testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दीपोत्सवातून काव्यप्रेरणा..

book review
Last Modified मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016 (11:31 IST)
दिवा दीपोत्सव २०१६ हा नव कवी आणि अभिजात कवींची मांदियाळी, कवितांचा दीपोत्सव प्रकाशित होतांना रसिक काव्यप्रेमी, अभ्यासू, चोखंदळ वाचकांना साहित्य मेजवानी दिवाळी अंकाच्या निमित्ताने प्राप्त झाली आहे. विश्वव्यापी २०१६ कवितांचा एकाच दिवाळी अंकात समावेश करून एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित करणारे कवितासागर प्रकाशन संस्थेचे संस्थापक व प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील जेव्हा या विश्वविक्रमी विशेषांकाचे अतिथी संपादकीय लिहिण्यास आग्रह करतात, मला तो सन्मान प्राप्त करून देतात तेव्हा त्यांच्या कार्यास हातभार लावण्यास मिळालेल्या संधीला मी लगेच होकार देऊन लिहिण्यास सुरुवात केली. १०८ वर्षाच्या दिवाळी अंकाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा, सर्वात महाग, सर्वात जास्त कवितांचा आणि कवींचा समावेश असलेला व संपूर्णपणे जाहिरात विरहित प्रकाशित होणारा एकमेवाद्वितीय असा दिवाळी अंक ठरला आहे. डॉ. सुनील दादा पाटील यांच्याबाबत मी असे म्हणेन - ‘दिप दाविला तुवा प्रेषिता - उजाळाया तमा’

कवितांच्या अथांग सागरास...
कमल पत्रासम अलिप्त ध्येय ठेवुनी, सागर तरुनी जावे पैलतीरी |
स्वानंदरुपी ज्ञानामृत प्राशण्या, चिंतनी असो शाश्वत तत्त्वे सारी ||


च्या निमित्ताने अनेक क्षेत्रातील, व्यवसायातील, सर्व वयोगटातील आणि भिन्न विषयांशी निगडीत असलेल्या कवींच्या लेखणीला लिहितं करण्याचं महानकार्य, कवितासागर प्रकाशन संस्थेकडून होत असल्याचा आनंद भव्य - दिव्य असाच आहे. प्रत्येक कविता रस, गंध, स्पर्शाने नटलेली आहे. अनंत विषय हाताळून कविमनाचे अविष्कार काव्यातून झालेले दिसतात. समाजाभिमुख होऊन हृदयाला भिडणा-या कवितांचा समावेशही त्यात आहे. अनंत भाव विविध कवितांमधून आविष्कृत होतांना त्यातील विविधता वाचकांना आनंद देणा-या आहेत. लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद नाहीसे करून सुख, शांतीचा संदेश देणा-या, मनाची समृद्धता वाढविणा-या उत्तमोत्तम कविता या दिवाळी अंकात समाविष्ट आहेत.


सौंदर्य मग ते कोणत्याही स्वरूपाचे असो त्याचा मनसोक्त आस्वाद घेणा-या, मनात रुंजी घालणा-या कविता. नाट्यपूर्ण अनुभव आणि भावोत्कट आविष्करण करणा-या कविता दिवाळी अंकात आहेत. प्रत्येक कवितेचा आशय - विषय, शैली यांची विविधता प्रत्ययास येते मुक्तछंद असूनही आशयगर्भित, अंतर्मुख करणा-या, संवेदनांना साद घालणा-या कविता, हळव्या, भावविवश आणि तरळ स्वरूपाच्या कविता, स्नेह - मैत्री सुख - दुःखाचे चढ उतार, आनंद - दुखांचा आवेग त्याच बरोबर तीक्ष्ण, दाहक, जळजळीत अनुभवांचे शब्दरूप प्रगटीकरण काव्यातून होत असलेले, मानवी मनातील स्पंदने कधी स्थिर तर कधी हेलावणारे तर कधी उचंबळून येणारे आहेत तर कधी मनाला जखमेप्रमाणे वाटणारी ठसठसणारी तर कधी कविमनाला कासावीस करणारी शब्दरचना दृश्यमान होतांना दिसते. जिवंत अविर्भाव व्यक्त करणा-या कविता, चैतन्य निर्माण करणा-या तर काही कविता सध्या, सोप्या, प्रामाणिक, उत्कटता, वात्सल्य व्यक्त करणा-या, भक्तीपूर्वक, परमेश्वराला आळवणी घालणा-या संत महात्म्यांची भक्ती - श्रद्धा - त्याची ओढ, आस, आतुरता या शब्दरूप भावतरंग, उत्कटता व्यक्त होतात...


‘उन्मनीच्या सुखाआंत | पांडुरंगी भेटी देत ||
पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी | जागृती स्वप्नी पांडुरंग ||’


ही अवस्था कवी मनाची कशी होते याचा भाव व्यक्त करण्यास कवी शब्दांची जुळवा-जुळाव करतांना भावविवश कसा होतो वाचकांच्या मनाचा ठाव कसा घेतो हे वाचनीय ठरते. ग्रामीण शब्दरचना वाचकांना अधिक जवळकीची वाटावी, सहज मनात रेंगाळावी, काव्यातील माधुर्य आणि गेयता चिरस्मृतीत रहाव्या अशा, तर काही कविता भ्रष्टाचार, राजकारण, फसवणूक या बरोबरच निसर्गकोप, दुष्काळ, हवालदिल शेतकरी, असहाय्य सामान्य नागरिक तर कधी जाज्वल्य देशभक्ती, समर्पणाची भावना व्यक्त करणा-या तर कधी आपले सगेसोयरे, हेवे-दावे तर कधी जन्मादात्यांचे उपकार, त्यांच्या बद्दलचा आदर, कर्तव्यभावना अनेक कवितांमधून डोकावतांना दिसतात.
माणसास होणा-या व्याधी, मानसिकता, भ्रुणहत्या इत्यादी विषय काव्य लेखनात पोटतिडकीने शब्दरूप देणारा कवी निदर्शनास येतो. स्तुत्य आणि अभिनंदनीय असा हा दिवा दीपोत्सव म्हणजे नवकवी, अभिजात कवी, व्यासंगी कवी यांना प्रेरणा देणारा, प्रोत्साहित करणारा असून हे एक नवे विचारपीठ निर्माण करून देणारा दिवाळी अंक आहे. ओजस्वी आणि भावपूर्ण काव्याची निर्मिती व्हावी, नवकवींच्या लिखाणास संधी मिळावी, मानसन्मान व्हावा, त्यांच्या काव्याचे मुल्यांकन होऊन त्यांना न्याय मिळावा या उदात्त भावनेने ‘कवितासागर’ ने उचललेले हे पाऊल नक्कीच यशदायी, फलदायी ठरणार यात शंकाच नाही. दिवा दिपोत्सवाचा मनमुराद आस्वाद घेता यावा म्हणून ही सगळी पराकाष्टा...कवितेच्या वाटेवरील पांथस्तांना दिलेली ही अनमोल भेट ठरावी. काव्य लेखनाची ही सर्वांगीण समीक्षा काव्य रसिकांना विशेषतः साहित्याच्या अभ्यासकांना उदबोधक ठरेल ही अंत:करणापासून शुभेच्छा.


शब्द शोधी शब्द जाणी शब्दसंगे चाल भाई |
शब्द आकाश शब्द पाताळ शब्द पिंडी ब्रम्हांडी राही ||


शब्द वाणी शब्द कानी शब्द मूर्ती विचार चिंतनी |
शब्द वेड शब्द नाद शब्द शास्त्र नीट गात राही ||


शब्द यंत्र शब्द मंत्र शब्दही गुरुपदेश गाई |
शब्द तत्त्व शब्द संसार शब्द आकार निराकार राही ||


शब्द पुरुष शब्द नारी शब्द ब्रम्हा विष्णू महेश राही |
शब्द प्रकट अप्रकट ओंकार ब्रम्ही या निनादात राही ||


शब्द शब्दा पारखून घेई सांगे कबीर शब्दही भगवंत भाई...


- वाचक संवाद


प्रत्येकाने आयुष्यात कळत न कळत एखादी तरी कविता केलेली असते. जी न कळत होते तीच तर खरी कविता असते म्हणूनच साहित्य ही जीवनाची एवढी साधी, सोपी, सरळ आणि भावसुंदर अभिव्यक्‍ती असते. साहित्य हे ज्ञान व दिशा देण्याचे काम करते. अलीकडच्या काळात मोबाईल आणि संगणकामुळे मुले साहित्य व नीतिमत्तेपासून दूर जात आहेत.


कविता ही मुलभूत व खोलवर परिणाम करणारी व त्यामुळेच सर्वश्रेष्ठ साहित्य प्रकार मानला जातो. इतर कोणत्याही साहित्य प्रकारापेक्षा कविता ही अधिक स्पंदनशील असते. ती प्रामाणिकपणे लिहिणा-या प्रतिभावंतालाच वश होते. मनात आलेले भाव सहजपणे शब्दात गुंफून कविता लिहिल्या जातात आणि अशाच कविता चिंतनपर होतात. रोजच्या जगण्यात मानव, निसर्ग, समाज आणि मानवाचा मानवाशीच चाललेला संघर्ष ह्यामुळे व्यथीत झालेले व्यक्तित्व आणि त्याचा स्वतःच्या जीवनाशी असलेला संबंध शोधणे आणि या सर्व भावनिक वादळांना झेलून कवितेत प्रसन्नता आणणे हे काम ही कविताच करते. जगण्याचा संदर्भ न हरवता जगण्यावर प्रेम करणे हेच दिवा दीपोत्सवच्या निर्मितीचे सूत्र आहे.सर्व कवी बंधू - भगिनींना काव्यलेखनात अधिक यश लाभो व त्यांचे हातून कसदार काव्य निर्माण होवो आणि जन - सामान्यांच्या हृदयात आदर - सन्मानाचे भाव अढळ राहो ही सद् भावना...


यावर अधिक वाचा :