सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 20 मार्च 2023 (12:33 IST)

बॉलिवूड : हे आहेत पापाराझी, जे सिनेकलाकारांचे फोटो व्हायरल करतात...

मुंबईपासून 96 किलोमीटर अंतरावर असलेल्या अलिबागच्या हेलिपॅडवर वरिंदर चावला श्वास रोखून एकाची वाट पाहत थांबले होते. या हेलिपॅडवर बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचं हेलिकॉप्टर येणार असल्याची टीप त्यांना मिळाली होती. शाहरुख अलिबागहून थेट त्याच्या घरी जाणार होता.
तो दिवस होता 2 नोव्हेंबर 2022 चा. याच दिवशी शाहरुखचा वाढदिवस असतो. आपल्या लाडक्या स्टारला शुभेच्छा देण्यासठी त्याच्या घराबाहेर हजारो चाहते जमतात. शाहरुख त्यांना निराश करणार नाही याची चावलाला खात्री होती, म्हणून ते धीराने वाट पाहू लागले.
 
सरतेशेवटी एक गाडी शाहरुखला घेऊन निघाली. शाहरुख दिसताच चावलाने त्याला हात दाखवला. आणि शाहरुखनेही त्यांची दखल घेत पुन्हा हातवारे केले. क्षणाचाही विलंब न लावता चावला यांनी कॅमेरा काढला आणि फोटो क्लिक केला.
 
चावला सांगतात "हा शॉट माझ्यासाठी पैशाहून जास्त होता. माझ्या प्रयत्नांना यश आलं होतं."
बॉलिवूड सेलिब्रेटींचे फोटो टिपण्यामध्ये ॲक्टिव्ह असणाऱ्या पापाराझींपैकी ते एक आहेत. हे फोटो मिळवण्यासाठी ते बाईकवरून त्यांना फॉलो करतात, त्यांची माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या ड्रायव्हर मॅनेजर यांच्याबरोबर ओळखी वाढवतात, एअरपोर्ट आणि रेस्टॉरंट्सभोवती चकरा मारतात. शिवाय सेलिब्रेटी लोकांच्या गाड्यांच्या नंबर प्लेट्स लक्षात ठेवतात.
 
शाहरुख खानची माजी पब्लिसिस्ट आणि आता स्वतःची पब्लिक रिलेशन कंपनी चालवणारी मांडवी शर्मा सांगते की, पापाराझी आणि बॉलीवूडचे सेलिब्रेटी यांचं एकमेकांशी संधान बांधलेलं असतं.
 
स्टार्स त्यांच्या प्रसिद्धीसाठी पापाराझीवर अवलंबून असतात आणि पापाराझी उदरनिर्वाहासाठी स्टार्सवर अवलंबून असतात. पण त्यांचं हे नातं कधीकधी विखारी सुद्धा होतं. या सगळ्याचं निरीक्षण नोंदवणारे लोक सांगतात की, सोशल मीडियाच्या युगात गोष्टी बदलत आहेत.
 
याचंच ताजं उदाहरण म्हणजे काही फोटोग्राफर्सने आलिया भट्टचे घरात असतानाचे फोटो काढले होते. यावर आलियाने हे आपल्या खाजगी आयुष्यावर झालेलं आक्रमण आहे असं म्हणत टीका केली होती.
 
याच महिन्यात काही पापाराझींनी अभिनेता सैफ अली खान आणि त्याची बायको करीना कपूर खान यांचा त्यांच्या बिल्डिंगपर्यंत पाठलाग केला होता. यावर सैफ पापाराझींना मिश्किलपणे म्हणाला होता, की तुम्ही माझा पाठलाग बेडरूमपर्यंत देखील करू शकता.

हा व्हीडिओ व्हायरल भयानी या फेमस पापाराझीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. आणि तेव्हापासून हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
 
2019 मध्ये सैफ अली खान म्हणाला होता की, काही पापाराझी त्याच्या लहान मुलाचे फोटो टिपण्यासाठी घराबाहेर उभे होते.
 
मागच्या दोन दशकांपासून पापाराझी म्हणून काम करणारा आणि आज हाताखाली 15 फोटोग्राफर्स कामाला ठेवणारा मानव मंगलानी सांगतो की, सोशल मीडियामुळे सेलिब्रेटीविषयी जाणून घेण्याची लोकांची उत्सुकता चाळवली आहे.
 
मागच्या काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रे, मॅगझिन्स पापाराझींकडून सेलिब्रेटींचे फोटो विकत घ्यायचे.
 
पण 2015 दरम्यान भारतात डिजिटल मीडियाचं आगमन झालं आणि गोष्टी एकदमच बदलल्या. शर्मा सांगतात, कारण मीडिया आणि सेलिब्रिटींनी त्यांच्या कामासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा फायदा घ्यायला सुरुवात केली.
 
मंगलानी सांगतात की, आज या फोटोजची मागणी बऱ्याच प्लॅटफॉर्मकडून केली जाते. आणि या प्लॅटफॉर्मवर लाखो भारतीय त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींचे अपडेट घेत असतात.
 
"आम्ही फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम, रोपोसो आणि स्नॅपचॅट सारख्या अॅप्सवर शूटिंग, अपलोड, पोस्ट, स्टोरी शेअर किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग करत असतो."
खरं तर बरेच मोठे आणि नावाजलेले पापाराझी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटोज शेअर करतात. यातल्या भयानीचे 5.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर मंगलानीचे सुमारे 2.6 मिलियन आणि चावलाचे 1.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.
 
बऱ्याचदा फोटो काढताना मर्यादा ओलांडली जात असल्याचं चावला मान्य करतात. कारण फोटोग्राफर्समध्ये चांगले फोटो काढण्याची चढाओढ लागलेली असते. पण या फोटोजमधून एखाद्याचा जाणीवपूर्वक अपमान होईल अशी पोस्ट करणं टाळलं जातं.
 
अनिता पूर्वी फोटोग्राफर म्हणून काम करायची. ती सांगते, पापाराझी असाइनमेंट खूप तणावपूर्ण आणि कधीकधी अत्यंत क्लेशकारक वाटतात. दुसर्‍याला मिळालेला शॉट मी चुकवला, तर माझा बॉस माझ्यावर ओरडतो. पण जेव्हा कोणीतरी एखादा चांगले क्लिक्स घेऊन येतो तेव्हा त्याला टिप दिली जाते.
 
मंगलानी सांगतात, वृत्तसंस्था आणि टीव्ही चॅनेल्सकडूनही कधीकधी दबाव येतो. प्लॅटफॉर्मवर जे फोटो आणि व्हिडिओ असतात ते त्यांना हवे असतात.
 
1990 पर्यंत गोष्टी खूप वेगळ्या होत्या. चावलाचे वडील देखील प्रसिद्ध फोटोग्राफर होते. त्यांना ॲक्टर्सचे मॅनेजर फोटो काढण्यासाठी बोलवून घ्यायचे. चावलाही त्यावेळी आपल्या वडिलांसोबत चित्रपटांच्या सेटवर जायचे.
 
"आम्ही सेलिब्रेटींसोबत सेटवरच डिनर किंवा लंच करायचो. आम्हाला त्यांच्याशी गप्पा मारायला मिळायच्या आणि त्यातूनच मैत्री वाढायची. तेव्हाचे हीरो शूटिंगमधून ब्रेक घ्यायचे आणि अनेक फोटोसाठी पोज द्यायचे. त्यावेळी पापाराझी कल्चर नव्हतं."

मीडिया आणि राजकारणावर लिहिणाऱ्या स्वतंत्र पत्रकार रंजोना बॅनर्जी सांगतात की, 90 च्या दशकात भारताने जगासाठी आपली दारं खुली केली आणि कल्चरमध्ये बदल घडले.
 
त्या पुढे सांगतात की, "खाजगी टीव्ही चॅनेल्स आल्यामुळे आपल्याला जास्तीच्या मनोरंजनाची सवय झाली. त्यातच सिने ब्लिट्झ आणि स्टारडस्टसारख्या मॅगझिनमुळे सेलिब्रिटी गॉसिप आणि बी टाऊन मधील बातम्या कळू लागल्या.
 
त्या सांगतात की, "आताच्या सेलिब्रेटी फोटोंना स्टेज आणि जुना अनुभव राहिलाच नाही. आता त्यांचे फोटो अधिक स्पष्ट आणि प्रासंगिक झालेत."
 
त्याचवेळी बॉलीवूड मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट होत आहे. बँका आणि स्टुडिओनी चित्रपटांना वित्तपुरवठा करायला सुरुवात केलीय. पूर्वी या स्टार्सचा एखादा मॅनेजर असायचा पण आता त्यांच्या सगळ्या गोष्टी पीआर टीम हाताळतात.
 
यामुळे सेलिब्रिटी आणि फोटोग्राफर यांच्यात एक विचित्र प्रकारचं अंतर निर्माण झाल्याचं चावला सांगतात. आमच्याकडे आजही या स्टार्सचा सहज ॲक्सिस असला तरी गोष्टी पूर्वीइतक्या सोप्या राहिल्या नाहीत.
 
भारतात पापाराझी कल्चर नेमकं कधी सुरू झालं हे सांगता येत नाही. पण या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे सांगतात की, 2000 दशकाच्या सुरुवातीच्या काळात हे कल्चर येऊ लागलं होतं.
 
चावला सांगतात की, त्यांनी अभिषेक बच्चनच्या लग्नाचे फोटो चोरून काढल्यानंतर हा ट्रेंड सुरू झाला. कारण त्यावेळी अभिषेक बच्चनच्या लग्नात फोटोग्राफर्सना येऊ दिलं नव्हतं.
 
अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये अशी बरीच प्रकरणं समोर आली आहेत ज्यात सेलिब्रिटींच्या खाजगी आयुष्यात डोकावल्यामुळे पापाराझींवर खटले भरण्यात आलेत.
 
शर्मा सांगतात, "भारतात देखील लवकरच सेलिब्रिटी, पापाराझी, मॅनेजर आणि पब्लीसिस्टमध्ये असाच पायंडा पडण्याची शक्यता आहे. जेणेकरून प्रत्येकाच्या बाजूने काम करणारी एक चांगली व्यवस्था निर्माण होईल."
 
Published By- Priya Dixit