गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 एप्रिल 2024 (16:49 IST)

अभिनेता कार्तिक आर्यन गिरवतोय मराठीचे धडे!

‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटासाठी अभिनेता कार्तिक आर्यन याने अस्खलितपणे मराठी बोलता यावे, म्हणून तब्बल १४ महिने घेतली कठोर मेहनत
 
साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांनी संयुक्तपणे निर्मिती केलेला आगामी 'चंदू चॅम्पियन' हा खरोखरच या वर्षात प्रदर्शित होणाऱ्या बड्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाद्वारे एक विलक्षण कथा सिनेरसिकांसमोर सादर होत असून, यात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता कार्तिक आर्यन यापूर्वी कधीही न साकारलेल्या नव्या अवतारात दिसणार आहे. तो साकारत असलेली व्यक्तिरेखा परिपूर्णतेने वठवण्याकरता त्याने मनापासून आणि हृदयापासून प्रयत्न केले आहेत. सुपरस्टार कार्तिकने या चित्रपटाकरता शारीरिकदृष्ट्या आणि व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनेही कठोर मेहनत केली आहे. सिनेरसिक आश्चर्यचकित होतील, इतके परिवर्तन तर त्याच्यात घडलेले पाहायला मिळेलच, त्या व्यतिरिक्त मराठी भाषासंपदा आणि उच्चार यांवरही त्याने कमालीची मेहनत घेतलेली आहे.
 
‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटात कार्तिक अत्यंत वेगळी भूमिका वठवत असून ती हुबेहूब साकारण्यासाठी त्याने कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. कार्तिकने या चित्रपटात त्याच्या भाषेकडे विशेष लक्ष पुरवले आहे. अस्खलित मराठी बोलता यावे, म्हणून कार्तिकने गेली १४ महिने कसून तयारी केली आहे. एका जाणकार भाषा प्रशिक्षकाच्या मदतीने कार्तिकला मराठी भाषेवर पकड मिळवणे शक्य झाले. यामुळे ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटातील कार्तिकच्या भूमिकेबाबत सिनेरसिकांमध्ये उत्सुकता आहे.
 
साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांनी संयुक्तपणे निर्मिलेला 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट  येत्या १४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. जगभरातील सिनेप्रेक्षकांच्या हृदयावर अमिट छाप उमटवण्याकरता हा चित्रपट पुरता सज्ज आहे.