शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By Author श्री. अमेय पद्माकर कस्तुरे|
Last Modified: मंगळवार, 2 जून 2020 (11:43 IST)

प्रवास रणथंबोरचा

गेल्या वर्षी जूनच्या महिन्यात मी केलेल्या एका वाईल्ड लाईफ फोटोग्राफी बद्दल असणारा हा लेख आहे. फोटोग्राफी ही माझ्या आवडीच्या छंदां पैकी एक छंद आहे. फोटोग्राफीची आवड मला लहानपणापासूनच आहे, माझे वडील कै. श्री. पद्माकर सदाशिव कस्तुरे ह्यांना देखील फोटोग्राफीची आवड होती व ते देखील एक उत्कृष्ट फोटोग्राफर होते . इंजिनीअरिंग क्षेत्रात काम करत असताना त्यांनी फोटोग्राफीची आवड देखील खूप चांगली जपली होती. नवल काय असावे, वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून मी देखील इंजिनीअरिंग क्षेत्रात आलो आणि त्यांच्याद्वारे मिळालेली फोटोग्राफीची विरासत मी आज देखील जपत आहे.
 
गेल्या वर्षी जून महिन्यात ऑफिसमधील काही फोटोग्राफीची आवड असणाऱ्या माझ्या मित्रांबरोबर आम्ही वाइल्ड लाइफ सफारी ला जायचे ठरवले. व्याघ्र दर्शनासाठी सर्वात अनुकूल असणाऱ्या रणथंभोरच्या जंगलात जाण्याचे निश्चित केले. रणथंबोर अर्थात मुंबईपासून बरच लांब असल्यामुळे सफारीसाठी दोन ते तीन महिने आधीच आम्ही ट्रेनचे आणि सफारीचे रिझर्वेशन केले. जाण्याचा दिवस ठरला आणि रिझर्वेशन झाल्यानंतर आम्ही अक्षरशः दिवस मोजू लागलो. 
 
अखेरीस दोन-तीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर तो दिवस उजाडला. सकाळी घरून ऑफिस करता निघतानाच आम्ही डीएसएलआर कॅमेर्‍याचे किट सोबत ठेवून ऑफिस करता निघालो. दिवसभराचे ऑफिस झाल्यावर आम्ही सायंकाळी साडेसात वाजता बोरिवली (मुंबई) येथून दिनांक 13 जून 2019 ला रणथंबोरच्या दिशेने प्रस्थान केले. रणथंबोर या ठिकाणी जाण्याकरता जवळचे रेल्वेस्थानक म्हणजे सवाईमाधवपूर जंक्शन. 
 
सवाईमाधवपूर हे तसे राजस्थान या राज्यात येते. रणथंबोर ला जाण्याकरता बहुतांश लोक हे सवाईमाधवपूर जंक्शन या स्थानकात उतरतात. सवाईमाधवपूर जंक्शन हे स्टेशन मुंबई दिल्लीच्या रेल्वे रूटवर आहे, त्यामुळे बहुतांश ठिकाणाहून रेल्वेची कनेक्टिव्हिटी या स्थानकावर आहे. आम्ही रणथंबोरला 14 जून 2019 रोजी सकाळी साधारण दहा साडेदहाच्या सुमारास पोहोचलो. मुंबईहून हा प्रवास सुपरफास्ट ट्रेन ने साधारण पंधरा तासात पूर्ण करता येतो आमच्या सोबत असणाऱ्या एका सहकार्याने सवाईमाधवपूर येथे आमची राहण्याची सोय केली होती.
 
रणथंबोरच्या जंगल व्याघ्र दर्शन करता एक उत्तम जंगल आहे. दुपारी तीन वाजता ची आमची सफारी होती. रणथंबोरला जून च्या महिन्यात तापमान बरेच जास्त असते. साधारण 40 ते 45 अंश सेल्सिअसच्या उन्हाळ्यात ओपन जिप्सीतून रणथंबोरच्या जंगलात कडे जाताना उष्णता बरीच जाणवत होती. आमचा हा टूर झोन-2 मध्ये होता. झोन-१ ते झोन-६ मध्ये व्याघ्र दर्शनाचे प्रमाण बरेच जास्त असते त्यामुळे ह्या झोनमधील सफारी बऱ्याचदा फुल असतात. 
 
टायगर रिझर्वच्या प्रवेशद्वारात पोचल्यावर आमचे सफारीचे पास आणि आधार कार्ड पाहिल्यानंतर आम्हाला मुख्य द्वारातून सफारीसाठी सोडले. जंगलाचा प्रवास सुरू झाला तेव्हा आमचा आनंद अगदी "जंगलात मावेनासा" झाला होता. जंगलात शिरताना रणथंबोरच्या किल्ल्या ला जाण्यासाठी देखील रस्ता आहे. जंगलातल्या खडबडीत रस्त्यातून जाताना बरेचदा पाठीला त्रास होतो त्यामुळे पाठीला आराम देऊन नीट बसणे हे कधी चांगले. प्रत्येक सफारी साधारण तीन तासांची असते परंतु व्याघ्र दर्शन हा अगदी नशिबाचाच भाग आहे. 
 
जंगलाच्या परिसरात वनविभागाने थर्मल सेन्सर बसवले आहेत या सेन्सरमुळे कोणीही व्यक्ती जिप्सी मधून खाली म्हणजेच जमिनीवर पाय ठेवू शकत नाही. प्रत्येक सफारीमध्ये साधारण दीड तासांनंतर एकदा त्या झोनमधील सुलभ मध्ये घेऊन जातात, जेथे लघु शंका असल्यास प्रवाशांची सोय होते. पण अन्यथा कोणासही खाली उतरण्यास प्रतिबंध आहे.
 
जंगलात साधारण एक तास फिरल्यानंतर मनाची उत्कंठा प्रचंड वाढू लागली. अखेरीस आम्हाला व्याघ्र दर्शन झाले. आम्ही जेथे होतो त्या जवळच आम्हाला वाघाच्या पावलांचे ठसे दिसले. पावलांचे ठसे दिसल्यामुळे आमची जिप्सी बंद करून वाघाची वाट पाहू लागलो. थोडासा वेळ गेला आणि लगेच एक वाघीण जवळच्या तळ्याभोवती पाणी पिण्यास आली आणि आमच्या कॅमेरा मागील नजरा तिच्याकडे वळल्या आणि व्याघ्र दर्शनाची उत्कंठा त्या वाघिणीने पूर्ण केली.
 
टूरच्या दरम्यान घ्यावयाची काळजी
१. कॅमेरा लेन्स रेडी ठेवणे
२. फोटो काढताना फ्लॅशचा वापर न करणे
३. आपण वनविभागात असल्यामुळे प्राण्यांचा आदर करणे.