शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 16 एप्रिल 2020 (08:19 IST)

कोरोनाचा मुंबई-पुण्यातील वाढता आलेख खाली आणायचाय

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवरची उपचार पद्धती तसेच गंभीर अवस्थेतील रुग्णांना कसे वाचवायचे या व अशा इतर वैद्यकीय मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुंबईतील प्रमुख कॉर्पोरेट रुग्णालयांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीदेखील चर्चा केली. यावेळी नुकत्याच स्थापन झालेल्या टास्क फोर्सचे डॉक्टर्सदेखील सहभागी होते. त्यांनीदेखील त्यांचे विचार मांडले.
 
झूम व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत सैफी, फोर्टिस, वोकहार्ट, हिंदुजा, हिरानंदानी,कोकिलाबेन, सेव्हन हिल्स त्याचप्रमाणे मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव सौरव विजय, सुरेश काकाणी, अश्विनी भिडे, रामास्वामी, डॉ संजय ओक आदी उपस्थित होते.
 
कोरोना लागण झालेल्या रुग्णांची देखभाल, त्यांच्यावरील उपचार हा एकूणच कोरोना साथीमधला महत्त्वाचा भाग आहे. रुग्णांना लवकर बरे करणे, मृत्यू होऊ न देणे हे सरकार आणि वैद्यकीय क्षेत्रासमोराचे आव्हान आहे. महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत उत्तम रुग्ण व्यवस्थापन झाले पाहिजे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
 
उपचार सुरु असताना रुग्णांची कशा रीतीने काळजी घ्यावी, वैद्यकीय उपकरणांची आवश्यकता, प्रमाणित उपचार पद्धती, आयसीयू बेड्सची उपलब्धता, यावर विस्तृत चर्चा झाली. उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे व त्यांना बाधा होऊ नये हे सर्वात महत्त्वाचे आहे. कोविड उपचारासाठी जी तीन प्रकारची रुग्णालये निश्चित केली आहेत त्याचे नियोजन व त्यांच्यातील समन्वय व्यवस्थित असणे गरजेचे आहे यावरही चर्चा झाली. चाचण्यांची संख्या वाढली आहे. तसेच आता लोकांमध्ये जागृती आल्याने लक्षणे दिसताच लोक रुग्णालयात येण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत आपल्याला कोरोनाचा आलेख खाली आणायचाच आहे यादृष्टीने या बैठकीत विविध वैद्यकीय मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी सूचना ऐकल्या व कार्यवाहीचे निर्देश दिले.