testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

एक सर्वोत्तम कवितासंग्रह -भावतरंग

marathi kavita
Last Modified शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016 (12:21 IST)
काव्याविषयी लिहितांना एका इंग्रजी भाष्यकारानं Spontaneous overflow of powerful feelings... उस्फूर्त भावनांचा सहजस्फूर्त उद्रेक अस लिहिलं आहे. अंतरीचे धावे स्वकाने बाहेरी असं तुकोबांचं वचन तर सर्वश्रुत आहे. यमक अनुप्रासांचा खटाटोप करून काव्य होत नाही तर त्यासाठी संवेदनशील मन व सजग जीवनदृष्टी असावी लागते. कवयित्री माणिक नागावे यांच्या या काव्यसंग्रहात वरील सर्व काव्यगुण प्रकट झालेले दिसून येतात.
जन्मजात प्रतिभा ही तर काव्य रचनेसाठी हवीच पण त्याचबरोबर संस्कार, जिवंत अनुभव, चिंतन, मनन जगाकडे प्रेमानं, आपुलकीनं पाहणारं दयाळू मन या सारख्या अनेक भावोत्कट गोष्टींचं मिश्रणही आवश्यक असतं आणि त्याच वेळी कसदार काव्य रचना होते व ही काव्य रचना मग साहजिकच वाचकांच्या मनाला मोहिनी घालते याचंही प्रत्यंतर भावतरंग या काव्यसंग्रहातून येते. या कवितासंग्रहाच्या अंतरंगात प्रवेश करण्यापूर्वी कवयित्रीची पूर्व पिठीका समजून घेतल्यास त्यांच्या काव्यरचनेचं मर्म आपोआप आपणासमोर उलगडत जातं.
एक आदर्श शिक्षक दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या कवयित्री स्वतः उत्तम शिक्षिका आहेत. शिक्षकात निम्मी आई असते त्यात त्या स्वतः स्त्री शिक्षिका असल्याने एका आदर्श मातृत्वाचेही सारे गुण त्यांच्यात असणे स्वाभाविक आहे त्यामुळे संस्कृती, समाज, संस्था यांचे असणारे वेगवेगळे १६ सन्मानीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. पण त्याहून हे महत्वाचे आहे की आई या विषयावरच्या महत्वाच्या कविता या संग्रहात समाविष्ट आहेत, पिलावरील तिची माया कशी असते तर कोमेजता मुख तिच्या पिलांचे, पाणी होते तिच्या काळजाचे... अशी तिची अवस्था होते आईचे म्हणजे ‘रेशीम बंध’ त्याचे वर्णन करताना...
माया ममता आई
हे बंध रेशमाचे
रेशीम गाठी सुटत नसतात
लक्षात हे ठेवायचे

असे शब्द त्यांच्या लेखणीतून पाझरले आहेत. तर आईच्या रूपाबद्दल व आधाराबद्दल बोलताना त्या म्हणतात की...

मूर्ती तुझी साजरी
लोचनात तरळली
खंबीर मन झाले
भिती दूर पळाली

अशा दर्जेदार कवितेचे अर्थातच मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून मुक्ताई फाउंडेशनने त्यांचा यथोचित गौरव केला आहे. म्हातारपण कोणास चुकलं आहे त्यावर मिश्किल भाष्य करतांना त्या लिहितात...
तोंडात कवळी कधी आली,
दातांनी संप पुकारला तेंव्हा.
डोळ्यावर चष्मा कधी आला,
दिसेनासे झाले तेंव्हा.

असेच मिश्किल भाष्य त्यांनी पांढरे केस, लडखडणारे पाय, तोतरेपणा, इ. वर केले आहे याच पठडीतली आजीबाई कविताही मनोवेधक आहे. विसाव्या शतकातील स्त्री या दमदार कवितेत त्यांनी गार्गी, मैत्रेयी, सावित्री, सुनिता, कल्पना, इंदिरा, प्रतिभा, सानिया, मल्लेश्वरी, मनिषा (वैमानिक) या स्त्रियांचा यथोचित गौरव करून स्त्री महात्म्य पटवून स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध लढण्याचे संकेतही दिले आहेत.
कवयित्री ह्या बालपणी वडिलांच्या बरोबर राष्ट्र सेवादलाच्या शिबिरात जात असल्याने समाजवाद, राष्ट्र सेवादल, एस. एम. जोशी हे त्यांच्या काव्याचे विषय होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे या काव्यसंग्रहात एस. एम. जोशी, साने गुरुजी, श्याम, समतेचे पुजारी, आनंदवन इत्यादी उत्कृष्ट समाजसेवी कविता समाविष्ट झालेल्या पाहणेस मिळतात. जगात समता भाव पसरेल या बद्दलचा आशावाद प्रकट करतांना त्या लिहितात -
असावी सगळीकडे शांती, सद् भाव
मानू नये कसलाच भेदभाद
वाढीस लागता बंधुभाव
सगळीकडे पसरेल समताभाव

त्यागी, संयमी, संघर्षमय, अन्याया विरुद्ध आयुष्यभर झगडणारे व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आद्य प्रणेते श्री. एस. एम. जोशी या थोर विभूती बद्दल लिहितांना त्यांच्या लेखणीस बहर येतो व त्या लिहितात -

एक नेता धडपडत होता
मरणयातना सोसत होता
जोम कार्याचा नसा - नसात भिनला
शीतल वाणीचा शिडकावा झाला

महाराष्ट्राचे लाडके शिक्षक साने गुरुजी यांच्या बद्दलही त्यांनी अशाच भावविभोर कविता लिहिल्या आहेत.

स्वत: कवयित्री शिक्षक असल्याने शिक्षण क्षेत्र कसे वावडे राहणार? या विषयावरही त्यांनी परीक्षा, पर्यवेक्षक, विनाअनुदानित शिक्षक अशा तीन छान कविता लिहिल्या आहेत. विनाअनुदानित शिक्षक या कवितेतील प्रत्येक अक्षर एकेका ओळीच्या सुरुवातीला घेऊन एका वेगळ्या काव्य रचनेची सुरेख झलक त्यांनी दाखविली आहे.

या काव्यसंग्रहातील सुमारे ९ प्रेम कविताही दर्जेदार अशाच आहेत. दुर्दैवाने १३ वर्षापूर्वी त्यांच्या पतीचे अपघाती निधन झाले त्यातून कटुसत्य, मनातील वेदना ह्या हृदयाला चिरणा-या कविता निर्माण झाल्या आहेत. त्याबद्दलची सल पुढील ओळींतून दिसून येते.

प्रीत माझी शोधते तू कुठे?
मन ते बेचैन होते
वाट यशाची बिकट
तरीही मी चालते.
तर ‘वेडं मन’ या प्रेम कवितेत व्यक्त झालेल्या ह्या काही ओळी -

अधरकमल हे थरथरले
वेडे मन हे बावरले
साठले डोळ्यातील भाव उरी
रूप पाहुनी तुझे हे भारी

कवयित्रीच्या ‘मनाला दुष्काळातील जनावरांचे हाल व बळीराजाचे होणारे अतोनात हाल’ चटका लावून जातात.

शेतकरी राजा मी जनतेचा पोशिंदा
माझ्याच जगण्याचा आता, झालाय की हो वांदा
या अगतिक शेतक-याची अगतिकता मग कुठवर पोहचते पहा -

मीच माझ्या चुकीवर पांघरूण मग घालतो
उपाय शोधायचे सोडून जगाचाच निरोप घेतो

शेतक-याची ही अगतिकता दाखविल्यावर ‘पशुधना’ बद्दल लिहितांना, दुष्काळाचा उल्लेख करतांना त्या लिहितात -

ना चारा, ना पाणी
जनावरे झाली दीनवाणी
कोरड पडली नदीला
महाग झाली पाण्याला

आणि मग काळजाचा थरकाप उडविणा-या ह्या ओळी वाचकांच्या डोळ्यात पाणी उभे केल्याशिवाय राहत नाहीत -

शेती झाली भकास पाण्याविना
ओसाड झाला गोठा तुझ्याविना
दगड ठेवुनी काळजावरी
धाडलं तुला कसाबा घरी

क्षारपड, वर्ल्ड ट्रेड सेंटर, आनंदवन, मोलकरीण, सत्ता, समता ह्या कवितांमधून सामाजिक प्रश्नांचे भान व जाण असलेले कवयित्रीचे मन किती संवेदनशील आहे हे दिसून येते. हळदी कुंकू, मनीमाऊ, आले गं ह्या सारख्या खुसखुशीत कविता मनाला आनंद देऊन जातात.

वरील कविता प्रमाणेच वास्तव जग, ध्येयवेडी चांदणी, वर्ल्ड कप, मरणाच्या भेटीला, मरणोत्सव, आले गं, टिकोजीराव, महत्वाकांक्षा ह्या कविताही मनोवेधक व भावगर्भ आशय असणा-या आहेत.

सारांश - भावतरंग या कवितासंग्रहात अनेक विषयांना कवयित्रीने स्पर्श केला आहे. मनात जोरात निर्माण होणारे भाव काव्य रूपाने कागदावर तरंगत आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ‘भावतरंग’ हे नांव त्या दृष्टीने अतिशय समर्पक आहे यात तिळमात्र शंका नाही. कवयित्रीला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

- (ज्येष्ठ समीक्षक)


यावर अधिक वाचा :

स्वातंत्र्याचा अर्थ

national news
स्वातंत्र्याची 72 वर्षे पूर्ण करताना भारतीय नागरिक म्हणून आनंद, अभिमान नक्कीच वाटतो, ...

15 ऑगस्टपासून 301 रेल्वेच्या वेळेत बदल

national news
उत्तर रेल्वेने एक-दो नव्हे तर 301 रेल्वेच्या वेळेत बदल केले आहेत. नवीन वेळापत्रक 15 ...

पुण्यात कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, खाती हॅक, 94 कोटींचा

national news
पुणे- पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्यलयाचे सर्व्हर हॅक करून तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये ...

स्वातंत्र्यदिन आणि आपण

national news
15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन म्हणून आपण साजरा करतो. 1947 साली भारतभूमी ब्रिटिशांच्या ...

शिवराम हरी राजगुरू

national news
शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म १९०९ मध्ये पुणे जिल्ह्यातील खेड गावात झाला. काशीत संस्कृत व ...