शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 एप्रिल 2014 (15:21 IST)

नवेच चेहरे हवेत

सध्या बॉलिवूडमध्ये लाट आहे, नव्या छाव्यांची. बिग बजेट चित्रपट असो वा महागडय़ा जाहिरातींचे करार सगळीकडे हे नवे चेहरेच दिसतायत. येत्या काळात हीच यंग ब्रिगेड बॉलिवूडचं भविष्य बनेल, अशी जोरदार चर्चा आहे. बॉलिवूड सिनेमात एखादा जरी खान असेल तरी सिनेमा नक्की चालणार असं समीकरण होतं. पण आता चित्र बदललंय. या प्रस्थापितांना चॅलेंज देण्यासाठी एक नवीन फळी तयार झालीय.

या नव्या कलाकारांच्या फळीतल्या हिरोंमध्ये आहेत; वरुण धवन, सुशांत सिंग राजपूत, अजरुन कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, आदित्य रॉय कपूर तर हिरोइन्समध्ये परिणिती चोप्रा, आलिया भट आणि श्रद्धा कपूर यांची वर्णी लागते. हे फ्रेश चेहरे स्वत:चं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे हेच उद्याचे शाहरुख-सलमान होणार असा अंदाज वर्तवला जातोय. बॉक्सऑफिसच्या बिझनेसकडे एक नजर टाकली तर असं दिसून येतंय की, आता बडय़ा सुपरस्टार्सच्या सिनेमांच्या कलेक्शनला उतरती कळा लागलीय. म्हणजे त्यांच्या कलेक्शनचे आकडे कोटींमध्ये असले तरी ते खरं नाही.

कारण देशभरात स्क्रीन्स जास्त असल्यामुळे सिनेमा फ्लॉप गेला तरी कोटींच्या संख्येत गल्ला जमतो. त्यातच हे बडे स्टार्स त्याच त्या विशिष्ट पठडीतल्या भूमिका करत असल्यानं टाइपकास्ट झाल्याचं निर्माता-दिग्दर्शकांना कळून चुकलंय. त्यामुळे आता तेही नवीन पर्यायांच्या शोधात आहेत. त्यामुळे हल्ली बिग बजेट चित्रपट असो वा महागडय़ा जाहिरातींचे करार सगळ्यामध्ये बॉलिवूडचे फ्रेश चेहरेच झळकत आहेत.