शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 (11:41 IST)

पुस्तक परिचय : घुसमट

एक दर्जेदार हृदयस्पर्शी कवितासंग्रह…
 
घराघरातून जाते हद्दपार झाले आणि जात्यावरच्या ओव्या हरवल्या. दळणकांडण संपले आणि त्याअनुषंगाने येणारी गाणीही कालौघात मागे पडली. परिणामी श्रम नावाची संकल्पनाच घरातून दूर जात आहे. त्यासाठी चालू काळात प्रत्येक माणसाने साहित्याचे वाचन करणे आवश्यक आहे. आपल्या देशाचा इतिहास हा साहित्यिकांमुळेच जिवंत आहे.
 
कोटयावधी जगतात जीवाणू, जगती अन मरती, .... जणू ती गवताची पाती.
 
या जगात अनेक माणसे, जीव जंतू जन्माला येतात कसे तरी जगायचं म्हणून जगतात आणि मरूनही जातात, त्यांचे नामोनिशाणही मागे राहत नाही. पण काही लोकांना वाटते की ज्या समाजात आपण जन्माला आलो, ज्या समाजात आपण राहतो, वावरतो, बरे वाईट अनुभव घेतो त्या समाजासाठी काही तरी करून आपली आठवण मागे ठेवावी या हेतूने अशी अनेक माणसे विविध प्रकारे समाजसेवा करतात, अशाच उदात्त हेतूने प्रेरित होऊन, समाजात वावरत असतांना आलेल्या कडू गोड आठवणींच्या जोरावर कवी देवगोंडा बाबू चिपरगे यांनी कवितेच्या स्वरुपात समाजातील व्यंगावर, समस्येवर नेमके बोट ठेवून त्यावर उपाय शोधण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे.
 
पूर्वीपासूनच त्यांना कवितेच अंग आहे. कवी चिपरगे विविध विषयावर कविता करून आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देतात. आज पर्यंत त्यांनी शेकडो कविता लिहिलेल्या आहेत, त्यांनी सर्व प्रकारची काव्य शैली वापरली आहे. काही प्रसंगी स्वतःची अशी नवी शैलीही निर्माण केली आहे, ती म्हणजे, कवितेतील प्रत्येक ओळीतील पहिले अक्षर एकत्रित केल्यास एक उदबोधक संदेशपर वाक्य किंवा कवितेचे शीर्षक तयार होते. उदाहरणार्थ ‘संध्याकाळच्या मित्रानो, या उतार वयात संयम ठेवून वागा',  'जगवाहो स्त्रीभ्रूणाला', 'जुने ते सोने नेमके तेच हरवले आहे' अशी अनेक उदाहरणे देत येतील.
 
कवी डी. बी. चिपरगे हे रत्नाकर बँकेत अधिकारी / शाखाधिकारी म्हणून नोकरी करीत असतांना खूप ताणतणाव, मानसिक त्रास त्यांना सोसावा लागला. सेवा निव्रृती नंतरच्या काळात त्यांच्या प्रतिभेला विशेष धार आल्याचे जाणवते.
 
कवी डी. बी. चिपरगे यांनी समाजामध्ये दुर्लक्षित राहिलेल्या पण जनमनावर परिणाम करणा-या घटनेवर निर्भीडपणे कविता रचून त्या घटना प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ - 'गोध्रा हत्याकांड' या कवितेत त्यांनी 'राम सेवकांच्या' हत्याकांडातील कौर्य अतिशय समर्पक शब्दात व्यक्त केले आहे. आपण दूरदर्शन माध्यमामध्ये फक्त गुजरातच्या दंगलीचाच विचार करतो व एका ठराविक वर्गाला, व्यक्तीला दोष देवून गेली ११ - १२ वर्षे त्यांची निंदानालस्ती करतो पण त्या गुजरात दंगलीला कारणीभूत असलेल्या गोध्रा हत्याकांडाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो, त्याला वाचा फोडण्यासाठीच 'गोध्रा हत्याकांड' ही कविता त्यांना सुचली असेल असे मला वाटते. 
 
सध्याच्या अश्लीलतेकडे पूर्णपणे झुकलेल्या चित्रपटाविषयी लिहितांना कवी 'कुणाला काय बोलायचं' या कवितेत म्हणतात -                                      
भेटून खेटून चाटून नि रेटूनच चालायचं सगळं I 
देहाच्या चादरीला वासनेची ठीगळेच ठिगळं II 
 
खरच किती नेमक्या शब्दात यमक जुळवून, आजच्या चित्रपटाविषयी परखड मत व्यक्त केले आहे.
 
आजच्या राजकीय गैर व्यवस्थेवर लिहितांना, आसपास बलात्कार, खून, दरोडे पाहून व स्वातंत्र्यानंतर सुराज्य येईल या त्यांच्या अपेक्षांची उडालेली दैना पाहून कवी म्हणतात -
 
स्वातंत्र्याचे रंगवलेले स्वप्न लागले असे विरु I 
बलात्कार, घोटाळे पाहून काळीज लागे इथं चिरू I I 
 
कवीचे मन मृदू मुलायम आहे हेच वरील शब्दातून दिसते, पण ते निराश होत नाहीत कारण आशेचा किरण त्यांना दिसतो व ते म्हणतात -
               
काटेरी बाभूळ वाढले देशवासी लागले झुरू I
धरुनी आशा करिती प्रतीक्षा फुलेल कधीतरी कल्पतरू I I 
 
यावरून कळते की कवी चिपरगे यांच्या कविता निव्वळ समस्या मांडणा-या, व्यंग दाखवणा-या नैराश्यजनक नाहीत, तर माणसांच्या मनातील अंगार फुलवून आशेचा किरण दाखवणा-या मार्गदर्शक व हृदयस्पर्शी अशाच आहेत.
 
सध्याच्या राजकारणात खोटी आश्वासने देवून जनतेला भुलवून आणि भावनिक आवाहन करून काही नेते निवडून येतात व पाच वर्षे जनतेच शोषण करून गलेलठ्ठ होतात; म्हणूनच कवीचे मन खवळून उठते व ते मतदार राजालाच जागे करण्याचा प्रयत्न करून म्हणतात -
 
दुध साय - लोणी खाऊन ताक तुला ठेवलं आहे I   
मतदारा तू जागा नाहीस म्हणून याचं फावलं आहे I I 
 
आपल्या देशामध्ये अनेक सामाजिक समस्या आहेत त्यापैकीच एक म्हणजे दारूचे व्यसन व दुसरे परस्त्रीगमन ! आजही फक्त खेडयापाड्यातच नव्हे तर स्वत:ला सभ्य, सुसंकृत, पुढारलेले म्हणवून घेणा-या शहरी भागात देखील या दोन व्यसनांनी अनेकांचे संसार उघड्यावर पाडले आहेत. या विषयी लिहितांना कवी नेमक्या शब्दात म्हणतात -
 
बाई आणि बाटली कुणाला भेटली, पहिल्या पहिल्यांदा बरीच वाटली I 
भरलेली तिजोरी खलास लुटली, संसाराची गंगा मध्येच आटली I I 
 
कवी चिपरगे यांनी 'कायदा मागतो पुरावा' या कवितेत सध्याच्या न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत म्हणतात -
 
मोठी चोरी होवून जाते
बलात्कारिता विव्हळ होते
खाकी वर्दी मागून येते
मग आरोपी कसा धरावा
कायदा मागतो पुरावा
 
आपली भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ट आहे. पण आजकाल पाश्चिमात्याचे अंधानुकरण करण्यात धन्यता मानणारी तरुण मुले मुली स्वैर वागत आहेत. बंधू प्रेम, मातृ - पितृ प्रेम लोप पावून 'सख्खा भाऊ' पक्का वैरी बनत आहे व वृद्ध आई वडिलांना वृदाश्रमाची पायरी चढावी लागत आहे, संस्काराचे हे अध:पतन शब्दात मांडताना कवी लिहितात -
 
इमल्यास नाव देती 'ही' मातृ - पितृ छाया
परी नाही तुला थारा घडीभर तिथं बसाया
वृदाश्रमीचा रस्ता अंतिम श्वास घ्याया
 
माणसा माणसामध्ये निर्माण करण्यात आलेले कृत्रिम भेदभाव नाहीसे करून भारताची खरीखुरी एकात्मता साध्य करण्याची गरज आज निर्माण झालेली आहे. कारण जातीय दंगलीचे अनेक महाभयानक चटके आपण सहन केलेले आहेत. यासाठी कवी चिपरगे आपल्या 'गिरवा माणुसकीचा धडा' या कवितेत संदेश देतात -
 
जातीपातीच्या पाडा भिंती
वाजू दे चौघडा
गिरवा माणुसकीचा धडा
 
अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा यांना कडाडून विरोध करून सामाजिक मनपरिवर्तन व्हावे या उदात्त हेतूने प्रेरित होवून कवी डी. बी. चिपरगे यांनी काही कविता लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये 'होळी' सणामध्ये विनाकारण होणारी वृक्षतोड, जाळपोळ, अन्नाची नासाडी, शिवीगाळ इत्यादी पाहून कवीचे मन विषन्न होते व शब्द बाहेर पडतात...
 
होळीमध्ये टाकून पोळी, थाळी होई मोकळी
करा साजरी होळी नव्याने, करा साजरी होळी
स्त्री जातीला लक्ष्य करोनी, आळविता कडू अभद्र गाणी
विटाळता का पवित्र वाणी,   करणी जगा वेगळी.
 
अशा प्रकारे विविध विषयावर, समस्यावर कविवर्यांनी शेकडो कविता, विविध छंदात, यमक जुळवून, निर्भीडपणे लिहिल्या आहेत, पण त्या कवितांना योग्य वेळी प्रसिद्धी मिळाली नाही, कारण आजकाल अनेक ढोंगी, कामचलाऊ माणसे पैशाच्या जोरावर आपलेच घोडे पुढे दामटतात व अस्सल प्रतिभावंत लोक मागे फेकले जातात हीच गोष्ट कवीच्या वाटयाला आली असावी म्हणूनच आपली ही खंत व्यक्त करतांना कवी म्हणतात -
 
जो प्रतिभावंत आहे, नित्य त्याच्या यशाआड, स्वकीयांची भिंत आहे.
 
ज्याचे बोलणे रोखठोक
अंत:करण ज्याचे चोख
वेडा म्हणती त्याला लोक
त्याला व्यासपीठ मिळत नाही
तरीही तो चळत नाही
सत्यापासून ढळत नाही
म्हणूनच तो जिवंत आहे.
 
कवी चिपरगे यांना कविता प्रसिद्ध करण्यासंदर्भात व कवितासंग्रहाच्या प्रकाशनाबाबत अनेकांनी निव्वळ आश्वासनेच दिली. अनेक वर्षे अस्सल शब्दाने नटलेल्या, ह्या कवितेच्या गाठोडयाचं काय करायचं हा विचार कवींना सतावत होता.  स्वतःला आनंद देवून दुस-याना प्रेरणा देणा-या ह्या कविता लेखनाचा छंद अविरत जोपासला व गीतेतल्या 'कर्मण्ये s वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' या उक्तीप्रमाणे फळाची अपेक्षा न धरता कर्म करत राहिले. व त्याचे फळ त्यांना उशिरा का होईना पण मिळाले. जयसिंगपूर येथील कविता सागर प्रकाशनचे कार्यकारी संचालक - डॉ. सुनील पाटील यांनी कवी चिपरगे यांच्या कविता प्रकाशनाची जबाबदारी उचलली व कवी चिपरगे यांच्या कवितांना पुन्हा उभारी आली.
 
डॉ. सुनील पाटील म्हणजे एक अभ्यासू, हरहुन्नरी, धडपडी, उत्साही, प्रेरणादायी व्यक्तिमत्व. अनेक नवकवींना व साहित्यिकांना अंधारातून उजेडात आणणारे मार्गदर्शी वाटोडया! डॉ. सुनील पाटील यांचे कार्य व उद्दिष्ट खरचं महान आहे, ते व त्यांच्या सहका-यांनी कवी चिपरगे यांच्या कविता प्रकाशित करण्याचे शिवधनुष्य उचलून त्यांच्या कवितांना न्याय देण्याचे कार्य केले आहे व महाराष्ट्रातील जनतेला एक वाचनीय, मननीय व प्रेरणादायी कवितासंग्रह अर्पण करून दिव्य काम केले आहे. 
 
कवी चिपरगे यांच्या कविता म्हणजे एक विचार प्रवाह आहे. या विचार प्रवाहांना एकत्रित करण्याचं धाडस डॉ. सुनील पाटील यांनी केले त्यामुळे त्यांच्या धाडसास सलाम केल्याशिवाय राहवत नाही. डॉ. सुनील पाटील यांनी माझ्या सारख्या एका सर्वसामान्य, प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या नवकवी कडून हिमालयएवढ्या विचारांच्या कवितासंग्रहास अनुसरून रसग्रहण वजा थोडे फार लिहिण्याची विनंती केली हेच मी माझं भाग्य समजतो.
 
खरचं कवी डी. बी. चिपरगे यांच्या कविता अति उत्कृष्ट आहेत. वाचकांना हा कवितासंग्रह निश्चितच आवडेल यात शंकाच नाही. कवी चिपरगे यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व त्यांचे आयुष्य सुखासमाधानाचे व उत्तम आरोग्याचे जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो. 
 
घुसमट हा कवितासंग्रह ‘बुक गंगा’ या लोकप्रिय वेबसाईटवर ई-बुक स्वरुपात प्रसिद्ध झाला असून त्यास जगभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून कवितांचे सर्वत्र स्वागत झालेले आहे. घुसमट हे त्याच्या साहित्यिक दर्जामुळे प्रत्येक विद्यार्थी आणि सामान्य वाचकांसाठीही संग्रहणीय असे ठरले आहे.
 
'उभवा देशभक्तीची गुढी' या त्यांच्या कवितेतील शेवटच्या काही ओळीने या लेखाला विराम देत आहे.
 
पेटूनी उठू द्या ! पुन्हा देश हा सारा
डौलाने फडकत राहो, 'तिरंगा' प्यारा
घेऊनी प्रेरणा, गाठा ध्येयकिनारा
नवी पिढी घडविण्या, सार्थकी लावा मानव कुडी
उभवा देशभक्तीची गुढी…