखे आक्रमक नसले तरी त्यांनी स्वत:ची एक शैली यांनी तयार केली आहे. युवासेनेमुळे सक्रिय राजकारणातली त्यांची एण्ट्रीही लवकर झाली आणि शिवसेनेनं त्यांना मोठ्या संघटनात्मक जबाबदाऱ्याही दिल्या. निवडणूक लढवणारे ते पहिले ठाकरे ठरले आणि त्यानंतर लगेचच वडिलांच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीही झाले.
 
भाजपपासून फारकत आणि 'महाविकास' आघाडीचं सरकार या काळातल्या सगळ्या राजकीय हालचालींमध्ये आदित्य यांना उद्धव ठाकरेंनी सतत सोबत ठेवलं होतं. तशाच प्रकारच्या राजकीय अनुभवाचीही अपेक्षा अमित यांच्याकडून केली जाईल.
 
जसं आदित्य यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेऊन परंपरा मोडली, तसंच आता अमित ठाकरेही निवडणूक लढवतील का, हा प्रश्नही आहे.
 
'मनसे'चं राजकारण जवळून पाहणारे पत्रकार धवल कुलकर्णी सांगतात, "माझी माहिती अशी आहे की आदित्य ठाकरे यांचा निवडणूक लढवण्याचा निर्णय होण्याअगोदरच मनसेमध्ये अमित यांना लाँच करण्याचा विचार सुरू झाला होता. पण ते लांबलं असावं. आता ते हा निर्णय घेत असावेत."
 
"लक्षात घेतलं पाहिजे की, राज यांच्या राजकारणाची सुरुवात ही विद्यार्थी सेनेपासून झाली. आदित्य यांचंही राजकारण विद्यार्थी प्रश्नांना घेऊन युवासेनेमुळं सुरू झालं. मनसेची विद्यार्थी सेना सध्या काही चांगल्या स्थितीत नाहीये. त्यामुळे कदाचित त्याची जबाबदारी अमित यांना देऊन तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
 
"'ठाकरे' नावाचा करिष्मा आहेच. पण माझ्या मते मनसेला जमिनीशी जोडलेल्या, ग्रामीण भागाचे प्रश्न समजणाऱ्या नेतृत्वाची सध्या गरज आहे," असं धवल कुलकर्णींनी सांगितलं.
 
अर्थात, ज्या दोन ठाकरेंसोबत सातत्यानं अमित यांची तुलना होण्याची शक्यता आहे, त्या दोन्ही ठाकरेंसोबत एक-एक आवडही ते शेअर करतात. राज हे जसे नावाजलेले व्यंगचित्रकार आहेत, तशीच रेषांची कला अमित यांच्या हातीही आहे. राजकीय व्यंगचित्रं नाहीत, पण अर्कचित्र त्यांनी काढली आहेत.
 
त्यांच्या 'इन्स्टाग्राम बायो' मध्येही आवर्जून त्यांनी 'कॅरिकेचरिस्ट'असा उल्लेख केला आहे. जेव्हा त्यांनी फेसबुक पेज सुरू केलं तेव्हा सुरुवात वडील राज यांचं काढलेलं चित्र पोस्ट करून केली. त्यामुळे बाळासाहेबांपासून आलेली रेषांची कला त्यांच्याकडेही आहे.
 
दुसरीकडे, भाऊ आदित्य यांच्यासोबत ते फुटबॉलचं प्रेम शेअर करतात. दोघेही कट्टर फुटबॉलप्रेमी आहेत. मुंबईत झालेल्या 'फुटसाल' या फुटबॉल इव्हेंटला रोनाल्डिन्होसारखे खेळाडू आले होते, तेव्हा अमित आणि आदित्य दोघेही त्यांना आवर्जून भेटले होते.

यावर अधिक वाचा :

नव्या वर्षीच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार

नव्या वर्षीच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार
येत्या ३१ डिसेंबर पर्यंत प्रवाशांना लोकलने प्रवास करता येणार नाही. नव्या वर्षीच ...

सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार

सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार
राज्यात शनिवार १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार ...

जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द

जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द ...

आयएमएकडून आज राष्ट्रव्यापी बंद, रुग्णांची मोठी गैरसोय ...

आयएमएकडून आज  राष्ट्रव्यापी बंद, रुग्णांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता
केंद्र सरकारने आयुर्वेदाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची ...

जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द

जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी अधिसूचना रद्द
जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी १०जुलै २०२०ची अधिसूचना रद्द करण्याच्या ...