गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 जुलै 2021 (07:47 IST)

राज्यात ९ हजार १९५ नवे कोरोनाबाधित, मृत्यूची संख्या २०० पार

राज्यात काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत चढउतार होताना दिसत आहे. मृत्यूची संख्या काही कमी होत नाही आहे. गुरुवारी राज्यातील मृत्यूची संख्या २०० पार गेली आहे. राज्यात गुरुवारी ९ हजार १९५ नवे कोरोनाबाधित आढळले असून २५२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६० लाख ७० हजार ५९९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख २२ हजार १९७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १ लाख १६ हजार ६६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
 राज्यात ८ हजार ६३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ५८ लाख २८ हजार ५३५ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.०१ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे. नोंद झालेल्या एकूण २५२ मृत्यूंपैकी २०६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.
 
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी १८ लाख ७५ हजार २१७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६० लाख ७० हजार ५९९ (१४.५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख १५ हजार २८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४ हजार ३३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.