शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 (17:09 IST)

मनाला मोहणारा : मारवा

"लेखन ही एक वृती आहे, इतकेच नव्हे पण त्यात सूक्ष्म आणि सुंदर अशी एक निवृत्ती ही आहे." प्रस्तावनेतील या ओळी वाचून समजून येते की जयश्री जोशी यांचे हे लिखाण वर वरचे नसून अनुभवांच्या आधारे अगदी निवांत केलेले साहित्य सृजन आहे.
 
कथा, नेहमीच वाचकांना आकर्षित करतात. पण कथेत पकड पाहिजे, वाचकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली पाहिजे... कथेत एक प्रवाह पाहिजे... आणि सर्वात मुख्य म्हणजे ती कथा कुठेतरी आपलीशी वाटली पाहिजे.. 
 एका सफल कथेचे सारे गुण मला "मारवा" या कथा संग्रहात आढळले आणि म्हणूनच या संग्रहातून रोज एक कथा वाचायची असे ठरवले. 13 दिवसात 13 कथा वाचून काढल्या, किंवा असे म्हणायला हवे की 13 दिवसात 13 सकारात्मक व्यक्तिमत्त्वांच्या मी प्रेमात पडले. ती माणसे मला आपलीशी वाटू लागली. डाॅ. अनिकेत ने छेडलेला मारवा मनात घर करून गेला. स्वतः चे अस्तित्व टिकवून स्वकर्तृत्वबळावर जगणाऱ्या अमृता दिक्षित चे कौतुक करावेसे वाटले. 
 
बदललेल्या संदर्भातील 'ती' अगदीच जवळची वाटली. म्हातारी माणसे सर्वांकडे असतात, पण त्यांना न दुखावता सांभाळणे हे घरच्या बाई साठी एक आह्वान असतं.  'कळतं पण वळत नाही' असे आपण म्हणतो नं... तेच. कमालीचे "पेशन्स" पाहिजे. 
 
अनाथाश्रमातून पळून आलेल्या आणि कुणा दादाच्या अड्ड्यात अडकलेल्या मुलाला जगण्याचा अर्थ कळला, नकळतच डोळे पाणावले... 
 
एक एक कथा म्हणजे एक एक आयुष्य! या जगात कोणाच्या आयुष्यात काय चालले आहे आपल्याला माहीतच नसते, प्रत्येक मनुष्य एक लढा लढतोय.. आणि प्रत्येक माणसाकडून आपण काहीतरी शिकू शकतो ही अनुभूती होते या कथा वाचून. 
 
मग तो 'फिनिक्स' पक्ष्यासारखा पुन्हा नव्याने उभा राहणारा नवनीत शेट असो वा रवींद्रला शोधण्यात स्वतः ला हरवून बसणारी रेखा असो... दोघां विषयी आदर वाटला. 
 
दुनियाची पर्वा न करणाऱ्या मिसेस पंडित पण आवडल्या, "दिसतं तसं नसतं" सांगून गेल्या. 
आई वडिलांच्या प्रेमाला आसुसलेल्या रवीला भेटून गहिवरून आले आणि "तर्पण" या कथेतील मुन्नासेठला भेटून असे वाटले की जगात चांगली माणसे आहेत, म्हणूनच हे जग चाललंय... 
'नियतीचा न्याय' मधल्या अद्वैताला भेटून मनात एक रिक्तता निर्माण झाली.. ती म्हणते, "क्षितिज! जिथे पृथ्वी आणि आकाश एक होताहेत असे वाटते ते ठिकाण!....... नुसता भास, काही नाती देखील अशीच असतात, या भासा सारखी, दिसायला अगदी खरी, अतूट वाटणारी, पण प्रत्यक्षात जीवघेणी, फसवणूक करणारी. "
शेवटी तिने भेटायला हवे होते त्या तिघांना, मला त्या तिघांचे ही पडलेले चेहरे बघायचे होते, पण ती नायिका होती, विशाल हृदयाची! 
 
'चुकलेली वाट'... शांतनूसारख्या हसऱ्या, आत्मविश्वासाने भरलेल्या आणि खरे निखळ मन असलेल्या व्यक्ती ची प्रेमकथा नेहमीच अर्धवट राहाते का??? 
डॉ. भटनागर सारख्या कर्तृत्ववान चिकित्सकांच्या मनात केवढी घालमेल चालत असेल! 'मर्सी किलिंग' सारखी गोष्ट वाचून समजू शकतो आपण! 
 
'अस्तित्व' ही तर 'घर घर की कहानी' आहेच,  पण ही जाणीव योग्य वेळी व्हायला हवी, असे मला वाटते. 
एकूण प्रत्येक कथा आपल्याला काहीतरी विचार करण्यास भाग पाडते. खूप साध्या सोप्या सरळ शब्दांत कथांची मांडणी केली आहे. कथांना वास्तविकतेची झालर आहे, अनुभवांचा आधार आहे, आणि सकारात्मक किनार आहे. 
एखाद्या निराश वातावरणात आशेचे सूर छेडणारा हा "मारवा" नक्कीच संग्रहणीय आहे. पुस्तक शॉपिज़न, अमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध आहे. 
 
लेखिकेचे मनापासून अभिनंदन आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा! 
 
पुस्तकाचे नाव: मारवा (कथा संग्रह) 
प्रकाशन: शॉपिज़न प्रकाशन
पृष्ठ संख्या: 100
किंमत: 165/-
 
©ऋचा दीपक कर्पे