शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 18 मे 2021 (16:04 IST)

कोरोना : कोव्हिड-19च्या उपचारांतून 'प्लाझ्मा थेरपी' वगळण्याचा निर्णय केंद्रानं का घेतला?

मयांक भागवत
कोव्हिड-19 वरच्या उपचार पद्धतीतून 'प्लाझ्मा थेरपी' काढून टाकण्यात आली आहे.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS), इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR), कोव्हिड-19 नॅशनल टास्कफोर्स आणि आरोग्य मंत्रालयाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं.
 
काही दिवसांपूर्वीच देशभरातील तज्ज्ञ आणि संशोधकांनी 'प्लाझ्मा थेरपी' च्या अनियंत्रित वापरावर निर्बंध घालण्याची मागणी केंद्राकडे केली होती.
 
'प्लाझ्मा थेरपी' कडे कोव्हिड-19 विरोधात एक उपाय म्हणून पाहिलं जात होतं. पण, ही थेरपी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.
केंद्र सरकारचा निर्णय
केंद्राने सोमवारी (17 मे) कोरोनाबाधितांवर कोणत्या पद्धतीने उपचार करावेत यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेत बदल केला.
प्लाझ्मा थेरपीला कोरोनाच्या उपचार पद्धतीतून वगळण्याच्या निर्णयाचं एक प्रमुख कारण म्हणजे देशभरातील तज्ज्ञांनी केंद्र सरकारला लिहिलेलं पत्र.
 
कोरोनारुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स आणि संशोधकांनी केंद्र सरकारला लिहीलेल्या पत्रात 'प्लाझ्मा थेरपी' बाबतच्या गाईडलाईन्स शास्त्रीय कारणांना धरून नाहीत असं म्हटलं होतं.
 
"प्लाझ्मा थेरपीचा कोरोनारुग्णांवर उपचारात फायदा होत नाही हे सिद्ध झालंय. त्यामुळे याकडे तातडीने लक्ष द्यावं, जेणेकरून रुग्ण, नातेवाईकांची परवड थांबेल," असं या पत्रात नमूद करण्यात आलं होतं.
 
का वगळण्यात आली 'प्लाझ्मा थेरपी'?
कोरोनासंसर्गाच्या पहिल्या लाटेत कोरोनाव्हायरस विरोधात कोणताही ठोस उपचार नव्हता. कोरोनामुक्त रुग्णाच्या शरीरातील अॅन्टीबॉडीज कोरोनाग्रस्त रुग्णाला आजाराशी लढायला मदत करतील अशा आशेने 'प्लाझ्मा थेरपी' कडे पाहिलं गेलं.
 
पण, भारतात आणि जगभरात करण्यात आलेल्या ट्रायलमध्ये 'प्लाझ्मा थेरपी' चा कोरोनारुग्णांना फायदा होत नसल्याचं आढळून आलं.
• दिल्लीतल्या AIIMS रुग्णालयातील चाचणीत 'प्लाझ्मा थेरपी' चा कोरोनारुग्णांवर फायदा होत नसल्याचं स्पष्ट झालं.
 
• ICMR ने देशभरातील 39 रुग्णालयात केलेल्या ट्रायलमध्ये 'प्लाझ्मा थेरपी' च्या वापराने आजाराची तीव्रता कमी होण्यात आणि मृत्यू रोखण्यात फायदा होत नसल्याचं दिसून आलं.
 
• जगभरातील विविध देशात करण्यात आलेल्या चाचणीत 'प्लाझ्मा थेरपी' चा रुग्णांना फायदा झाला नाही.
 
• चीन आणि नेदरलॅंडमध्येही 'प्लाझ्मा थेरपी' चा फायदा होतो याचे पुरावे मिळाले नाहीत.
 
ICMR ने नोव्हेंबर 2020 मध्ये जारी केलेल्या सूचनेत 'प्लाझ्मा थेरपी' चा अनियंत्रित वापर योग्य नसल्याची सूचना केली होती.
 
'प्लाझ्मा' मुळे व्हायरसमध्ये म्युटेशन होतं?
भारतात रुग्णसंख्या वाढण्यासोबतच कोरोना रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी 'प्लाझ्मा' ला प्रचंड मागणी आहे. 'प्लाझ्मा' चा फायदा होत नसल्याचं सिद्ध झाल्यानंतरही प्लाझ्मा शोधण्यासाठी नातेवाईक धावपळ करताना पहायला मिळत आहेत.
 
प्लाझ्माच्या अनियंत्रित वापराबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना महाराष्ट्राच्या कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले, "आपल्याला माहितेय, प्लाझ्मा व्हायरस म्युटंट तयार होण्यासाठी कारणीभूत आहे. पण, आपण अजूनही प्लाझ्मा वापरतोय."
महाराष्ट्रात कोव्हिड टास्कफोर्सने एप्रिल महिन्यात 'प्लाझ्मा थेरपी' उपचारपद्धतीमधून वगळण्याच्या सूचना दिल्या होत्या. केंद्राने 22 एप्रिलला जारी सूचनेत 'प्लाझ्मा' चा वापर मध्यम स्वरूपातील आजारात, लक्षणं दिसून आल्यानंतर सात दिवसांच्या आत करण्यात यावा अशी सूचना केली होती.
 
तज्ज्ञ म्हणतात की, अनेक रुग्णालयात प्लाझ्मावर अनावश्यक भर दिला जातोय. काहीवेळा, नातेवाईकांच्या आग्रहाखारतही प्लाझ्मा द्यावा लागतो असं कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर सांगतात.
डॉ. रवी वानखेडकर सांगतात, "प्लाझ्मा दान केलेल्या व्यक्तीच्या शरीरातील प्लाझ्मा कमकुवत असेल किंवा यात चांगल्या अँटीबॉडी नसतील तर, रुग्णाच्या शरीरातील व्हायरस पूर्ण मरणार नाही. अशावेळी व्हायरसमध्ये म्युटेशन होण्याची दाट शक्यता असते."
 
आंतरराष्ट्रीय संशोधन काय सांगतं?
अमेरिका, यूके आणि इटलीमधील ट्रायलदरम्यान सरसकट प्लाझ्माचा वापर केल्यामुळे, व्हायरसमध्ये बदल होऊन, एस्केप म्युटेशन तयार होत असल्याचं स्पष्ट झालं.
'द नेचर' जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार, ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपीने दिल्यास म्युटंट तयार होतात. केंब्रिज विद्यापिठाचे संशोधक डॉ. रविंद्र गुप्ता यांच्या संशोधनानुसार, प्लाझ्या थेरपी दिलेल्या रुग्णामध्ये तीव्र म्युटंट आढळून आला.
 
बीबीसी फ्युचरशी बोलताना ते म्हणाले, "आम्हाला व्हायरसमध्ये म्युटेशन आढळून आले. प्लाझ्मा थेरपीत दिलेल्या अँटीबॉडीज हा नवीन व्हायरस चुकवण्याचा प्रयत्न करत होता, असं दिसून आलं. पहिल्यांदा असं होताना आम्ही पाहिलं."