testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बौद्ध तत्त्वज्ञानातील धार्मिक संप्रदाय

- डॉ. उषा गडकरी

वेबदुनिया|
बौद्ध धर्माच्या प्रसारानंतर त्याच्या अनुयायांत दोन तट पडले. ते तात्त्विक असण्यापेक्षा धार्मिकच जास्त होते. बुद्धाच्या महानिर्वाणानंतर सुमारे 100 वर्षानंतर बुद्धाचा उपदेश नेमका काय होता हे ठरविण्यासाठी एक परिषद (संगिती) भरवली गेली. त्यात एका पक्षाने बुद्धाच्या वचनावर भर दिला. नैतिक आचरणाने आणि ध्यान वगैरे साधनांनी प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या प्रयत्नाने स्वत:करिता निर्वाणपद मिळवावे अशी बुद्धाची शिकवण होती असे त्या पक्षाचे मत होते. हे लोक स्थविरवादी वा थेरवादी या नावाने ओळकले जाऊ लागले. त्याच्यातूनच पुढे हीनयान नावाच्या धार्मिक पंथाची सुरूवात झाली.
दुसर्‍या पक्षातील लोकांनी बुद्धवचनांचा अर्थ थोड्या व्यापक रितीने लावण्याची मुभा घेतली. ठिकठिकाणच्या लोकसमुदायाचे आचार-विचार व समजुती त्यांनी बुद्ध धर्माच्या चौकटीत बसविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बुद्ध धर्माचे सामाजिक अधिष्ठान व्यापक झाले. या लोकांना महासांघिक असे नांव पडले. यातूनच पुढे महायान पंथाचा उदय झाला. हीनयान व महायान या दोन पंथातील ठळक फरक पुढीलप्रमाणे सांगता येतील.

1. स्वत:च्या प्रयत्नाने निर्वाण म्हणजे अर्हत -पद मिळविणे हे ध्येय हीनयान पंथाने व्यक्तीपुढे ठेवले. 'जगातील सर्व गोष्टी नाशवंत आहेत, म्हणून स्वत:च्या निर्वाणासाठी प्रयत्नशील आणि जागरूक रहा'. या बुद्धाच्या अखेरच्या शब्दावर हीनयान पंथाने भर दिला आणि स्वत:चे निर्णान परमसाध्य मानावे अशी शिकवण दिली. याच्या उलट सर्व प्राणिमात्रांच्या निर्वाणासाठी व्यक्तीने प्रयत्नशील राहिले पाहिजे अशी महायान पंथाची शिकवण आहे. स्वत: बुद्धाने आपल्या ‍चरित्राने जो धडा घालून दिला तोच आपण गिरवावा असे या पंथाने शिकवले. प्रत्येक 'बोधिस्तव' हा आदर्श आपल्या पुढे ठेवला पाहिजे. बोधिसत्व म्हणजे मूर्तिमंत करुणा, मूर्तिमंत प्रज्ञा. त्याकरिता अनेक जन्म घ्यावे लागले तरी चिंता नाही. 'यान' म्हणजे वाहन. 'महायान' म्हणजे अनेक लोकांना वाहून नेण्यास समर्थ असे वाहन. लोकांचे समुदायाचे समुदाय निर्वाणाप्रत नेण्यास आपला पंथ समर्थ असल्यामुळे त्यांनी आपल्या पंथास महायान म्हटले. हीनयान मात्र एकाच व्यक्तीच्या निर्वाणाची भाषा करीत असल्यामुळे त्यास हीनयान म्हटले आहे. 'हीन' याचा अर्थ 'लहान' असा होतो. परंतु त्यात तुच्छतेचाही अंश आहेत. आमचे ध्येय सर्व प्राणिमात्रांना सामावून घेणारे म्हणून उच्च, तुमचे वैयक्तिक स्वार्थाचे म्हणून कमी दर्जाचे असे महायान पंथियांना ध्वनित करावयाचे आहे.

2. हीनयान हा आचरणास थोडा कठीण पंथ होय. महायान त्या मानाने सोपा. स्थानिक लोकांच्या धार्मिक समजुतींचा महायान पंथात मिलाफ होऊ शकत असे. बुद्धाने ईश्वर नाकारला त्यामुळे हीनयान पंथ, निरिश्वरवादास चिकटून राहिला. परंतु महायान पंथात हळूहळू बुद्धालाच देवत्व प्राप्त झाले. पूजाअर्चा, निरनिराळी कर्मकांडे यांना महायान पंथाने उत्तेजन दिले. बुद्धाच्या प्रसादाने आपला उद्धार होऊ शकतो. बुद्धास शरण गेल्याने त्याच्या सुकृताचा थोडा अंश आपणांसही मिळेल. हा विश्वास महायान पंथाने दिला. या कारणाने या पंथाचा प्रसार फार झपाट्याने झाला. हिमालय ओलांडून तिबेट, चीन, जपान, कोरिया, मंगोलिया या भागात तो पसरला. हीनयान मात्र लंका, म्यानमार (ब्रह्मदेश), थायलंड (सयाम), कंबोडिया या पुरताच सिमीत राहिला.

3. हीनयानात बाह्य वस्तूंचे अस्तित्व मान्य केले आहे, फक्त त्या क्षणिक असतात यावरच भर दिलेला आहे. महायान पंथात बाह्यवस्तू विज्ञानमय आहेत किंवा त्या शून्य आहेत असे प्रतिपादिलेले असते. यावरूनच 'हीनयान' या धार्मिक पंथातून 1) वैभाषिक आणि 2) सौत्रांतिक असे दोन तात्त्विक संप्रदाय निर्माण झाले तर महायान या धार्मिक पंथातून 1) योगाचार किंवा (विज्ञानवादी) आणि 2) माध्यमिक किंवा (शून्यवादी) हे दोन तात्त्विक संप्रदाय निर्माण झाले.


यावर अधिक वाचा :

आत्मा न स्त्री असते न पुरूष

national news
जीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...

पाळा काही धार्मिक नियम

national news
शिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...

देवळात का जायचे?

national news
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...

अन्न- संस्कार

national news
शुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...

स्वप्नात जर घुबड दिसला तर...

national news
स्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...

राशिभविष्य