शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 7 एप्रिल 2023 (19:27 IST)

Pushpa- 2- रक्तचंदन नेमकं काय असतं? त्याची एवढी तस्करी का होते?

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमाचा दुसरा पार्ट नेमका कधी येणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. या उत्सुकतेमध्ये भर टाकणारा 'पुष्पा'च्या निर्मात्यांनी रिलीज केला आहे.
'हन्ट फॉर पुष्पा' या नावाने हा आगळावेगळा कन्सेप्ट व्हीडिओ आज (7 एप्रिल) रिलीज करण्यात आला आहे. तिरुपती जेलमधून फरार झालेला पुष्पा नेमका कुठे गेला असावा, या प्रश्नाचं उत्तर शोधणारा हा व्हीडिओ आहे.
 
निर्मात्यांनी केवळ हा व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे, पण पुष्पाच्या दुसऱ्या भागाच्या रिलीजबद्दल कोणतंही भाष्य केलं नाहीये. त्यामुळे अल्लू अर्जुनच्या फॅन्सची केवळ उत्कंठाच या व्हीडिओने वाढवली आहे.
अल्लू अर्जुन, फहाद फासिल, रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'पुष्पा' डिसेंबर 2021 मध्ये रिलीज झाला होता.
 
या चित्रपटाचा नायक हा रक्तचंदनाची तस्करी करणारा दाखविला आहे.
 
या चित्रपटातलं घनदाट जंगल, रक्तचंदनाची तस्करी, त्यावरुन होणारा रक्तपात ही केवळ सिनेमाची कथा आहे, कल्पना आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा... या रक्तचंदनासाठी तामिळनाडू-आंध्र प्रदेशच्या सीमेवरील शेषाचलममध्ये अनेकांनी खरंच प्राण गमावले आहेत.
 
हे रक्तचंदन एवढं किमती का आहे? आपण नेहमी जे चंदन वापरतो, त्यापेक्षा हे चंदन वेगळं कसं आहे? या चंदनाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तस्करी का होते?
लाल रंगाच्या या चंदनाचा वापरही पूजाअर्चेसाठी होतो. पांढऱ्या चंदनाचा वापर सामान्यपणे वैष्णव पंथातील लोक करतात, तर रक्तचंदनाचा वापर हा शैव आणि शाक्तपंथीय मोठ्या प्रमाणावर करतात.
 
रक्तचंदन नेमकं काय आहे?
आंध्र प्रदेश वन विभागातील अतिरिक्त मुख्य संरक्षक बी मुरलीकृष्णा सांगतात की, रक्तचंदन हा एक वेगळ्या जातीचा वृक्ष आहे. त्याचं लाकूड लाल असतं, पण त्याला पांढऱ्या चंदनाप्रमाणे सुगंध नसतो.
 
बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं, "रक्तचंदनाचं शास्त्रीय नाव हे 'टेराकॉर्पस सॅन्टनस' आहे, तर पांढऱ्या चंदनाला शास्त्रीय परिभाषेत 'सँटलम अल्बम' म्हणून ओळखलं जातं. हे दोन्ही वेगळ्या जातीचे वृक्ष आहेत."
मुरलीकृष्णा यांच्या मते पांढऱ्या चंदनाप्रमाणे रक्तचंदनाचा वापर हा साधारणपणे औषधं किंवा अत्तर बनविण्यासाठी किंवा हवन-पूजापाठ यांमध्ये होत नाही. मात्र, रक्तचंदनापासून महागडं फर्निचर आणि सजावटीचं सामान बनतं. त्याच्या नैसर्गिक रंगाचा वापर कॉस्मेटिक्स आणि मद्य बनविण्यासाठीही होतो.
 
आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत साधारणतः तीन हजार रुपये प्रति किलो आहे.
 
रक्तचंदन एवढं खास का?
रक्तचंदनाची झाडं ही मुख्यतः आंध्र प्रदेशच्या तामिळनाडूला लागून असलेल्या चित्तूर, कडप्पा, कुरनूल आणि नेल्लोर या चार जिल्ह्यांत पसरलेल्या शेषाचलमच्या पर्वतरांगांमध्ये आढळतात.
 
जवळपास पाच लाख स्क्वेअर हेक्टरच्या परिसरात पसलेल्या जंगलात आढळणाऱ्या रक्तचंदनाच्या झाडाची सरासरी उंची ही आठ ते अकरा मीटर असते. हे झाड सावकाश वाढतं, त्यामुळे त्याच्या लाकडाची घनताही अधिक असते.
तज्ज्ञ सांगतात की, लाल चंदनाचं लाकूड हे इतर लाकडांपेक्षा अधिक वेगानं पाण्यात बुडतं, कारण त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असते. हीच खऱ्या रक्तचंदनाची ओळख असते.
 
कुठे आहे सर्वाधिक मागणी?
चीन, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमीरात या देशांमध्ये रक्तचंदनाला अधिक मागणी आहे. चीनमध्ये याची सर्वाधिक मागणी आहे.
 
मुरलीकृष्णा यांनी सांगितलं होतं की, चीनमध्ये चौदाव्या शतकापासून सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत शासन करणाऱ्या मिंग वंशाच्या राजवटीत रक्तचंदनाची लोकप्रियता होती.
त्यांनी सांगितलं, "सुरुवातीला याची मागणी जपानमध्येही अधिक होती. कारण जपानमध्ये लग्नाच्यावेळी गिफ्ट केलं जाणारं शामिशेन हे पारंपरिक वाद्य बनविण्यासाठी रक्तचंदनाच्या लाकडाचा वापर व्हायचा. मात्र आता ही परंपरा हळूहळू लोप पावत आहे."
 
इंग्रजी वर्तमानपत्र चायना डेलीच्या मते मिंग वंशाच्या शासकांना रक्तचंदनापासून बनलेलं फर्निचर इतकं आवडायचं की, त्यांनी शक्य तितक्या ठिकाणाहून ते मागवलं होतं.
 
मिंग वंशाच्या शासकांचं हे वेड इतकं पराकोटीचं होतं की तिथे 'रेड सँडलवूड म्युझियम' आहे. या संग्रहालयात रक्तचंदनापासून बनवलेलं फर्निचर आणि शोभेच्या वस्तू आहेत.
 
Published By- Priya Dixit