1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 12 एप्रिल 2025 (12:29 IST)

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सीझन 15 चे विजेतेपद पटकावले मानसी घोषने

मुंबई: अनेक जबरदस्त परफॉर्मन्सेस आणि अटीतटीच्या सांगीतिक स्पर्धेनंतर सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सीझन 15 या लोकप्रिय संगीत रियालिटी शोचा सुरेल प्रवास मानसी घोष या स्पर्धकाला विजेता घोषित करून समाप्तीच्या काठावर येऊन थांबला. हा भव्य फिनाले म्हणजे असामान्य प्रतिभेचा उत्सव होता. यामध्ये अनेक हृदयस्पर्शी परफॉर्मन्सेस होते आणि भारतातील ‘गायन शिरोमणी’चा शोध घेण्याच्या या भावनिक प्रवासाची अखेर सांगता झाली.
 
मोहक व्यक्तिमत्त्वाच्या आदित्य नारायणच्या सूत्रसंचालनातील या ग्रँड फिनालेमध्ये परीक्षक बादशाह, विशाल ददलानी आणि श्रेया घोषाल अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांचे मनोबल वाढवताना दिसले. अंतिम फेरीत पोहोचलेले सहा स्पर्धक होते: स्नेहा शंकर, शुभजीत चक्रवर्ती, चैतन्य देवाढे (माऊली), प्रियांग्शु दत्ता, मानसी घोष आणि अनिरुद्ध सुस्वरम. रवीना टंडन, शिल्पा शेट्टी, मिका सिंह हे बॉलीवूड कलाकार आणि सोनी लिव्हवरील ‘चमक’च्या कलाकारांनी फिनालेमध्ये उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि मनोरंजन द्विगुणित केले.
 
मानसी घोष ही इंडियन आयडॉल 15 ची स्पर्धक या प्रतिष्ठित ट्रॉफीची मानकरी ठरली. कोलकाताहून आलेल्या मानसीने या स्पर्धेच्या आपल्या संपूर्ण प्रवासात आपल्या चपळ आवाजाने आणि गायकीने प्रेक्षक आणि परीक्षक दोघांना मंत्रमुग्ध केले आणि सगळ्यांकडून भरपूर कौतुक मिळवले. तिचा हा प्रवास खूप प्रेरणादायक होता. तिला इतकी मोठी गायिका बनवण्यात तिच्या आई-वडीलांनी तिला निरंतर दिलेल्या समर्थनाचा खूप मोठा वाटा असल्याचे तिने या स्पर्धेत असताना सांगितले होते. दुसऱ्या क्रमांकावर शुभजीत चक्रवर्ती हा गायक आला. आणखी एका यशस्वी सीझनची पूर्णाहुती करून इंडियन आयडॉलने भारतातील सर्वात लाडका गायन रियालिटी शो म्हणून आपले स्थान आणखी बळकट केले आणि होतकरू गायकांना एक प्रतिष्ठित मंच प्रदान करण्याची परंपरा निभावली. या घवघवीत यशाबद्दल मानसी घोषचे मनःपूर्वक अभिनंदन.
 
मानसी घोष म्हणते, “इंडियन आयडॉलमध्ये माझी सुरुवात झाली, त्यावेळी मी खूप घाबरले होते. किमान फायनलपर्यंत पोहोचण्याचे माझे स्वप्न होते, पण त्याच्या पलीकडे जे यश मला मिळाले, ती सारी देवाची कृपा आहे. मला धन्य धन्य वाटते आहे. मला योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल आणि या प्रवासात मला समर्थन दिल्याबद्दल श्रेया मॅम, बादशाह सर आणि विशाल सरांची मी आभारी आहे. मला योग्य गाण्यांची निवड करण्यात मदत करणाऱ्या आणि प्रत्येक परफॉर्मन्स माझ्याकडून बारकाईने तयार करून घेणाऱ्या मेंटर्सना देखील खूप खूप धन्यवाद! आणि अर्थात, येथील अद्भुत बॅन्ड- प्रत्येक परफॉर्मन्स जिवंत केल्याबद्दल तुमचेही आभार. माझ्या सह-स्पर्धकांचे देखील मी आभार मानते. ते तर जणू माझे कुटुंबच बनले होते. या सर्वांच्यामुळे हा संपूर्ण प्रवास अविस्मरणीय होऊन गेला!”
भारतीय संगीत क्षेत्रातील गोड गळ्याची, लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल म्हणते, “मानसी इतकी मनापासून गायची, गाण्यात भाव ओतायची! संपूर्ण सीझनमध्ये तिचे गायन ऐकताना खूप मजा आली. हा विजय म्हणजे तिच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीची फक्त सुरुवात आहे. आणि मानसी, मला खात्री आहे, तुझा आवाज लक्षावधी लोकांच्या मनाला स्पर्शेल!”
 
मानसीच्या आवाजातील दमदारपणा आणि भावनांचे गहिरेपण याचा आवर्जून उल्लेख करत विशाल ददलानी म्हणाला, “मानसी इंडियन आयडॉलच्या इतिहासातील दुसरी महिला विजेती ठरली, याचा मला फार फार अभिमान वाटतो. तिला संकोचाची बंधनं झुगारून देऊन मंच दणाणून सोडताना पाहिताना माझे मन आनंदाने भरून जाई. आपला दृढनिर्धार आणि प्रतिभेच्या जोरावर तिने आज हे यश मिळवले आहे. पहिल्या दिवसापासूनच मानसी म्हणजे एक पॉवरहाऊस होती. प्रत्येक गाणे आपलेसे करून गाण्याची हातोटी तिच्यात होती. तिच्या आवाजात अशी काही शब्दातीत ताकद होती की ती श्रोत्यांना हेलावून सोडत असे. तिने गुणवत्तेचा मापदंड केवळ उंचावला नाही तर भावी स्पर्धकांसाठी त्याची नवी व्याख्याच तयार केली आहे.”