1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : बुधवार, 11 मार्च 2020 (09:57 IST)

पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

कोरोना विषाणूबाधित पाच रुग्ण आढळल्यानंतर पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. पुण्यातील अनेक शाळाही पुढील काही दिवस बंद राहणार आहेत, तर खबरदारीसाठी खाजगी रुग्णालयातील शंभर बेड ताब्यात घेण्यात आले आहेत. 
 
पुण्यातील विविध खाजगी रुग्णालयातील तब्बल शंभर बेड्स ताब्यात घेण्यात आले आहेत. रुबी हॉस्पिटलसह 18 खाजगी रुग्णालयांचे बेड्स जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत. गरज पडल्यास खबरदारीचा उपाय म्हणून ही काळजी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, मात्र योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहनही प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.
 
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या आणि कॉन्व्हेंट शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. मांजरी परिसरातील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल 11 मार्च ते 14 मार्च या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे.
 
कात्रज, सिंहगड आणि नांदेड सिटी परिसरातील शाळाही बंद ठेवण्यात येणार आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर काही शाळांच्या परीक्षेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.