1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. बजेट 2008
Written By भाषा|
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 26 फेब्रुवारी 2008 (18:19 IST)

अर्थसंकल्पावेळी घोषणाबाजी, सभात्याग

डावे पक्ष, समाजवादी पक्ष आणि बहूजन समाज पक्ष यांची घोषणाबाजी आणि त्यातील काहींच्या सभात्यागाच्या गोंधळातच रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी आजचा अर्थसंकल्प मांडला.

निषेधाच्या या घोषणाबाजीत कॉंग्रेसचेही खासदार सामील होते. आपल्या प्रांतावर वा राज्यावर अन्याय झाल्याचे कारण दाखवून त्यांनीही लालूंचा निषेध केला. अखेर त्यांची समजूत घालण्यासाठी संसदीय कामकाज मंत्री प्रियरंजन दासमुन्शी धावून गेले आणि त्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

सदस्यांच्या या घोषणाबाजीमुळे लोकसभाध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांनी हस्तक्षेप करून लालूंना भाषण थांबविण्यास सांगितले. लालूंनी तरीही भाषण करणे सुरूच ठेवले होते, पण त्यानंतर मात्र त्यांनी ते थांबविणेच पसंत केले.

विविध भागांना आणि समाजातील अनेक वर्गांसाठी सवलती आणि सुविधा देण्याची आणि मुख्य म्हणजे भाडे कपातीची घोषणा केल्यानंतरही अनेक सदस्य आपल्या भागाच्या मागण्या घेऊन भांडत होते.

कॉंग्रेसचे अधीर चौधरी, अवतार सिंग भदाना आणि काही दक्षिणेतील खासदार विरोधाच्या पवित्र्यात होते. विशेष म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पश्चिम बंगाल आणि केरळमधील खासदार चक्क एकमेकांच्या विरोधात जाऊन भांडत होते. त्याचवेळी पूर्वेकडील राज्याच्या खासदारांनी पश्चिम बंगालकडे दुर्लक्ष झाल्याच्या भावनेतून सभात्याग केला. त्याचवेळी आपल्या राज्यात लोकोमोटिव्ह कारखाना उभा रहाणार असल्याच्या मागणीने सुखावलेले केरळमधील खासदार मात्र बसून होते.