शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : शनिवार, 2 नोव्हेंबर 2024 (07:57 IST)

सांस्कृतिक भारत : मिझोराम

mizoram
मिझोराम हे उत्तरपूर्व राज्य म्हणून ओळखले जाते. राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 21087 चौरस किमी असून राजधानीचे शहर ऐझवाल हे आहे. राज्याची प्रमुख भाषा मिझो व इंग्रजी असून 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 1,091,014 इतकी आहे. राज्याची साक्षरता 91.58 टक्के इतकी आहे. राज्यात आठ जिल्हे आहेत. 
 
मिझोराम भारतीय संघ राज्याचे 23 वे राज्य 20 फेब्रुवारी 1987 मध्ये स्थापन झाले. 1972 पर्यंत ते आसामचा एक जिल्हा होते. नंतर ते केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित झाले. 1891 साली ब्रिटिशांनी ते संघराज्यात जोडले. काही वर्ष ते उत्तरेला लुशाई हिल्स आसाम लगत होते तर अर्धे राज्य बंगालच्या अखत्यारीत. 1898 मध्ये ते लुगाई हिल्स डिस्ट्रिक्ट असे मुख्य संयुक्त आसाम म्हणून घोषित झाले. 1972 नॉर्थ इस्टर्न रिऑर्गनायझेशन अॅक्ट अंतर्गत मिझोराम केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित झाले.
 
60 टक्के मिझो नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. 4.4 लाख हेक्टर जमीन बागायतीसाठी तर 25000 हेक्टर जमीन लागवडीखाली असून प्रमुख बागायती उत्पन्न म्हणजे संत्रा, लिंबू, ताजी फळे, हटकोरा, जमीर, अननस आणि पर्यायी इतर पिके. तसचे ऊस, टॅपिओका व कापूस. 
 
संपूर्ण मिझोराम मागासक्षेत्र म्हणून अधिसुचित असून हे राज्य उद्योगविहिन जिल्हा म्हणून सुद्धा नोंदविले गेले. हातमाग व हस्तकला, इलेक्ट्रॉनिक्स जीवनावश्यक वस्तू उद्योग, रेशीम उद्योग असे काही उद्योग आता सुरू झाले आहेत.
 
मिझो राज्य शेतीप्रधान आहे. त्यांचे सण, समारंभ सुद्धा शेतीशीच संबंधीत असतात. म्हणूनच कूट हा शब्द सणासाठी वापरला जातो. छापचार कूट, मिमकूट व पॉलकूट हे मिझोराम मधील प्रमुख सण समजले जातात.
 
ऐझवाल हे शहर समुद्र सपाटीपासून 4000 फूट उंचीवर आहे. ते धार्मिक व सांस्कृतिक मिझोरामचे केंद्र आहे. चंफाई हे आकर्षक पर्यटक केंद्र म्यानमार सीमेवर वसलेले आहे. तामलदिल तलाव ऐझवाल पासून 85 किमी आणि सैतूलच्या मनोरंजन केंद्रापासून सात किमी दूर आहे. वन्ताँग धबधबा हा सर्वात उंच व सुंदर धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे. मिझोरामच्या पर्यटन विभागाने ऐझवाल, लुंगलेईव, चाम्पैई या रेशीम उद्योगाच्या शहरात पर्यटक विश्राम गृह स्थापन केले आहेत. थिंगडवाल, न्हाहथियाल येथे मॉटेल्स आमि बेरॉ लाँग येथे मनोरंजन केंद्र उघडले आहे. उम्पा वन्य प्राणी अभयारण्य, तावी वन्य प्राणी अभयारण्य, सैहा डोंगर रांगा ही दृश्यही पाहण्यासारखी आहेत.
 
राज्याच्या प्रमुख भाषा मिझो व इंग्रजी असल्या तरी अजून काही घटक बोली राज्यात बोलल्या जातात. त्यापैकी काही भाषा व ती कोण बोलतं ते पुढीलप्रमाणे - 
 
बॉम - मिझो-बॉम, बाइटे - मिझो-बाइटे, चाकेसंग - चाक्मा, दुहलियान-त्वांग - हमार, मिझो हुआँल्गो - मिझो हुआँल्गो, खासी - प्नार/सीटेंग, लाई - मिझो-पवाई, लाखेर-मारा - मिझो-मारा/लाखेर, पाँग - मिझो-पाँग, राल्टे - मिझो-राल्टे, रियांग – रियांग, थाडो – थाडो.
 
दुहलीयन वा लुसेइ ही मिझोरामची पहिली भाषा होती जी आता मिझो नावाने ओळखली जाते. ह्या भाषेचा मिझोराम मधील इतर भाषांवरही प्रभाव दिसून येतो. हमार, मारा, लाइ, थाडो, पाइटे, गांगटे आदी भाषा राज्यात बोलल्या जातात. चकमा, दिमासा (कचारी), गारो, हजोंग, हमार, खासी आदी आदिवासी तर अनेक कुकी जमाती मिझोराममध्ये वास्तव्य करतात.
 
मिझो पारंपरिक संगीत साधे सोपे आहे. स्थानिक लोक रात्रभर गाणे गात नाचतात. गिटार हे मिझोरामचे लोकप्रिय वाद्य आहे. चर्चच्या प्रार्थनेवेळी जे वाद्य वाजवले जाते त्याला खुआंग नावाने ओळखतात. ते ढोल सारखेच असते. खुआंग हे वाद्य लाकडापासून आणि प्राण्यांच्या कातडीपासून बनवतात. मिझो लोक हे कोणत्याही वाद्याशिवाय आपले नृत्य करतात. यावेळी गाताना आपल्या तोंडातून ते काही हुंकार काढतात, हाताने टाळ्या वाजवतात. अशा अनौपचारिक संगीताला ते छपचेर म्हणतात. 
 
चेराव नावाचे लोकनृत्य खूप प्रचलित असून या नृत्यावेळी पुरूष जमिनीवर बांबू धरून ठेवतात. दोन्ही हातांनी ते बांबू जवळ घेतात आणि दूर करतात. त्या उघडझाप करणाऱ्या बांबूमध्ये महिला पायांचे ठेके धरून नाचतात. यावेळी महिलांनी आपला पारंपरिक रंगीबेरंगी वेश परिधान केलेला असतो.
 
स्त्री-पुरूष मिळून एक नाच केला जातो याला खुआल्लाम असे म्हणतात. छेइहलाम व छाइ या नावाचेही मिझो लोकनृत्य आहेत.
 
धोलेश्वर, बराक, चिमतुइपुइ, दे, कलादन, कर्णफुली, काउ, खावथलांगतुइपुइ, लंगकाइह, लुंगलेंग, मेंगपुइ, फइरंग, सेरलूइ, सोनई, सुरमा-मेघना, तेइरइ, थेगा, तलावंग, तुइचावंग, तुइरीयल, तुइरीनी, तुइवाव्ल, तुट आदी नद्या मिझोराममधून वाहतात तर मिझो सैहा निळ्याशार डोंगररांगाचे दृश्य. 
 
- डॉ. सुधीर राजाराम देवरे