भारतातील सर्वात लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉस 17 संपला असून, मुनव्वर फारुकी याचा विजेता बनला आहे.
तर 'पवित्र रिश्ता'मुळं घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अर्चना उर्फ अंकिता लोखंडे चौथ्या स्थानी राहिली. बिग बॉसच्या घरात अंकिता तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राहिली.
बिग बॉस 17 चा प्रवास अंकितासाठी सोपा नव्हता. कारण या प्रवासात तिला अनेक चढउतार पाहायला मिळाले.
बिग बॉसच्या घरात अंकितासाठी काय होतं खास?
बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडेची तिचं खासगी जीवन आणि पती विकी जैनबरोबरच्या वादांमुळं बरीच चर्चा झाली.
बिग बॉसच्या घरातील भांडणांमध्ये अंकिताची सासू आणि आईच्या वक्तव्यांचीही चर्चा झाली. त्यामुळं अंकिताचं खासगी जीवन शोमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलं हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही. या शोमधील अंकिताचे काही खास आणि विसरता न येणारे किस्से..
पती बरोबर शोमध्ये एंट्री आणि शपथा
बिग बॉस 17 च्या घरात अंकिता लोखंडेनं पती विकी जैनबरोबरच सहभाग घेतला. घरात जाण्यापूर्वी दोघांनी लग्नावेळी घेतलेल्या वचनांचा पुनरुच्चार केला.
अंकिता-विकीची भांडणे
शपथा घेत बिग बॉसच्या घरात प्रवेश करणाऱ्या अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या या तीन महिन्यांच्या प्रवासात प्रेम कमी आणि भांडणंच जास्त पाहायला मिळाली.
ते दोघं दररोज भांडणं करताना, वाद घालताना दिसले. दोघांनी एकमेकांच्या भावना समजून घेतल्या नसल्याचा आरोप एकमेकांवर केला. या वादामध्ये ते अगदी घटस्फोटापर्यंतही बोलले.
इतर स्पर्धकांशी भांडण
शोमध्ये इतर अनेक स्पर्धकांशीही अंकिता लोखंडेचे मतभेद पाहायला मिळाले. या कंटेस्टंटमध्ये तिचा सर्वाधिक वाद मनारा चोप्राबरोबर झाल्याचं पाहायला मिळालं.
बिग बॉसच्या घरात आल्याच्या काही दिवसांनंतरच दोघींमध्ये भांडण सुरू झालं. त्याशिवाय ऐश्वर्या शर्मा आणि खानजादी यांच्याशीही तिचं नातं फारसं चांगलं नव्हतं.
अंकिताची प्रेग्नंसी टेस्ट
अंकिता लोखंडे गर्भवती असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडेनं प्रेग्नंसी टेस्टही केली. पण तिची टेस्ट निगेटिव्ह आली.
पती विकीला लाथ मारण्याचा किस्सा
शोमध्ये अंकिता लोखंडेनं पती विकी जैनला काहीतरी वादातून लाथ मारली होती. हा मुद्दा दर्शक आणि तिच्या सासूला आवडला नाही. त्यावर बरीच चर्चा झाली. अंकिताला याबाबत बरंच काही ऐकावंही लागलं.
अंकिताच्या सासूची वक्तव्यं
अंकिता लोखंडेच्या सासूनं अनेकदा माध्यमांमध्ये काही वादग्रस्त वक्तव्येही दिली. त्यांचं कुटुंब विकी आणि अंकिताच्या लग्नासाठी तयार नव्हतं असंही त्या म्हणाल्या.
विकीबरोबरच्या अंकिताच्या शोमधील वर्तनावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच दर्शकांची सहानुभूती मिळवण्यासाठी अंकिता सुशांतच्या आठवणी काढत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
कुटुंबीय पोहोचले कन्फेशन रूममध्ये
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यातील वाढता वाद पाहता शोमध्ये अंकिता आणि विकी यांना त्यांच्या आईशी भेटण्यासाठी कन्फेशन रूममध्ये बोलावण्यात आलं. त्यावेळी त्यांना कुटुबीयांनी बराच सल्ला दिला आणि नातं सांभाळण्याचाही सल्ला दिला.
अंकितानं केला सुशांतचा उल्लेख
बिग बॉस 17 च्या शोमध्ये अंकिता लोखंडेनं अनेकदा दिवंगत सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख केला होता. शोचा रनर अप ठरलेल्या अभिषेक कुमारला पाहून तिला सुशांतची आठवण आली होती.
विकी-मनारा विरुद्ध अंकिता-मुनव्वरची मैत्री
बिग बॉसच्या अखेरच्या महिन्यात अंकिता लोखंडेचा पती विकी जैन आणि मनारा यांची मैत्री खूप चर्चेत होती. अंकिताला ती मैत्री आवडत नव्हती. त्यामुळं तिनं अनेकदा स्पष्टपणे त्याचा उल्लेखही केला.
मनाराबरोबरच्या नात्यामुळं अंकिता आणि विकी यांच्यात अनेकदा भांडणं झाल्याचंही पाहायला मिळालं. तर विकी जैनलाही मुनव्वर आणि अंकिता यांची मैत्री फारशी आवडत नव्हती. शोमध्ये ते अनेकदा दिसून आलं.
बिग बॉस 17 मुळं किती फायदा किती नुकसान?
बिग बॉस 17 च्या घरात लोकांना अभिनेत्री अंकिता लोखंडेचं वेगळं रुप पाहायला मिळालं. दर्शकांनी कधीही त्याची कल्पनाही केली नव्हती. वरिष्ठ पत्रकार रामाचंद्रन श्रीनिवासन यांनी अंकिताच्या बिगबॉसमधील प्रवासाचा आढावा घेतला आणि तिची प्रतिमा तसंच लोकप्रियता याबाबत मत व्यक्त केलं.
"आजच्या काळात यशाचं मोजमाप इन्स्टाग्रामवर फॉलोवर्स मोजून केलं जातं. त्यासाठी अनेकदा खोटे फॉलोअर्स खरेदीही केले जातात," असं ते म्हणाले.
"बिग बॉस एक रियालिटी शो आहे. तुम्ही कितीही काळ अभिनय केला तरी ठरावीक वेळेनंतर तुमचं खरं व्यक्तीमत्त्वं समोर येतंच. एका काळानंतर तुम्ही कॅमेऱ्यासमोर आहात याचाही तुम्हाला विसर पडतो. त्यामुळं तुमचा रागही समोर येऊ लागतो. शोमध्ये अंकिता लोखंडेचे तिच्या पतीबरोबर म्हणजे विकीबरोबर वाद होत असताना तिच्या व्यक्तिमत्त्वाची झलक लोकांना दिसली."
त्यांच्या मते, अंकिता लोखंडे 'पवित्र रिश्ता' नंतर चित्रपटांच्या करिअरमध्ये एकदाही मुख्य भूमिकेत दिसली नाही. 'मणिकर्णिका' मध्ये ती सहायक भूमिकेत होती. तर तिच्या आगामी 'स्वातंत्र्य वीर सावरकर' मध्येही तिची तशीच भूमिका आहे. त्यामुळं करिअर कोणत्या दिशेला जात आहे, हे तिला चांगलंच माहिती आहे.
'बिग बॉस' मुळं करिअरचं काय होणार?
बिग बॉसच्या घरात वेगळ्या रुपात दिसलेल्या अंकिताच्या व्यक्तिमत्त्वाचा परिणाम प्रेक्षकांवर होईल का? या प्रश्नाचं उत्तर देताना श्रीनिवासन म्हणाले की,"अंकिता जोपर्यंत चित्रपट किंवा मालिकेत नकारात्मक भूमिक करणार नाही, तोपर्यंत तिची सुनेची प्रतिमा प्रेक्षकांच्या मनातून हटणार नाही."
सलमान खानचं उदाहरण देताना रामाचंद्रन म्हणाले की, त्याच्या खासगी जीवनात अनेक वाद झाले. पण चित्रपटांत त्यानं फक्त हिरोची भूमिका केली आणि त्याची तीच प्रतिमा कायम आहे. स्टारची स्क्रीन इमेज जास्त महत्त्वाची आहे. त्याच्या वैयक्तिक प्रतिमेला फार महत्त्व मिळत नाही. आधीच्या पिढीतील कलाकार प्रतिमा सांभाळण्याबाबत जपून असायचे. पण आजच्या पिढीला यानं फारसा फरक पडत नाही. कारण आजकाल दर्शक किंवा फॅन्स त्यावरून काही अंदाज लावत नाहीत.
बिग बॉसमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांच्या लोकप्रियतेत वाढ होत असते. बिग बॉसमुळं अनेकांच्या करिअरला वेग मिळाला आहे. फक्त ज्यांची आधीची खूप मोठी इमेज असेल त्यांच्याच करिअरमध्ये बिग बॉसनंतर घसणर पाहायला मिळते.
"अंकिताकडं गमावण्यासारखं काही नाही. अंकिता लोखंडेला करिअरचा विचार करता फार मोठं यश मिळालेलं नाही. अंकितानं बिग बॉसच्या घरात काही परिस्थितींवर तिची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावर लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली. पण त्यासाठी कोणी तिचा द्वेष करेल असं वाटत नाही. फॅन्सना यामुळं काही फरक पडत नसतो," असं ते म्हणाले.
Published By- Priya Dixit