सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 6 जानेवारी 2020 (11:25 IST)

परेश रावल साकारणार माजी राष्ट्रपती कलाम यांची भूमिका

बॉलीवूडमध्ये एक अजून बायोपिकची तयारी सुरु आहे. देशाचे माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दूल कलाम यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक तयार करण्यात येत असून परेश रावल ही भूमिका साकारणार आहे. स्वतः परेश रावल यांनी ट्विटरवरून याची माहिती चाहत्यांना दिली.
 
ट्विटरवर कलामांचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, 'माझ्यामते, कलाम हे संत कलाम होते. पडद्यावर कलामांची व्यक्तिरेखा साकारण्याचे संधी मला मिळाल्याने मी फार नशीबवान आहे.' याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा रावल यांनी बोलून दाखवली होती. मात्र काही कारणांमुळे त्यांना या सिनेमात काम करता आलं नाही.
 
परेश रावल राजकारणात उतरले असून गेल्या लोकसभेत भाजपकडून अहमादाबाद येथून निवडून आले होते. यंदाच्या लोकसभेत मात्र त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.
 
चतूरस्त्र अभिनय कौशल्याने परिपूर्ण ही व्यक्तिरेखा कितपत निभावून नेतात हे तर प्रेक्षक ठरवतील. तसेच आतापर्यंत बॉलीवूडने संजय दत्त, मेरी कॉम, एम.एस. धोनी, मिल्खा सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिक सादर केल्या आहेत.